Ashish Shelar-Bhaskar Jadhav Sarkarnama
विशेष

Vidhansabha News: शिवसेना उबाठा कुठाय?, सुप्रीम कोर्टापेक्षा निवडणूक आयोग, शेलार मोठे नाहीत; भास्कर जाधव-शेलार भिडले

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : संयुक्त संसदीय समितीत प्रतिनिधीत्व न मिळाल्याचा मुद्दा शिवसेनेचे (उबाठा) भास्कर जाधव यांनी मांडला. त्यावर बोलताना भाजपचे आशिष शेलार यांनी शिवसेना एकच असून ती आमच्यासोबत आहे. सभागृहात असा पक्ष रजिस्टर झाला आहे का? गटनेता, प्रतोद निवडलेला आहे का? मग शिवसेना उबाठा कुठे आहे? शेलारांच्या दाव्यावर जाधव उसळून उठत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत सुप्रीम कोर्टापेक्षा निवडणूक आयोग आणि आशिष शेलार मोठे नाहीत, असा हल्लाबोल केला. (Election Commission, Ashish Shelar are not bigger than Supreme Court : Bhaskar Jadhav)

माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व खासगी सुरक्षा रक्षक नोकरी नियमनाचे बिल संयुक्त समितीकडे पाठविण्याचा निर्णय दोन्ही सभागृहाने घेतला आहे. त्या समितीत प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, प्रवीण दटके, सचिन अहिर, शशिकांत शिंदे, भाई जगताप, सत्यजित तांबे, तर विशेष निमंत्रित म्हणून मनिषा कायंदे यांची विधान परिषदेतून वर्णी लागली आहे. विधानसभा सदस्यांमधून आशिष शेलार, राजकुमार रावल, माधुरी मिसाळ, जयकुमार गोरे, प्रशांत ठाकूर, महेश शिंदे, प्रकाश आंबेडकर, बालाजी किण्हेकर, नीलेश लंके, दिलीप मोहिते, संग्राम थोपटे, पृथ्वीराज चव्हाण, आशिष जयस्वाल यांनाा संधी देण्यात आलेली आहे.

विधीमंडळ समित्यांवर एकूण सदस्यसंख्येच्या किती सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सदस्य घ्यावेत, याचे धोरण ठरलेले आहे. विधानसभा सदस्यांतून आमचा एकही सदस्य नाही. समितीत विरोधी आणि सत्ताधारी सदस्य किती असावेत, हे मला जाणून घ्यायचे आहे, असा प्रश्न भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी उपस्थित केला.

आपण आतापर्यंत सदस्यसंख्येच्या प्रमाणात त्या त्या पक्षाला संधी दिली जाते, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ही वैधानिक कामासंदर्भात दोन्ही सभागृहाची समिती आहे. आमचा हक्क असेल तर आम्हाला टाळू नका, त्यामुळे आपण आमच्या हक्काचे रक्षण करावं. नसेल आम्हाला संधी द्यायची, तर नियम काय सांगतो, हे आम्हाला सांगावे, असेही जाधव यांनी नमूद केले.

संयुक्त संसदीय समितीमध्ये कोणाचे किती सदस्य असावेत, याबाबतचा नियम १९८ मध्ये आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. पण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ‘विरोधकांचा समावेश नसेल तर त्या समितीला काय अर्थ आहे,’ असा सवाल केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारची बाजू लावून धरली. भाजपचे १०६ आमदार आहेत. सदस्यसंख्येच्या प्रमाणात समितीत प्रतिनिधीत्व दिलं जातं. संख्येचा विचार केला तर सर्वांना व्यवस्थित प्रतिनिधीत्व मिळालेले आहे. सत्ताधारी पक्षाकडे असणारी सदस्यसंख्या आणि विरोधकांची सदस्यसंख्या याच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व मिळेल. तशा प्रकारचे प्रतिनिधीत्व मिळालेले आहे, असे त्यांनी सांगितले.

विधानसभेत शिवसेना (उबाठा) असा पक्ष रजिस्टर केला आहे का? शिवसेना एक असेल तर शिवसेना आमच्यासोबत आहे. त्यांचे सदस्य त्या समितीत आहेत. आम्हीच शिवसेना आहोत, असा दावा उबाठा यांचा आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना कुणाची आहे, हे सांगितले आहेत, तर शिवसेना उबाठा कुठे आहे? शिवसेना उबाठा असा पक्ष रजिस्टर केला आहे का?, त्याला मान्यता दिली आहे का? त्याचा प्रतोद, गटनेता निवडलेला आहे का? शिवसेना उबाठा इनव्हिजीबेल आहे. शिवसेना एकच आहे, जी निवडणूक आयोगाने तुमच्यासमोर आणली आहे. दुसरी कुठली शिवसेनाच नाही, असा दावा आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला.

शेलारांच्या दाव्यावर भास्कर जाधव उसळून उठले. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा संबंध या सभागृहाशी नाही. सर्वोच्च न्यायालयाने मुख्य प्रतोद हे सुनील प्रभू आहेत, भरत गोगावले नाहीत, असे स्पष्टपणे सांगितले आहे. आपण घेतलेला निर्णयही सर्वोच्च न्यायालयाने नाकारला आहे. सुप्रीम कोर्टापेक्षा निवडणूक आयोग, आशिष शेलार मोठे नाहीत. मूळ शिवसेना आम्हीच आहोत. आता शिवसेना, राष्ट्रवादीचं चाललं आहे. अख्खी लोकशाही संपविण्याचे काम चालू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT