पुणे : घरची परिस्थिती हालाखीची मात्र पोलिस अधिकारी व्हायचंच असं स्वप्न बाळगलेल्या कैलास खासबागे (Kailas Khasbage) यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली आणि आपले पोलिस आधिकारी (PSI) होण्याचे स्वप्न पूर्ण केले. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुण्यात राहण्याचा खर्च झेपत नसल्याने कधी गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून काम केले तर कधी सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी केली आणि 25 मार्चला लागलेल्या पीएसआय परिक्षेच्या (MPSC) निकालात कैलास यांची सहायक पोलिस निरीक्षक म्हणून निवड झाली आहे. कैलासने संघर्ष करून मिळवलेल्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कैलास खासबागे हे सातारा जिल्ह्यातील मसवड तालुक्यातील आहेत. घरची परिस्थिती जेमतेम असून फक्त अर्धा एकर कोरडवाहू जमीनीवर घर चालवणे अवघड असल्याने कैलासच्या अशिक्षित असलेल्या आई-वडीलांना दुसऱ्यांच्या शेतात मजुरीचे काम करावे लागते. मात्र, कैलासला पोलिस अधिकारी व्हायचं, अशी त्याची जिद्द होती. दहावीत असतांना कैलासला त्याच्या शिक्षकांनी तु पोलीस होऊ शकतो, असे सांगितल्याने कैलासला अजून बळ मिळाले, असे कैलासने सांगितले. पीएसआय व्हायचं हे स्वप्न मनात ठेवत अकरावी आणि बारावी म्हसवड येथे सायन्समधून पास केले. पीएसआय परिक्षा देण्यासाठी पदवी लागते म्हणून पदवी अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन घेतले आणि ती पूर्ण होण्याआधीच लगेच परिक्षेच्या तयारीलाही लागला.
गावाकडेच परिक्षेसाठी काही पुस्तके विकत घेत तयारीही सुरू केली. मात्र त्याच्या लक्षात आलं की गावाकडे तयारी करून आपल्याला पोलीस अधिकारी होणे कठीण आहे. त्यासाठी आपल्याला नवीन पुस्तके आणि आभ्यासासाठी अभ्यासिका लावणे आवश्यक आहे. त्यामुळे कैलासने 2017 ला पुणे गाठले. मात्र, पुण्यात राहाणे परवडत नव्हते. घरची आर्थिर परिस्थितीही नाजूक असल्याने कैलासने अभ्यास करता करता बालेवाडी येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायला सुरुवात केली. रात्रपाळीला काम करायचे आणि सकाळी चार ते पाच तास झोप घ्यायची आणि त्यानंतर अभ्यास करायचा. त्याच काळात कैलासने जास्त पैशे मिळतात म्हणून गवंड्याच्या हाताखालीही काम काम केले तर कधी गॅस सिलेंडर वाटपाचेही काम केले. कैलासने घेतलेल्या कष्टाचे फळही त्याला लगेच पहिल्याच प्रयत्नात मिळाले आणि पीएसआय पूर्व परीक्षा तो पास झाला. मात्र, मुख्य परीक्षेत तो पास होऊ शकला नाही. त्यावेळी कैलासने आपल्या वडिलांना नापास झाल्याचे सांगितले. त्यावर वडीलांनी मानसिक आधार देत नापास झाल्यावर तु खचू नको पुन्हा प्रयत्न कर आम्ही तुला मदत करतो सांगितले आणि पुर्णवेळ अभ्यास करण्याचा आग्रह केला.
त्यानंतर कैलासने पूर्णवेळ मन लावून अभ्यास केला आणि 2019 च्या पीएसआय परीक्षेत पूर्व आणि मुख्य अशा दोन्हीही परीक्षा पास झाला. त्यावेळी स्वप्न पुर्ण होत आहे हे समेार दिसत असतांना शारीरिक चाचणी परिक्षा देता येईल का नाही असा प्रश्न तयार झाला. कारण कैलासला त्याच काळात पायाला दुखापतीने गाठले. पायाला दुखापत झाल्याने कैलास तब्बल नऊ महिने अंथरूणाला खिळून पडला. त्यातून बरे होतो तोच त्याला पुन्हा डेंगी झाला. मात्र, त्याच काळात कोरोना संक्रमण वाढल्याने शासनाला टाळेबंदी करावी लागली आणि दोन वर्ष या परिक्षेची शारीरिक चाचणी पुढे ढकलली. त्यामुळे कैलासला वेळ मिळाला आणि तो आजारातून बरा झाला. पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावर त्याने शारीरिक चाचणी सुद्धा मोठ्या जिद्दीने देत शंभर पैकी तब्ब्ल 93 गुण मिळवत मोठी झेप घेतली आणि पीएसआय होण्याचा मार्ग मोकळा केला. नुकताच 25 मार्चला लागलेल्या पीएसआय परिक्षेच्या निकालात कैलास खासबागे यांची पीएसआय म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीवरून त्यांचे सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
दरम्यान, कैलासचे संपूर्ण शिक्षण हे साताऱ्यातील म्हसवड तालुक्यातच झाले आहे. आपल्या यशाबद्दल 'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतीत कैलास म्हणाला की, "मनात जिद्द असली की काहीपण होऊ शकते. माझे आई-वडील हे अशिक्षित असल्याने अनेकदा त्यांना हिनवले जात होते. तुम्हीच शिकले नाहीत तर तुमचा मुलगा काय शिकणार, असे टोमणेही आई-वडीलांना काहींकडून मारले जात होते. हे सर्व मी त्या संघर्षाच्या काळात बघत होतो. यातुन मी अजून जिद्दीने अभ्यास केला आणि आज हे यश मला मिळवता आले आहे. या प्रवासात मला अनेक मित्रांनी आणि कुटुंबीयाचे सहकार्य लाभले. या सर्वांच्या प्रयत्नाने मला माझे स्वप्न पूर्ण करता आले," असे कैलासने नम्रपणे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.