Mumbai, 10 August : ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने लावलेल्या पोस्टरवरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत चांगलेच भडकले. दिल्लीत फक्त लोटांगण घालण्यासाठी जात नाहीत, तर दिल्ली ही देशाची राजधानी आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर ज्यांना सध्या बसवलेलं आहे, ते लोटांगण घालूनच बसलेले आहेत. गेल्या साठ वर्षांत सगळे मुख्यमंत्री मिळून दिल्लीला गेले नसतील, तेवढे हे एक मुख्यमंत्री लोटांगण घालायला गेले होते, असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, आम्ही सध्या महाविकास आघाडीमध्ये आहोत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर ज्यांना सध्या बसवलेलं आहे, ते लोटांगण घालूनच बसलेले आहेत. आतापर्यंत गेल्या साठ वर्षांत सगळे मुख्यमंत्री मिळून दिल्लीला गेले नसतील, तेवढे हे सध्याचे एक मुख्यमंत्री लोटांगण घालायला गेले होते.
दिल्लीत (Delhi) फक्त लोटांगण घालण्यासाठी जात नाही, तर दिल्ली ही देशाची राजधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत गेले होते, ते काय लोटांगण घालायला गेले होते का? पेशव्यांनी दिल्लीत जाऊन दिल्ली जिंकली होती, ते काय लोटांगण घालायला गेले होते का?
सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला, असा आम्ही यशवंतरावांचा (Yashwantrao chavan) उल्लेख करतो, ते काय लोटांगण घालायला गेले होते का? चिंतामण देशमुखांनी नेहरूंच्या तोंडावर अर्थमंत्रिपदाचा राजीनामा फेकला, ते काय लोटांगण होतं का? असा इतिहास संजय राऊत यांनी मांडला.
बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी दिल्लीशी, मोदी-शहांच्या जुलमी कारभाराशी, त्या मोगलाईशी जी झुंज दिली, त्याला लोटांगण म्हणता येणार नाही, त्याला स्वाभिमान म्हणतात. महाराष्ट्राचे राज्यकर्ते आज दिल्लीच्या दाराचं पायपुसणं म्हणून बसले आहेत, त्याला लोटांगण म्हणतात, असेही राऊत यांनी नमूद केले.
राऊत म्हणाले, महाराष्ट्राचा इतिहास या लोकांनी समजून घ्यावा. ज्यांनी आमचा पक्ष चिन्ह चोरलं, ज्यांनी चोऱ्या, लांड्या लबाड्या केल्या, त्यांनी आम्हाला दिल्लीचं राजकारण शिकवू नये. तुमच्या आधीपासून आम्ही दिल्लीला आहोत आणि दिल्ली आम्हाला चांगली माहिती आहे. सोनिया गांधींच्या पाठिंब्यामुळेच आपणही मंत्रिमंडळात होतात, महाशय हे लक्षात घ्या.
परमवीर सिंग हे सध्या आरोपी
माजी पोलिस अधिकारी परमवीर सिंग हे सध्या आरोपी आहेत. मला त्याच्यावर काही बोलायचं नाही आणि त्यांना कोणीही गांभीर्याने घ्यायची गरज नाही. देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पोपट आता निवडणुका आहेत, त्यांना आता काही मिरच्या, पेरू खायला घालतील आणि पोपटपंची करून घेतील आम्हाला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही.
फडणवीसांनी महाराष्ट्राचं राजकारण नासवलं
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या माणसाने या महाराष्ट्राचं राजकारण नासवलं आहे, बिघडवलं आहे. महाराष्ट्र यातून त्यांना कधीही माफ करणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.