Shivajirao Adhalrao Patil-Amol Kolhe Sarkarnama
विशेष

Amol kolhe Vs Shivajirao Adhalrao Patil : आढळराव-पाटलांचा उताविळपणा कोल्हेंना दुसऱ्यांदा दिल्लीत पाठविणार?

भरत पचंगे : सरकारनामा

Pune News, 2 June : राष्ट्रवादीच्या विरोधात खासदारकीची हॅटट्रीक करूनही चौथ्यांदा खासदारकीसाठी राष्ट्रवादीकडूनच ( Ncp ) गुडघ्याला बाशिंग बांधणारे माजी खासदार शिवाजीराव आढळरावांना हाच उतावळपणा अंगलट येत असल्याचा शिरुर लोकसभा मतदारसंघाचा ( Shirur Lok Sabha Constituency ) एक्झिट पोल सांगतोय.

पर्यायाने आढळरावांच्या याच उतावळपणामुळे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे ( Amol Kolhe ) हे दुसऱ्यांदा दिल्लीत पोहचत असल्याचा अंदाज एक्झिट पोल सांगत आहे. 2004 मध्ये तत्कालीन खेड लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे थेट लोकसभा निवडणुकीला उभे राहणारे शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी आपल्या खासदारकीचा 'श्रीगणेशा' केला.

तत्पूर्वी कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक राजकारणात न पडलेले आढळराव त्यांचे त्यावेळीचे मित्र व तत्कालीन मंत्री दिलीप वळसे-पाटील ( Dilip Walse Patil ) यांच्याविरोधात इरेला पेटून राजकारणात आले. त्याआधी आढळराव-पाटलांना राष्ट्रवादीकडूनच उभे राहण्याची ऑफर दस्तुरखुद्द जेष्ठ नेते शरद पवार यांच्याकडूनच होती.

मात्र, राष्ट्रवादीच्या पक्षांतर्गत राजकारणाने तिकीट कापाकापीत त्यांच्या उमेदवारीचा घात झाल्याने त्यांनी शिवसेनेचे 'धनुष्यबाण' हाती घेवून पुढे मतदारसंघाची पुनर्रचना होऊनही नव्याने अस्तित्वात आलेल्या शिरुर लोकसभा मतदारसंघातून हॅटट्रीक केली. ही हॅटट्रीक मात्र त्यांच्या चौथ्या यशात अडसर ठरली ती अमोल कोल्हेंच्या रुपाने. 2019 मध्ये कोल्हेंनी आढळरावांचा तब्बल 56 हजारांच्या मताधिक्यानं पराभव केला.

अर्थात गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यावर, यावेळी तर चक्क कोल्हे हे घड्याळाच्या विरोधात तर आढळराव स्वत: घड्याळाचे चिन्ह घेवून उभे राहिले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची उभी फूट शिरुरमधील राजकारणाला बरीच कलाटणी देणारी ठरली. अशाही परिस्थितीत आढळरावांनी पक्षांतर करुन राष्ट्रवादीच्या घड्याळाला हातात बांधण्याचा निर्णय घेतला.

अर्थात जेष्ठ नेते शरद पवार यांच्या नवीन 'तुतारी' चिन्हाची चलती यावेळी मतदारसंघात चांगली राहिली आणि अपेक्षेप्रमाणे शिरुर लोकसभा मतदारसंघाचा एक्झिट पोल हा अमोल कोल्हेंना पुन्हा शिरुरचा खासदार म्हणून दिल्लीत पाठविणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचे दाखवतोय.

दगा फटका नेत्यांचा, मतदारांचा आणि राष्ट्रवादीचाही!

शिवसेनेत तब्बल 20 वर्षे काढल्यानंतर आढळरावांचा स्वभावही शिवसैनिकासारखा एकदम आक्रमक झाला होता. त्यामुळे कुठल्याही राजकीय मुद्द्यांवर टोकदार भांडायचे त्यांनी कधी कमी केले नाही. शिरुर लोकसभा मतदारसंघात खासदार शिवसेनेचा आणि सहापैकी कमाल आमदार राष्ट्रवादीचे अशी स्थिती नेहमी राहिली.

त्यामुळे इथे आढळराव-दिलीप वळसे पाटील, आढळराव-दिलीप मोहिते पाटील, आढळराव-विलास लांडे, आढळराव-अशोक पवार अशी कायम राजकीय कुरघोडीची जुगलबंदी चालू राहायची. याचा फटका आढळरावांना असा बसलेला दिसतोय की, अगदी निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होऊनही त्यांची राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर केल्याने आत्तापर्यंत भांडलेले राष्ट्रवादीचे जुने नेते वरकरणी जुळलेले दिसत होते.

प्रत्यक्षात त्यांचे कार्यकर्ते जुळलेले चित्र यावेळी खूप कमी दिसत होते. आधीच शिवसेना तुटलेली, भाजपाकडून मतदान किती होईल, त्याचा भरोसा नाही आणि राष्ट्रवादीकडून मतदान मनापासून होईलच याची शाश्वती नसल्याचे चित्र निवडणूक प्रचारादरम्यान चर्चेत राहिले.

गायब खासदार पण शरद पवारांची तुतारी चालली!

कोल्हे हे मतदारसंघात येतच नाहीत, ते गायब खासदार म्हणून आढळरावांच्या प्रचार यंत्रणेकडून त्यांना चांगलेच ट्रोल केले गेले. अर्थात कोल्हेंनी या आरोपांना चांगली उत्तरे दिली असली तरी यावेळीची निवडणूक ही शरद पवार आणि त्यांच्या तुतारी चिन्हाभोवती फिरत राहिली. त्यामुळे आढळरावांना यावेळी तुतारी भोवणार नक्की झाले आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT