1971 Ganga hijack : दिवस 30 जानेवारी 1971. सकाळी साडेअकराच्या सुमाराला काश्मीरच्या श्रीनगर विमानतळावरून इंडियन एयरलाइन्सचं गंगा हे विमान 26 प्रवासी घेऊन दिल्लीच्या दिशेनं निघालं. विमान फार तर, जम्मूपर्यंत गेलं असेल. तेव्हाच पायलटने विमान खाली न्यायला सुरुवात केली. दोन प्रवासी घाईघाई उठले. एक कॉकपीटकडे गेला तर, दुसऱ्याने हातात बॉम्ब धरत प्रवाशांना धमकावलं. प्रवाशांना हात वर करून गप्प बसायला सांगितलं.
हे दहशतवादी असल्याचं सगळ्यांच्याच लक्षात आलं होतं. कॉकपीटकडे गेलेल्या दहशतवाद्याने पायलटच्या डोक्याला पिस्तूल लावून विमान लाहोरला न्यायला भाग पाडलं. फार तर दोन तासांत होणारा श्रीनगर-दिल्ली प्रवास असा हायजॅक झाला अन् थोडे थोडके नव्हे तर, दोन दिवस चालला. अशा पद्धतीने सुरू झालं एक भयंकर अपहरणनाट्य... नेमकं होतं या अपहरण नाट्याच्या मागे? हे अपहरण का झाले होते? या अपहरणाचा बांग्लादेश स्वतंत्र होण्याशी काय संबंध होता?
हाशीम कुरेशी आणि अश्रफ कुरेशी हे दोघे दहशतवादी (Terrorist) होते मूळचे काश्मीरचेच. वरवर पाहता ‘जम्मू – काश्मीर नॅशनल लिबरेशन फ्रंट’साठी ते काम करत होते. पण त्यांची खरी सूत्रधार होती-आयएसआय अर्थात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा. दुपारी दीडला विमान लाहोर विमानतळावर उतरलं तेव्हा हाशीम आणि अश्रफ दोघेही पाकिस्तानी अधिकाऱ्यांना भेटले. आम्हाला पाकिस्तानने आश्रय द्यावा तसंच भारताच्या (India) ताब्यात असणाऱ्या 36 दहशतवाद्यांची सुटका व्हावी, अशा दोन मागण्या त्यांनी पाकिस्तानसमोर ठेवल्या.
एव्हाना विमान अपहरणाची बातमी ‘ऑल इंडिया रेडिओ’ने दिली होती. अपहरणाच्या मागे पाकिस्तान असल्याची भारत सरकारला खात्री होती. मागण्या मान्य करायच्या नाहीत, यावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) ठाम होत्या. दरम्यान संपूर्ण भारत चिंताग्रस्त असताना तिकडे पाकिस्तान मात्र आनंदात होता. हाशीमला ‘स्वातंत्र्यसैनिक’ म्हणून त्यांनी डोक्यावर घेतलं होतं. हाशीमने पाकिस्तानी मीडियाला मुलाखती दिल्या. तो अधिकाऱ्यांना भेटत राहिला. त्याचा चांगला पाहुणचार तिथे झाला.
1 फेब्रुवारीला खुद्द पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री झुल्फीकार अली भुट्टो यांनी विमानतळावर जाऊन हाशीमसोबत चर्चा केली. त्यानंतर कसे कोण जाणे पण विमान तसेच ताब्यात ठेवून प्रवाशांची त्यांनी सुटका केली. मात्र आणखी कुरापत काढण्यासाठी आयएसआयने ते विमान जाळून टाकले. भारताने याचा निषेध केला तसंच आंतरराष्ट्रीय समुदायासमोर गाऱ्हाणं मांडलं. याशिवाय पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीतून उड्डाण करायला बंदी घातली.
अनेक भारतीयांच्या दृष्टीने सरकारची भूमिका बोटचेपी होती. विमानासह प्रवाशांना ओलिस ठेवणाऱ्या पाकिस्तानला चांगला धडा शिकवायला पाहिजे होता. अशी घटना घडल्यानंतर कोणाचंही रक्त सळसळायला पाहिजे होतं. त्यामुळे केंद्र सरकारवर मोठी टीका झाली. मात्र या प्रकरणात खरी मेख वेगळीच होती. राजकारणात ‘दिसतं तसं नसतं’ याची ही प्रचिती होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे अपहरण प्रकरण म्हणजे भारताचा विजय होता! कारण या मागे होती भारताची ‘रॉ’ ही गुप्तचर संस्था.
झालं असं की, या विमान अपहरणाच्या दोन आठवडे आधी बीएसएफच्या जवानांनी हाशीम कुरेशीला पाकिस्तानातून भारतात घुसखोरी करताना पकडलं होतं. गुप्तचर यंत्रणांनी त्याची कसून चौकशी केली. आयएसआयने त्याच्यावर विमान अपहरणाची जबाबदारी सोपवल्याचं त्यात उघड झालं. ते ही कुठले साधेसुधे विमान नाही तर पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मुलगा असणारे राजीव गांधी पायलट असतील तेच विमान पळवायचं होतं. असं करून इंदिरा गांधी यांना कोंडीत पकडण्याचा हा एक भयंकर डाव होता.
खरा ट्विस्ट तर याच्या पुढे आहे. ‘रॉ’चे प्रमुख आर. एन. काव यांना आयएसआयचा डाव काय आहे ते सांगण्यात आलं तेव्हा सत्य समोर आलं. हाशीम हा मुळात 'रॉ'चाच हस्तक होता. त्याला 'रॉ'नेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवलं होतं. पण पुढे तो फितूर झाला आणि खरोखर आयएसआयसाठी काम करू लागला. ‘रॉ’चे प्रमुख आर. एन. काव यांनी पाकिस्तानचा हा डाव त्यांच्यावरच उलटवायचं ठरवलं.
काव यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची रीतसर परवानगी घेऊन त्यांनी एक योजना आखली. “एक तर तुरुंगात खितपत पड नाही तर, आम्ही सांगू तसं कर” असं हाशीमला स्पष्टच सांगितलं गेलं. काही पर्याय नसल्यामुळे तो ही तयार झाला. ठरल्याप्रमाणे विमानाचं अपहरण कर; एवढंच 'रॉ'चं म्हणणं होतं. अपहरण नेमकं कसं करायचं, कोणत्या मार्गाने जायचं, मागण्या काय करायच्या अशी सगळी पट्टी त्याला पढवली गेली. आता हे सगळं 'रॉ'ने का केलं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्यामागे दोन हेतू होते- दहशतवाद्यांना पाठीशी घालणारा देश म्हणून पाकिस्तानची नाचक्की करणं आणि पाकिस्तानच्या युद्ध तयारीत खोडा घालणं.
बांग्लादेश प्रश्नावरून भारत – पाकिस्तान यांच्यात युद्ध होणार हे जवळपास निश्चित झालं होतं. बांग्लादेशमध्ये राजकीय चळवळ सुरू राहावी, असं भारताला वाटत असताना पाकिस्तानला मात्र ती दडपून टाकायची होती. त्यासाठी पाकिस्तानचे जनरल याह्या खान तिथं लष्कर पाठवणार होते. पण जाण्याचा मार्ग होता भारताच्या हवाई हद्दीतून. इंदिरा गांधी यांनी विमान अपहरणाचे निमित्त करून तोच बंद करून टाकला. राहिला नुकसान झालेल्या एका विमानाचा प्रश्न तर ते विमानही सगळ्यात जुनं झालेलं होतं. अगदी सेवेतून बाद केलेलं. फक्त अपहरणाच्या काही दिवस आधी ते वापरायला काढलं गेलं होतं. अशी ही पाकिस्तानला धोबीपछाड करणारी योजना पुढे अनेक वर्षं चर्चेचा विषय ठरली.
डिसेंबर 1971 मध्ये भारत –पाक युद्ध सुरू झालं. या युद्धात भारत जिंकला. कारण भारताने त्याची तयारी आधीच केलेली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय सैन्यदलाच्या इतिहासातला पहिला सर्जिकल स्ट्राइक तेव्हा झाला. नोव्हेंबर 1971 मध्ये 'रॉ', 'एसएफएस' आणि त्यातल्या तिबेटी सैनिकांनी मिळून ‘ऑपरेशन ईगल’ यशस्वी केलं. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 'रॉ'ला मुक्तहस्त दिलेला होता. त्यांनी ऑक्टोबर मध्येच उत्तराखंडच्या चक्रातामधून तीन हजार कमांडोजना भारत-बांगला सीमेवर नेण्यात आलं. यावेळी एवढी गुप्तता पाळण्यात आली की ना लष्कराच्या पूर्वेकडील कमांडरला खबर लागू दिली ना हवाई दलाच्या विमानांचा वापर केला गेला.
'रॉ'च्या विशेष विमानांनी हे सारे कमांडो कलकत्त्याच्या डमडम विमानतळावर आले. तिथून तीन दिवस कारने प्रवास करून सीमेवर पोचले. मिझोरामच्या डेमागिरी इथं शरणार्थी लोकांमध्येच मिसळून ते राहिले. सीमेच्या पलीकडे असणारं चितगोंग पर्वतीय क्षेत्र त्यांचं लक्ष्य होतं. तिथून जवळच कर्णफुली नदीवर कप्ताई धरण होतं. ते उद्ध्वस्त करून बाकीचे पूल पाडायचे, लष्करी सुविधा नष्ट करून पाकिस्तानच्या हालचालींना खीळ घालण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवली गेली होती. पण युद्धाची घोषणा झालेली नसताना भारतीय सैन्याने असं करणं म्हणजे आक्रमण ठरलं असतं. त्यामुळे या कमांडोंच्या टोप्यांवरचे बिल्ले बदलले होते. विशेष म्हणजे बल्गेरियातून मागवलेल्या एके फोर्टी सेवन रायफल आणि अमेरिकन कार्बाइन्स त्यांना दिले गेले होते. कमांडोंची तीन पथकं करण्यात आली होती. सीमेच्या पलीकडे पोचताच त्यांनी ‘मारा आणि पळा’ धोरण ठेवून हल्ले सुरू केले.
दाट जंगल, दलदल आणि पाणथळ अशा भागात पाकिस्तानच्या अव्वल कमांडोंची सेकंड बटालियन ठाण मांडून बसलेली होती. भारतीय सैनिकांच्या फौजेला या बटालियनचा अडथळा होता. त्यामुळे आपले कमांडो पाकिस्तानी सैनिकांवर गनिमी काव्याने हल्ला करायचे. जंगलयुद्धात ते इतके तरबेज होते की, ते कुठून यायचे अन् कुठे गायब व्हायचे हे पाकिस्तानी सैनिकांना समजतच नव्हतं. या वैशिष्ट्यामुळे त्यांना ‘फँटम ऑफ चितगोंग’ म्हटलं जायचं. पाकिस्तानी सैनिक एव्हाना सावध झाले होते. कुठेही दबा धरून त्यांचे ‘स्नायपर’ म्हणजे निशाणेबाज बसलेले असायचे.
एकदा रात्री हालचाल जाणवली म्हणून एका स्नायपरने घाबरून अंदाजानेच गोळी झाडली. दुर्दैवाने ती आपल्या ब्रिगेडियर दापोन धोंडूप ग्यातोत्संग यांना लागली. ते गतप्राण झाल्यानंतर त्यांच्या तुकडीने आपल्या तळावर असणाऱ्या अधिकाऱ्याला संपर्क साधला. त्यांनी ‘आगे बढो’ म्हटल्यावर तुकडी सरसावली. पाकिस्तानी मोर्चाला वेढा घालून त्यांच्यावर वादळासारखे तुटून पडले. पुढे पाकिस्तानी ठाणी, पूल, सैनिकी वाहनांचे ताफे सगळंच नेस्तनाबूत करत पाकिस्तानचं मोठं नुकसान या तुकडीने केलं आणि भारतीय लष्करासाठी चितगोंगची वाट मोकळी केली. शिवाय पाकिस्तानी लष्कराचे म्यानमारमध्ये पळून जाण्याचे रस्तेही बंद केले. 'रॉ'च्या नियंत्रणाखाली ही अभूतपूर्व कामगिरी पार पडली. इंदिरा गांधी यांच्या राजकारणाची प्रचिती सुद्धा या निमित्ताने आली. पूर्व पाकिस्तानमधून भारताचे तुकडे पाडण्याचं कारस्थान पाकिस्तान आणि चीन यांनी रचलं होतं, ते इंदिरा गांधी यांनी उद्ध्वस्त केलं.
विशेष म्हणजे, अनेक मोठमोठ्या कामगिरी करणाऱ्या 'रॉ'ची स्थापना करण्याचा निर्णय सुद्धा इंदिरा गांधी यांचा होता. 1974 साली भारताने राजस्थानमधील पोखरण इथं पहिली अणुचाचणी केली. ही चाचणी भारताच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. अणुचाचणी करण्याचा अंतिम निर्णय आणि त्याची राजकीय जबाबदारी पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचीच होती.
या अणुचाचणीला 'Smiling Buddha', असं नाव देण्यात आलं. भारत सरकारने ही चाचणी “Peaceful Nuclear Explosion” म्हणजेच शांततामय अणुस्फोट म्हणून जगासमोर मांडली. यामागचा उद्देश संरक्षणात्मक ताकद दाखवणं हा होता, युद्धाची धमकी देणे नव्हे. आता यात 'रॉ'ची भूमिका काय होती? 'रॉ'ची भूमिका गोपनीयता राखणं, माहिती बाहेर जाऊ न देणं आणि परदेशी गुप्तचर संस्थांचं लक्ष चुकवणं अशी होती. चाचणीबाबतची माहिती मर्यादित लोकांपर्यंत ठेवण्यात आली होती. पोखरणमधल्या हालचाली सामान्य लष्करी कामकाजासारख्या भासाव्यात, अशी काळजी घेतली गेली.
विशेषतः अमेरिकेची गुप्तचर संस्था'सीआयए'ला सुगावा लागू नये याची काळजी घेणं अतिशय आवश्यक होतं. आणि खरोखर 'सीआयए' या अणुचाचणीचा अंदाज बांधू शकली नाही. यामागे काही महत्त्वाची कारणे होती. त्या काळी उपग्रह तंत्रज्ञान आज इतकं प्रगत नव्हतं. तसंच अमेरिकेचं लक्ष प्रामुख्याने शीतयुद्ध, सोव्हिएत युनियन आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रश्नांकडे होतं.
भारताने चाचणी शांततामय असल्याचं सांगितल्यामुळे संशयही कमी निर्माण झाला. त्यामुळे 'सीआयए' पूर्णपणे गाफील राहिली, असं अनेक अभ्यासक मानतात. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताने अत्यंत गोपनीयतेने अणुचाचणी यशस्वी केली. 'रॉ'ची मदत गोपनीयतेपुरती मर्यादित होती, तर शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक बाजू सांभाळली. थोडक्यात इथेही भारताची रणनीती प्रभावी ठरली. ही अणुचाचणी भारताच्या स्वावलंबनाचा आणि राष्ट्रीय आत्मविश्वासाचा महत्त्वाचा टप्पा ठरली.
या संपूर्ण घटनाक्रमांतून एक गोष्ट ठळकपणे समोर येते—भारताची ताकद केवळ लष्करी बळात नाही, तर दूरदृष्टी, रणनीती आणि गोपनीय निर्णयक्षमतेत आहे. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताने दबावाला न झुकता राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिलं. गुप्तचर पातळीवर 'रॉ'ने केलेली आखणी, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘सीआयए’ला चकवा देणारी अणुचाचणी—हे सगळं भारताच्या आत्मविश्वासाचं प्रतीक ठरलं. दहशतवाद, युद्ध आणि जागतिक दबाव यांना सामोरं जाताना भारताने बुद्धी आणि शौर्य यांचा प्रभावी समन्वय साधला, हेच या इतिहासाचं सार आहे.
या घटनांमधून भारतीय राजकारण आणि गुप्तचर व्यवस्थेचा ताळमेळ समजतो. नव्हेतर दीर्घकालीन परिणामांचा विचार करून उत्तर देण्याची पद्धत यातून दिसते. इंदिरा गांधी यांनी घेतलेले निर्णय केवळ त्या क्षणापुरते नव्हते, तर भविष्यातील युद्ध, आंतरराष्ट्रीय दबाव आणि भारताची प्रतिमा यांचा विचार करून होते. योग्य वेळी दहशतवाद्यांना थेट प्रत्युत्तर तर दिलेच पण त्यांच्या मागची व्यवस्था उघडी पाडणं, शत्रूच्या तयारीत अडथळे आणणं आणि योग्य वेळी निर्णायक पाऊल उचलणं—हीच रणनीती भारतासाठी निर्णायक ठरली. 'रॉ' आणि राजकीय नेतृत्व यांचा हा समन्वय भारताच्या वाटचालीत महत्त्वाचा अध्याय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.