amol kirtikar sunetra pawar archana patil omraje nimbalkar supriya sule gajanan kirtikar  sarkarnama
विशेष

Lok Sabha Election 2024 : हे कसलं राजकारण? कुणाची घरं फुटली, कुठं नाती दुभंगली!

Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्राला नात्या-नात्यांमधल्या या लढती काही नवीन नाहीत. या लोकसभा निवडणुकीतही अशाच काही लढती पाहायला मिळणार आहेत...

Akshay Sabale

- संदीप चव्हाण

कुठं कुणाचा नवरा एका पक्षात तर त्याची बायको दुसऱ्या पक्षात, कुठं कुणाचा बाप एका पक्षात तर त्याचा मुलगा दुसऱ्या पक्षात, कुठं कुणाचा भाऊ एका पक्षात तर त्याची बहीण दुसऱ्या पक्षात, कुठं कुणाचा काका एका पक्षात तर त्याचा पुतण्या दुसऱ्या पक्षात, कुठं कुणाचा सासरा एका पक्षात तर त्याची सून दुसऱ्या पक्षात; कुठं भावजयीसमोर दीर उभा तर कुठं नणंदेसमोर भावजय उभी! भाऊ-भाऊदेखील एकमेकांविरुद्ध निवडणूक रिंगणात!

या राजकारण्यांना बाप-लेक, भाऊ-भाऊ, बहिणी-बहिणी सासरा-सून, नणंद-भावजय, दीर-भावजय अशा नात्यांची वीण उसवून मिळतं तरी काय? आणि हे सर्व का व कशासाठी? निव्वळ राजकारणासाठी? अर्थात, महाराष्ट्राला नात्या-नात्यांमधल्या या लढती काही नवीन नाहीत. या लोकसभा निवडणुकीतही अशाच काही लढती पाहायला मिळणार आहेत; पाहूयात कोणत्या मतदारसंघांत लढल्या जाताहेत नात्या-नात्यांमधल्या लढती?

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रात यापूर्वी झालेल्या नात्या-नात्यांमधल्या लढती!

यापूर्वीच्या विधानसभा-लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या नात्या-नात्यांमधल्या काही लक्षवेधी लढती तुम्ही आजही विसरला नसाल. उदाहरणार्थ, बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे या बहीण-भावात झालेली लढत, उस्मानाबाद (म्हणजे आताचे धाराशिव) येथील पवन राजेनिंबाळकर विरुद्ध पद्मसिंह पाटील या चुलत भावांमध्ये झालेली लढत, त्यानंतर त्यांच्याच मुलांमध्ये म्हणजे ओमप्रकाश राजेनिंबाळकर विरुद्ध राणाजगजितसिंह पाटील या चुलत भावांमध्ये तीनदा झालेली लढत, माढा येथे विजयसिंह मोहिते-पाटील विरुद्ध प्रतापसिंह मोहिते-पाटील या सख्ख्या भावांमध्ये झालेली लढत, लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे शिवाजीराव पाटील-निलंगेकर विरुद्ध संभाजी पाटील-निलंगेकर या आजोबा-नातवात दोनदा झालेली लढत, त्यानंतर अशोक पाटील-निलंगेकर विरुद्ध संभाजी पाटील-निलंगेकर या काका-पुतण्यात दोनदा झालेली लढत, लातूर जिल्ह्यातच त्रिंबक भिसे विरुद्ध आशा भिसे ही दीर -भावजय अशी झालेली लढत, अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे यशोमती ठाकूर विरुद्ध संयोगिता निंबाळकर या सख्ख्या बहिणी-बहिणींमध्ये झालेली लढत, नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे अनिल देशमुख विरुद्ध आशिष देशमुख या काका-पुतण्यात झालेली लढत, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे संजय देवतळे विरुद्ध आसावरी देवतळे ही दीर -भावजय अशी झालेली लढत... अशा नात्या-नात्यांमधल्या कितीतरी लढती आपल्याला सांगता येतील.

कीर्तिकर बाप-बेट्यात कटुता; वडील एका पक्षात, मुलगा दुसऱ्या पक्षात !

राजकारणामुळं तिकडं मुंबईत गजानन कीर्तिकर ( Gajanan Kirtikar ) आणि अमोल कीर्तिकर या बाप-बेट्यात कटुता आली. बाप शिवसेना ठाकरे गटात तर मुलगा शिवसेना शिंदे गटात! मुलगा अमोल कीर्तिकर मुंबई उत्तर पश्चिममधून ठाकरे गटाकडून उभा राहिलाय. आता शिवसेना शिंदे गटानं या जागेवर मुलाविरुद्ध बापाला उभं करू नये म्हणजे मिळवली.

धाराशिवमध्ये दीर-भावजय आमनेसामने!

धाराशिव येथील राजेनिंबाळकर आणि पाटील या दोन घराण्यातील कौटुंबिक आणि राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. 2004 पासून या दोन्ही घराण्यांमध्ये राजकीय लढती चालत आल्या आहेत. या मतदारसंघात दोन चुलत भावांनंतर आता ओमप्रकाश राजेनिंबाळकर ( Omprakash Raje Nimbalkar ) विरुद्ध अर्चना राणाजगजितसिंह पाटील म्हणजे दीर-भावजय अशी लढत होणार आहे. राजेनिंबाळकर-पाटील या उभय घराण्यात ही सलग पाचवी लढत होणार आहे.

बारामतीत नणंद-भावजय यांच्यात आमनासामना!

बारामतीत मात्र यंदा पहिल्यांदाच पवार कुटुंबातील संघर्ष इतका टोकाला गेलाय की आता एकाच घराण्यातील नणंद- भावजय एकमेकींविरुद्ध निवडणूक रिंगणात उभ्या ठाकल्या आहेत. जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादीची दोन शकलं होऊन शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन भाग पडले. अजित पवारांनी महायुतीकडून पत्नी सुनेत्रा पवार यांना तर शरद पवारांनी कन्या सुप्रिया सुळे यांना निवडणूक रिंगणात उतरवलं. ते म्हणतात ना, घर फिरलं की घराचे वासेही फिरतात, तसंच काहीसं पवार घराण्याचं झालंय.

एकूणच काय तर या राजकारणानं नात्या-नात्यांमधला ओलावा संपवून टाकलाय. सत्तेसाठी संघर्ष आणि संघर्षातून सत्ता या समीकरणापोटी जो तो नात्यांची वीण उसवत चाललाय. जिथं नाती तुटतात, भावना आटतात असलं राजकारण तरी काय कामाचं ? एकवेळ नळावरची भांडणं मिटतील, बांधावरचे तंटे सुटतील पण राजकारणामुळं निर्माण झालेली नात्यांमधली दरी वाढतच चाललीये आणि ती भविष्यातही वाढतच जाणार? हे कसलं राजकारण? कुणाची घरं फुटली, कुठं नाती दुभंगली! पण काय करणार हे तर चालतच राहणार, हे तर चालतच राहणार...

( Edited By : Akshay Sabale )

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT