Maharashtra Assembly  sarkarnama
विशेष

Maharashtra Politic's : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या वाटपाचं सूत्रं ठरलं; अशी होणार विभागणी

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या निवडीचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केल्यानंतर राज्यात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. या १२ जागांपैकी भारतीय जनता पक्षाला सहा, तर शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) तीन जागा मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला तीन आमदारांची लॉटरी लागणार आहे. (Formula for allotment of 12 MLAs appointed by the Governor was fixed)

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेली १२ जणांची नावे रद्द करून नवी यादी राज्यपालांकडे पाठविली होती. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०२२ पासून आमदार नियुक्तीला स्थगिती दिली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयात ११ जुलै २०२३ रोजी झालेल्या सुनावणीत ती बंदी उठविण्यात आली होती. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदार निवडीचा विषय मोकळा झाला होता.

दरम्यान, शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील झाली आहे. त्यात शिंदे-फडणवीस सरकारने आधी पाठविलेल्या यादीत आता बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेना, भाजपबरेाबरच (BJP) आता राष्ट्रवादीलाही काही जागा द्याव्या लागणार आहेत. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर तातडीने हा विषय मार्गी लावण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

नव्या राजकीय फेररचनेनुसार सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला सहा आमदार मिळणार आहेत. सहकारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी तीन जागा मिळणार आहेत, अशी बातमी एका मराठी वृत्तवाहिनीने दिली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांची निवड लवकरच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे अजित पवार गटाला निवडणुकीच्या तोंडावर आमदारकीची लॉटरी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT