गोंदिया-कोहमारा राज्य महामार्गावर सडक अर्जुनी शहर वसले आहे. 15 ऑगस्ट 1992 रोजी सडक अर्जुनीला तालुक्याचा दर्जा मिळाला. या तालुक्याने गेल्या 33 वर्षांत काहींना आमदार बनविले, मंत्री बनविले. काही पदावर आहेत, काही पदावरून गेलेत; पण मतदाररूपी नागरिकांनी केलेल्या बसस्थानकाच्या मागणीकडे एकाही नेत्याचे लक्ष गेलेले नाही. त्यांच्या लोकांप्रतीच्या भावना केवळ मतदानापुरत्याच मर्यादित असतात, अशी बोंब आता येथील नागरिक ठोकत आहेत.
स्वातंत्र्याचा 78 वा वर्धापनदिन आज साजरा करत आहोत. याच दिवसाचा मुहूर्त साधून 33 वर्षांपूर्वी सडक अर्जुनीला तालुक्याचा दर्जा बहाल करण्यात आला. परंतु, तेव्हापासूनच हा तालुका प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेला बळी पडला आहे. सडक अर्जुनी शहराला नगरपंचायतीचा दर्जादेखील आहे. या शहरातून गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, देवरीकडे एसटी बसेस धावतात. शेकडो प्रवासी प्रवास करतात.
याच शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे बकी गेट आहे. त्यामुळे पर्यटकांसह आसपासच्या नागरिकांचे सडक अर्जुनीत पाय असतातच. अनोळखीने बसस्थानक कुठंय? असा प्रश्न विचारला आणि पलीकडून बसस्थानक नाही, असे उत्तर आले, तर प्रश्न विचारणाऱ्याला विश्वासच बसत नाही. तालुक्याच्या ठिकाणाला आणि नगर पंचायत असलेल्या सडक अर्जुनीत बसस्थानक नाही. परिसरातील प्रवासीच काय, तर पर्यटकांनाही ऊन, वारा, पावसाचा मारा झेलत बसची वाट पाहावी लागते.
या तालुक्यात 108 गावे आहेत. तालुक्याचे शहर असल्याने शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, बँका, दुकाने अशा विविध कारणांसाठी सर्व गावांचा संपर्क सडक अर्जुनीशी संबंध येतो. येथे शिवमंदिराजवळ जुना प्रवासी निवारा आहे. मात्र, तिथे स्वच्छतागृह, पाणी, विद्युत आदी सोयी-सुविधा नाहीत. कधी-कधी येथे बसदेखील थांबत नाही.
दुसरा बसथांबा दुर्गा चौकाजवळ दिला आहे. याठिकाणी एका बाजूला कडूनिंबाचे झाड आहे. त्या झाडाखाली उभे राहून व बाजूला मेडिकलच्या दुकानासमोर बसून प्रवाशांना बसची वाट पहावी लागते, तर दुसऱ्या बाजूला पान टपरीजवळ बसून व झाडाखाली उभे राहून बसची वाट पहावी लागते. हे सारे दृश्य स्थानिक लोकप्रतिनिधींच्या नजरेत भरत नसावे का? किंवा त्यांना जाणून बुजून दिसत नसावे, असा प्रश्न अनुत्तरीत आहे.
प्रशासकीय यंत्रणा असो वा स्थानिक लोकप्रतिनिधी पुरते निडर झाले आहेत. आश्वासनापलीकडे काहीही त्यांना दिसत नाहीत. आता माजी मंत्री राजकुमार बडोले इथले विद्यमान आमदार आहेत. त्यांना सडक अर्जुनी आणि परिसराचा चांगला अभ्यास आहे. त्यांनी किमान आपल्या कारकिर्दीत बसस्थानकाची सुसज्ज इमारत सडक अर्जुनीला देणे अपेक्षित आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.