Udayanraje Bhosale-Pankaja Munde Sarkarnama
विशेष

Udayanraje Beed Sabha : गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींनी उदयनराजे गहिवरले...पंकजांच्या अश्रूंचा बांध फुटला!

Lok Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार, उदयनराजे भोसले यांची पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी बीड जिल्ह्यातील कडा येथे सभा आयोजित केली होती. पुढच्या सभेला जायचे असल्याने अजित पवार हे प्रथम बोलून निघून गेले. त्यानंतर पंकजा मुंडे आणि उदयनराजे भोसले बोलले.

Vijaykumar Dudhale

Beed, 11 May : भारतीय जनता पक्षाच्या बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी आज खासदार उदयनराजे भोसले यांची कडा येथे सभा झाली. त्या सभेत बोलायला उभे राहिलेल्या उदयनराजे भोसले यांना (स्व.) गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींनी गहिवरून आले. त्याचवेळी पंकजा मुंडे यांच्याही अश्रूंचा बांधही फुटला, त्यामुळे सभेत काही वेळ वातावरण भावूक झाले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या प्रचारासाठी बीड (Beed) जिल्ह्यातील कडा येथे सभा आयोजित केली होती. पुढच्या सभेला जायचे असल्याने अजित पवार हे प्रथम बोलून निघून गेले. त्यानंतर पंकजा मुंडे आणि उदयनराजे भोसले बोलले. पंकजा मुंडे यांच्यानंतर उदयनराजे भोसले हे बोलायला उभे राहताच एक शिट्या आणि घोषणा द्यायला सुरुवात झाली. घोषणा आणि शिट्ट्यांचा जोर एवढा होता की सुरुवातीचे काही मिनिटे उदयनराजे भोसले यांना बोलताच आले नाही. त्यांनी स्वतः उपस्थितांना थांबण्याची विनंती केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उदयनराजेंच्या भाषणाच्या सुरुवातीलाच कार्यकर्त्यांनी ‘अमर रहे अमर रहे.... गोपीनाथ मुंडे अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांकडून शिट्या आणि टाळ्यांचा कडकडाट होत होता. त्यावर उदयनराजेंनी ‘तुम्ही जेव्हा शिट्या आणि टाळ्या वाजवता, तेव्हा ओळखायचं भाषण आटोपतं घ्यायला पाहिजे,’ अशी कोटी केली. त्यालाही उपस्थितांमधून हासून दाद दिली.

पुढे बोलताना उदयनराजे भोसले यांनी गोपीनाथ मुंडे यांना स्मरणून, ‘आदरणीय, वंदनीय, माझे वडिल, माझं काळीज, माझे मित्र गोपीनाथजी मुंडे यांना वंदन करतो,’ असे बोलत असतानाच त्यांना गहिवरून आले. त्याचवेळी व्यासपीठावर बसलेल्या पंकजा मुंडे यांच्या आश्रूचाही बांध वडिलांच्या आठवणींनी फुटला, त्यामुळे सभेचे वातावरण काही वेळ भावूक झाले होते.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबाशी खासदार उदयनराजे भोसले यांचे जवळचे संबंध आहेत. उदयनराजे यांच्या राजकीय वाटचालीत गोपीनाथ मुंडे यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांच्यासाठी उदयनराजे भोसले कायम सभा घेतात. त्याप्रमाणेच त्यांनी आजही बीडमध्ये सभा घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT