Kangana Ranaut  Sarkarnama
विशेष

Kangana Ranaut News : विरोधकांवर सोडलेल्या 'क्वीन अस्त्रा'ने दिशा बदलली; भाजपचाच वेध घेणार?

Political News : कंगना रनौत यांच्या इमर्जन्सी या चित्रपटावरूनही वाद निर्माण झाला असून, चित्रपटात शीख समुदायाचे प्रतिमाहनन करण्यात आल्याचे प्रकरण न्यायालयात गेले आहे.

अय्यूब कादरी

Mumbai News : आता भाजपच्या खासदार असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत आणि वाद यांचे नाते घट्ट आहे. कंगना रनौत यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपला अनेकवेळा दोन पावले मागे यावे लागले आहे. आता कंगना यांच्या इमर्जन्सी या चित्रपटावरूनही वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात शीख समुदायाचे प्रतिमाहनन करण्यात आल्याची याचिका न्यायालयात दाखल झाली आहे.

भारताचे पहिले पंतप्रधान सुभाषचंद्र बोस! त्या जितक्या सफाईदारपणे पडद्यावर विविध व्यक्तीरेखा साकारतात, तितक्याच सफाईदारपणे असे खोटे बोलून वादही निर्माण करतात. भाजपने आपल्या भात्यात आणखी एक वाचाळास्त्र भरले आहे. विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी हे अस्त्र भाजपने (Bjp) आपल्या भात्यात भरले असले तरी त्या अस्त्राने दिशा बदलली असून ते बूमरँग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कंगना रनौतच ती प्रसिद्ध अभिनेत्री आणि आता भाजपच्या खासदार. कंगना रनौत (Kangana Ranaut) यांच्या इमर्जन्सी या चित्रपटावरूनही वाद निर्माण झाला असून, चित्रपटात शीख समुदायाचे प्रतिमाहनन करण्यात आल्याचे प्रकरण न्यायालयात गेले आहे.

वाचाळ नेते नाहीत, मग तो पक्ष कसला? असे म्हणण्याचे सध्याचे दिवस आहेत. त्यातल्या त्यात उजव्या विचारसरणीच्या पक्षांमध्ये अशा वाचाळवीरांचा भरणा असल्याचे दिसून येईल. कंगना यांच्या रूपाने भाजपमध्ये अशा आणखी एका नेत्याची भर पडली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने कंगना यांना हिमाचल प्रदेशातील मंडीमधून उमेदवारी दिली होती. कंगणा यांनी विजय मिळवला. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची भाजपला माहिती नसेल, अस म्हणता येणार नाही. सनसनाटी निर्माण करण्यासाठी, माध्यमांमध्ये जागा मिळवण्यासाठी, विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी असे वाचाळ नेते सर्व पक्षांना हवे असतात. भाजप त्यात आघाडीवर आहे, फरक इतकाच.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भारताचे पहिले पंतप्रधान असा उल्लेख कंगणा यांनी एका टीव्ही शोमध्ये केला आणि वाद ओढवून घेतला. अभिनयाच्या बळावर बॉलीवूडची क्वीन अशी ओळख निर्माण केलेल्या, चित्रपटसृष्टी गाजवलेल्या कंगना यांचे सामान्यज्ञान इतकेही कच्चे असू शकत नाही.

काँग्रेस पक्ष आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरील रागातून त्यांनी ते वादग्रस्त वक्तव्य केले असणार. शेतकऱ्यांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनाबाबतही कंगणा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. या आंदोलनादरम्यान अत्याचार आणि हत्या झाल्या होत्या, असे विधान त्यांनी केले. शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी महिलांना प्रत्येकी शंभर रुपये मिळाले होते, हे वादग्रस्त वक्तव्य कंगना यांना खूपच महागात पडले. विमानतळावर सीआएसएफच्या एका महिला कॉन्स्टेबलने कंगणांच्या कानशिलात लगावली होती.

आंदोलनातील शेतकऱ्यांचा उल्लेख कंगना रनौत यांनी खलिस्तानी असाही केला होता. देशाचे नेतृत्व, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कणखर नसते तर पंजाब हे बांग्लादेश बनले असते, या कंगना यांच्या वक्तव्यावरून गदारोळ माजला होता. पंजाबमध्ये ड्रग्स माफिया, खलिस्तान समर्थक टोळ्या फोफावत आहेत. केंद्र सरकारने कृषी विधेयक मागे घेतले नसते तर शेतकरी काहीही करू शकले असते. समाजात असंतोष निर्माण करणाऱ्या कंगणा यांच्या अशा वक्तव्यांमुळे भाजपला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला होता.

अशी वादग्रस्त वक्तव्ये त्या बिनधास्तपणे करत असतात. याचा भाजपला फायदा होतो का, हा महत्वाचा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीत अशा वाचाळवीरांमुळे भाजपला महाराष्ट्रात फटका सहन करावा लागला आहे. भाजप अशा नेत्यांना मुद्दाम पक्षात घेतो, त्यांना बोलण्याचे स्वातंत्र्य देतो, असा संदेश समाजात गेला आहे.

गेल्या दहा वर्षांसारखी परिस्थिती आता राहिलेली नाही. त्यामुळे अशी वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्यांचा कोणत्याही पक्षाला फायदा होण्याचे दिवस मागे पडले आहेत. शेतकरी आंदोलनाबाबत कंगना यांच्या वक्तव्यामुळे केंद्र सरकारची गोची झाली, सरकारला स्पष्टीकरण द्यावे लागले. शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली ती कायम राहणार आहे.

आंदोलनातील शेतकरी देशात दहशत निर्माण करण्याचे काम करत आहे. मला काय म्हणायचे आहे, ते सर्वांना माहीत आहे, काही लोक चुकीची माहिती पसरवत आहेत, असे ट्वीट कंगना यांनी केले. त्यावर वाद सुरू झाला. मी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्याचे सिद्ध करा, असे आव्हान त्यांनी पुन्हा दिले होते.

कंगना यांनी अशी सारवासारव केली, मात्र वादग्रस्त ट्वीट काही डिलीट केले नाही. आपण वक्तव्यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विधेयकाविषयी अफवा पसरवणाऱ्यांना मी दहशतवादी म्हटले होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते.

पंजाबी अभिनेता, गायक दिलजित दोसांज याला टॅग करून कंगना रनौत यांनी पुन्हा एका वादाला फोडणी दिली होती. खलिस्तान हा व्हायरल आजार आहे, असे अनेक पंजाबी सेलिब्रिटीजनी मला सांगितले आहे. भारत सरकारने त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे, अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती.

वारिस पंजाब या संघटनेचे नेते अमृतपाल सिंह यांच्या विरोधातील कारवाईशी या पोस्टचा संबंध होता. दिलजित दोसांजला टॅग केल्यामुळे दोघांत वाद सुरू झाला होता. त्यामुळे कंगना यांच्यावर टीका झाली होती. दिलजित धमक्या द्यायचा, त्याचे खलिस्तानी समर्थकही खूप बोलायचे, ते आता का शांत आहेत, असे म्हणत कंगना यांनी वाद पुढे रेटला होता.

कंगना यांनी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीऱशी केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंगणा यांनी त्यांच्यावर मर्यादा सोडून टीका केली होती. अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर त्या अधिकच आक्रमक झाल्या होत्या. केंद्रातील भाजप सरकारला पाठिंबा मिळेल, सरकारचे समर्थन होईल, अशी वक्तव्ये कंगना यांच्याकडून केली जातात. मात्र, आता कंगणांची वादग्रस्त वक्तव्ये भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंदोलनातील शेतकऱ्यांनी कंगणांच्या वक्तव्यांविरोधात एकजूट दाखवली आहे.

इमर्जन्सी हा कंगना रनौत यांचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यावरूनही वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात शीख समाजाचे प्रतिमाहनन करण्यात आले आहे, अशी याचिका चंदीगड जिल्हा न्यायालयात दाखल झाली आहे. या याचिकेवर 5 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. हा चित्रपट 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र सेन्सार बोर्डाने त्याला स्थगिती दिली आहे. ही सर्व प्रकरणे भाजपवर बूमरँग होण्याची शक्यता आहे. विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी भात्यात भरलेले अस्त्र आता भाजपचाच वेध घेऊ पाहत आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT