Devendra Fadnavis-Eknath Shinde-Ganesh Naik-Pratap Sarnaik Sarkarnama
विशेष

Shivsena-BJP Cold War : शिवसेना-भाजपमध्ये अखेर जुंपलीच; फडणवीसांच्या निकटवर्तीयास शिंदेंचा मंत्री देणार टशन

Ganesh Naik Vs Pratap Sarnaik : भाजपकडून एकनाथ शिंदे यांची त्यांच्या बोलकिल्ल्यातही कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यातूनच रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपचे प्रदेश कार्याध्यक्षपद देण्यात आले आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 23 February : पहिल्या टर्ममध्ये गोडी गुलाबीत असलेली महायुती दुसऱ्या टर्मच्या सुरुवातीलाच नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत आहे. मुख्यमंत्रिपदापासून सुरू झालेली धुसफूस एकमेकांच्या कामांना स्थगिती देण्यापर्यंत पोचली आहे, त्यामुळे महायुतीमध्ये शिवसेना-भाजपमध्ये दुसऱ्या टर्मच्या पहिल्या दिवसापासून ‘कोल्ड वॉर’ सुरू आहे. त्यातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय वनमंत्री गणेश नाईक हे उद्या एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार घेणार असून त्याला शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक हे उत्तर देणार आहेत.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दुसऱ्या टर्ममध्येही मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, भाजपला मिळालेल्या प्रचंड जागांमुळे त्यांची ती अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. मात्र, गृहमंत्रिपदासाठी त्यांचा प्रचंड आग्रह होता, पण फडणवीसांनी तेही सोडले नाही, त्यामुळे नाराज झालेले एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सामील होण्यासाठी तयार नव्हते. मात्र भाजप नेतृत्वाच्या प्रयत्नाला यश आले आणि शिंदे हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री बनले. पण, संघर्ष इथेच संपला नाही, तो पुढे आणखी वाढला.

एकनाथ शिंदे यांनी नियुक्त केलेल्या भरत गोगावले यांनी एसटीच्या ताफ्यात भाडेतत्त्वार एसटी बस गाड्या घेण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रद्द केला. त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्या परिवहन मंत्रालयात आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली. त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या खात्यातही परस्पर निर्णय घेतले जात असल्याचे स्पष्ट झाले होते. सामंत यांनी त्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा लावण्यात आलेला आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नव्या सरकारमध्ये नाराज होते. मंत्रिमंडळाच्या बैठकांना गैरहजर राहून शिंदे हे तसे दर्शवित होते. मात्र, भाजप आणि फडणवीसांकडून सर्व काही सुरळीत असल्याचे सांगितले जात होते. याचदरम्यान नाशिकच्या दौऱ्यावर असताना शिंदे यांनी ‘मला हलक्यात घेऊ नका’ असे सांगून एकच खळबळ उडवून दिली होती.

दुसरीकडे, भाजपकडून एकनाथ शिंदे यांची त्यांच्या बोलकिल्ल्यातही कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यातूनच रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपचे प्रदेश कार्याध्यक्षपद देण्यात आले आहे. संघटनेच्या माध्यमातून शिंदेंना ठाण्यात घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसत आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय वनमंत्री गणेश नाईक यांनी शिंदेंना चॅलेंज देण्याचा प्रयत्न चालवला आहे.

मंत्री गणेश नाईक हे ठाण्यात जनता दरबार घेणार आहेत. त्या माध्यमातून ठाण्यात भाजपचे संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. दुसरीकडे भाजपला चॅलेंज देण्याचा प्रयत्न शिंदे यांच्या शिवसेनेकडून होताना दिसत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे गणेश नाईक यांना टशन देणार आहेत. सरनाईक हे पालघरमध्ये जनता दरबार घेणार आहेत, त्यामुळे भाजप शिवसेनेतील ‘कोल्ड वॉर’ तापताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT