Mahayuti-Mahavikas Aghadi  Sarkarnama
विशेष

Vidhan Parishad Election : विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार का? महायुती-महाआघाडीचे असे आहे गणित...

Vijaykumar Dudhale

Mumbai, 05 July : विधान परिषदेच्या 11 जागा बिनविरोध होणार की निवडणूक लागणार, याचा फैसला आज (ता. 05 जुलै) दुपारपर्यंत होणार आहे. अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात उतरल्याने ही निवडणूक लागली असून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे माघार कोण घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुतीचे नऊ उमेदवार निवडून येतील, इतके संख्याबळ आमच्याकडे आहे, त्यामुळे आम्ही माघार घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे. आता महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) कारभारी कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

विधान परिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election) बिनविरोध होईल, अशी चर्चा असतानाच एकूण 11 जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात उतरवले गेले आहेत, त्यामुळे विधान परिषदेची ही निवडणूक लागली आहे. मात्र, त्यानंतरही महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यात कितपत यश मिळते, यावरच विधान परिषदेच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी भाजपकडून पाच उमेदवार रिंगणात उतरवले असून महायुतीमधील शिवसेनेने दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दोन असे महायुतीकडून नऊ उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडीनेही तीन उमेदवार दिले आहेत. काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना पुन्हा उमेदवारी दिली असून शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून उद्वव ठाकरेंनी माईंडगेम खेळला आहे. त्यात किती यश येते, हे निकालानंतर स्पष्ट होईल.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या पक्षाचा उमेदवार न देता शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. आपल्या बारा आमदारांचा पाठिंबा त्यांनी पाटील यांना जाहीर केला आहे. विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता निवडून येण्यासाठी 23 आमदारांचे संख्याबळ आवश्यक असून ही संख्या पूर्ण करणारा उमेदवार आमदार म्हणून निवडून येणार आहे.

विधानसभेत सध्या भाजप 103, शिंदे सेना 39, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 40 आमदारांचे संख्या बळ आहे. याशिवाय या तीनही पक्षांना काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. भाजपला आपले पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी 115 आमदारांचा पाठिंबा लागणार आहे, त्यांना आणखी 12 मते मिळावी लागणार आहेत.

शिंदे सेनेला दोन आमदार निवडून आणण्यासाठी 46 मतांची आवश्यकता आहे, त्यांच्याकडे 39 आमदार आहेत, त्यांना आणखी 7आमदारांची गरज भासणार आहे, तर अजित पवारांना सहा आमदारांची आवश्यकता आहे. काँग्रेसचे दोन आमदार सध्या अजित पवार गटासोबत असल्याची चर्चा आहे, त्यामुळे महायुतीचे नेते आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी कशी तजबीज करतात, हे पाहावे लागणार आहे.

महाविकास आघाडीतील काँग्रेसकडे 37 मते आहेत, त्यांनी एकच उमेदवार दिला आहे. त्यांचा एक उमेदवार निवडून येऊन 14 मते शिल्लक राहतात, ती मतं काँग्रेस उद्धव ठाकरेंचे उमेदवार नार्वेकर यांना देणार आहेत. म्हणजे शिवसेनेकडे स्वतःची 15 अधिक काँग्रेसची 14 अशी 29 मते होतात, याशिवाय त्यांच्यासोबत एक अपक्ष आमदारही आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्याकडील 12 मते हे जयंत पाटील यांना देण्यात आली आहेत. तसेच, समाजवादी पार्टी आणि माकपची काही मतेही पाटील यांना मिळणार आहेत. त्यानंतरही त्यांना आणखी सात मते लागणार आहेत. त्याची तजबीज जयंत पाटील यांना करावी लागणार आहे.

एकंदरीतच सर्व पक्षांना आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी मते गोळा करावी लागणार आहेत. त्यात कोण किती प्रमाणात यशस्वी होतो, हे पाहावे लागणार आहे. तत्पूर्वी कोण माघार घेणार, याकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT