Uddhav Thackeray-Rashmi Thackeray 

 

sarkarnama 

विशेष

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे RTO मध्ये रांगेत उभ्या राहतात तेव्हा...

व्हायरल होणाऱ्या पोस्टमागे काय आहे सत्य?

सरकारनामा ब्यूरो

पुणे : तुम्ही फेसबुकवर अॅक्टिव्ह असाल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी (Rashmi Thackeray) यांच्याविषयी एक पोस्ट तुमच्या वाचनात आली असेल. तुम्ही शिवसेेनेच्या ग्रुपवर असाल तर तुम्ही ती `लाईक`पण केली असेल. ही पोस्ट आहे ती मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी परिवहन कार्यालयात (RTO) स्वतः जाऊन, रांगेत उभे राहून त्यांनी ड्रायव्हिंग लायसन मिळविल्याची!

ही पोस्टी काय आहे ती आधी तुम्ही वाचाच... ती खालीलप्रमाणे.

मुंबईच्या RTO कार्यालयात एक महिला चालत आली. तिच्या वाहनचालक परवान्याची मुदत संपत आली होती व त्याचे नूतनीकरण करायचे होते. त्या महिलेने अर्ज घेतला तो व्यवस्थित स्वहस्ते भरला कागदपत्रे घेउन ती अनुज्ञाप्ती मिळवण्याच्या रांगेत उभी राहिली. हळुहळू क्रमांक पुढे सरकत होते. त्या महिलेची कागदपत्रे घेतली गेली. तिने पैसे भरले. अनुज्ञाप्राप्तीसाठी फोटोही काढून घेतला. सर्व प्रक्रिया आटोपून ती महीला RTO बाहेर पडणार तोच क्लार्कने कागदपत्र वाचली नाव रश्मी उद्धव ठाकरे!

CM wife post

तो उडालाच! म्हणजे महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्याच्या पत्नी रांगेत उभी होती इतका वेळ. मग पळापळ सुरु झाली.RTO, ARTO कार्यालयात नव्हते. तिसऱ्या क्रमांकाचे अधिकारी पार्किंगपर्यत पळत आले. नमस्कार, चमत्कार झाले. सौ.मुख्यमंत्र्यांना विनंती केली की त्यांनी कार्यालयात यावे. त्याच्या परवान्याचे त्वरीत नूतनीकरण करुन देण्यात येईल..

सौ. मुख्यमंत्र्यांनी गोड शब्दांत नकार दिला. मी अर्ज भरला आहे. पैसेही भरले आहेत आणि माझा फोटोही काढला आहे. आता तुमच्या नियमानुसार मला स्पिड पोस्टने परवाना पाठवा. गाडी सुरु करुन बाय म्हणत त्या निघुनदेखील गेल्या. एव्हाना अधीकाऱ्यांचे कपाळ घामाने थबथबले होते. मुख्यमंत्र्यांची पत्नी अन रांगेत RTO कार्यालयात उभी राहाते, यावर विश्वास बसत नव्हता. हे उदाहरणं सांगण्याच कारण की, आजकाल कोणीही नेता उठतो आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना रुबाबात बोलतो. अनेक बेकायदेशीर काम करण्यासाठी दबाव टाकतो. सामान्य माणसांसाठी नियमावर बोट ठेवणारे ही अधिकारी मंडळी या मोठया लोकांसाठी मात्र नियम सैल करायला तयार होतात. जे अत्यंत चुकीचे आहे. रश्मीताईने जे केल त्याच अनुकरण प्रत्येकाने करणे अपेक्षित आहे आणि अधिकाऱ्यांनीही लहान मोठा असा भेद न करता प्रत्येकाचं काम नियमाने आणि वेळेत करणे गरजेचं आहे.

तुम्हालाही ही पोस्ट वाचून एकदम बरं वाटलं असेल. चला कोणीतरी आपल्या नेतेपदाचा तोरा न मिरवता काम करत असल्याचे पाहून समाधान वाटलं असेल. पण मंडळी रश्मीताई यांच्या वाहन परवान्याची मुदत संपली होती का आणि त्या खरोखरीच RTO कार्यालयात गेल्या होत्या का, याबाबत अधिकृत माहिती कुठेही पुढे आलेली नाही. त्या रांगेत उभ्या असल्याचा कोणतेही छायाचित्र सोशल मिडियात मिळत नाही. मुंबईतील अनेक पत्रकारांनाही याबाबत माहिती नाही. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी असलेल्या रश्मी ठाकरेंचा चेहराही जनतेला ओळखीचा आहे. त्यांच्यासोबत तर अनेकांनी छायाचित्रे रांगेत काढली असती. तसेही झालेले नाही. त्यामुळे रश्मीताई या रांगेत उभ्या होत्या, याला कोणताही पुरावा नाही. पण शिवसेनेच्या संबंधित अनेक फेसबुक पेजवरून ही घटना शेअर होत आहे.

आता तुम्हाला 2019 ची पोस्ट आठवते का? तेव्हाही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृतावहिनी या नागपूरमधील RTO च्या रांगेत अशाच उभ्या होत्या, असे तेव्हा सोशल मिडियात फिरले होते. फडणवीस आणि भाजपच्या मंडळींनी ही पोस्टही भरपूर शेअर केली. मात्र अमृतावहिनी या रांगेत उभ्या असल्याचे फोटो कोठेही मिळाले नाहीत. एवढेच नाही तर अमृता फडणवीस आणि रश्मी वहिनी यांच्याविषयी या लिहिलेल्या पोस्टमधील शब्द न शब्द सारखा आहे. फक्त मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे नाव बदलले आहे. आता हाच मजकूर वापरून कोणत्याही माजी किंवा भावी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रांगेत उभे असल्याबद्दल त्यांचे समर्थक लिहू शकतात.

cm wife post

या दोन्ही पोस्ट म्हणजे रश्मी वहिनी आणि अमृतावहिनी या RTO मध्ये पोहोचल्याचा पुरावा देत नाहीत. त्यामुळे तो कल्पनाविलास म्हणून समजावा. मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी याबाबतच्या या दोन्ही पोस्ट शोधल्या. सालाबादप्रमाणे ह्या सरकार मधील मुख्यमंत्राच्या पत्नी चालत RTO कार्यालयात पोहोचल्या, अशी प्रतिक्रिया देत या पोस्टमधील वास्तव पुढे आणले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT