Deepak Salunkhe-Jayant Patil Sarkarnama
विशेष

दीपक साळुंखेंचे भाषण थांबवत जयंत पाटील म्हणाले, ‘टोपी-धोतरवाल्यांवर माझा जास्त विश्वास’

जयंत पाटील यांनी दीपक साळुंखे यांचे भाषण मध्येच थांबवले

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आजपासून (ता. २१ फेब्रुवारी) सोलापूरच्या (solapur) दौऱ्यावर आहेत. आपल्या खुमासदार शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या जयंत पाटलांचा आज सांगोलाकरांनाही पुन्हा प्रत्यय आला. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे यांचे भाषण थांबवत त्यांनी सांगोला शहराध्यक्ष, तथा पक्षाचे जुने जाणते निष्ठावंत कार्यकर्ते तानाजी पाटील (धोतर-टोपी पेहराव असलेले) यांना बोलायले लावले आणि माझा टोपी धोतरवाल्यांवर जास्त विश्वास असल्याचे सांगताच हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना मजूबत करण्याच्या उद्देशाने जयंत पाटील संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. आज आणि उद्या ते सोलापूर जिल्ह्यातील पक्ष संघटनेचा आढावा घेत आहेत. त्याची सुरुवात त्यांनी सांगोला येथून केली, त्यावेळी त्यांनी पाटील यांनी वरील वक्तव्य केले.

सांगोला तालुक्यातील पक्षाचे उपस्थित-अनुपस्थित पदाधिकाऱ्यांचा प्रदेशाध्यक्ष पाटील हे आढावा घेत होते. त्यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे यांचे भाषण सुरू होते. त्यांचे भाषण मध्येच थांबवत जलसंपदा मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी पाटील यांना बोलण्यास सांगितले. त्याबरोबरच पाटील म्हणाले की, ‘माझा टोपी-धोतरवाल्यांवर जास्त विश्वास आहे. सध्याचे व्हॉट्स ॲप वापरणारे कधी बदलतात, ते सांगता येत नाही, असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

जयंत पाटील यांच्या दौऱ्याच्या वेळी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख, युवतीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, पक्षनिरीक्षक सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे, महिला प्रदेश उपाध्यक्षा जयमाला गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, नागेश फाटे, रमेश बारसकर, अरुण आसबे, गणेश पाटील, दीपाली पांढरे, सुप्रिया गुंड, श्रेया भोसले, बाबूराव गायकवाड, तानाजी पाटील उपस्थित होते.

दरम्यान, सांगोला राष्ट्रवादीला त्यांनी सौम्या शब्दांत सुनावलेही. आपल्या (सांगोला) तालुक्यात कायमच इतरांना पाठिंबा देवाची सवय लागली आहे. आता पाठिंबा द्यायची सवय बंद करा. तालुक्याला जे जे हवे आहे, अत्यावश्यक आहे. ती सर्व कामे प्राधान्याने पूर्ण केली जातील. परंतु सांगोला तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष संघटना सक्षम, मजबूत करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी या वेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT