
Mumbai, 23 February : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरारी आहे. मात्र, बीड पोलिसांनी काढलेल्या एका पत्रकावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ते पत्र ट्विट करून चौकशीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लावले आहे. बीड पोलिसांनी दिलेल्या आदेशावर ‘हे अतिशय गंभीर आहे. यानंतर कसा विश्वास ठेवायचा पोलिस चौकशीवर? देवेंद्र फडणवीस आता तरी काही बोलणार का अजून त्यांना गरज वाटत नाही? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
बीड पाेलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी काढलेल्या आदेशाचे पत्र पोस्ट करत अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी बीड पोलिसांच्या कार्यशैलीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. अंजली दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, हे अतिशय गंभीर आहे. त्यानंतर कसा विश्वास ठेवायचा पोलिस चौकशीवर? तुमची गाडी घेऊन आरोपीला शोधा आणि आरोपी मिळताच आमच्याशी संपर्क साधावा, असा आदेश स्कॉर्पिओ नंबर MH44 AD0727 चे मालक यांना बीड पोलिसांनी दिला आहे. ह्या स्कॉर्पिओचे मालक कराडचे मित्र बालाजी तांदळे.
तपास मुद्दाम भलत्याच दिशेला भरकटत नेण्यासाठी आणि वाल्मिक कराडला (Walmik Karad) गुन्ह्यांतून बाहेर काढण्यासाठी हे केले गेले. हा राजकीय दबाव कुणी टाकला असेल, हे वेगळे सांगण्याची गरज आहे का? एसपी अविनाश बर्फाळ, राजेश पाटील, प्रशांत महाजन, गोसावी, भागवत शेलार ह्या सगळ्यांना बरखास्त करा आणि ह्यांना बालाजी तांदळेसकट सहआरोपी करावे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.
दमानिया म्हणतात, धनंजय मुंडे माझे दैवत. वाल्मिक कराड माझे नेते, असे म्हणणारे बाळाजी तांदळे, यांना पत्र देऊन, त्यांना बरोबर घेऊन, त्यांच्याच जवळच्या मित्रांचा, जे खुनाचे आरोपी आहेत, ह्यांना घेऊन पोलिस शोध करू शकतात का? जे पकडले गेले, ते ‘मुद्दाम पकडवून, बळी दिले गेले’ ह्यात शंका आहे का ? म्हणूनच कराड फरारी राहू शकले आणि आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी दाखवले गेले की पोलिसांचा तपास चालू आहे. जर प्रकरण लावून धरलं नसतं, तर कराडला देखील अटक झाली नसती.
बालाजी तांदळे, जो जमिनीचा बंदोबस्त करतो, प्रत्येक स्थळी उपस्थित असतो, तो शोधेल आरोपींना? ह्याची नुसती चौकशी करून त्याला सोडून दिले? ह्याला जर थर्ड डिग्री वापरून चौकशी केली, तर कळेल सगळं कुणाच्या सांगण्यावरून होत होते. पीआय गोसावी आणि भागवत शेलार यांचे सीडीआर जाहीर करावा. पहिल्या दोन आरोपींची TIP (टीप) कुणाकडून आली? देवेंद्र फडणवीस आता तरी काही बोलणार का अजून त्यांना गरज वाटत नाही? असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.