Maharashtra Politics Sarkarnama
विशेष

Maharashtra Politics: निवडणुकीत नेते वैर मिटवून एकत्र; कार्यकर्ते, मात्र वाऱ्यावर...

Lok Sabha Election 2024:नेते स्वार्थी झाले, पलटूराम बनले, त्यांनी नीतीमत्ता गुंडाळली, तेवढे नाही, पण काही प्रमाणात, मग त्यांचे कार्यकर्तेही प्रोफेशनल वागू लागले, तर त्यात नवल काय?

उत्तम कुटे

Pimpri: निवडणूक मग ती कोणतीही असो स्वार्थासाठी विभिन्न राजकीय पक्षातील नेते (Maharashtra Politics) आपले कट्टर वैर जणू काही ते नव्हते या थाटात मिटवून घेतात. दुसरीकडे, एका पक्षात असूनही पटत नसलेले पुढारीही निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) सहजतेने एक होतात. मात्र, एक होणाऱ्या अशा नेत्यांच्या कार्यकर्त्यांची खरी गोची होते, त्यांच्यातील हे वैमनस्य सहसासहजी संपत नाही, याकडे कुणाचे लक्ष नसते. त्याची कुणाला खंत वा खेदही नसतो.

आपल्या नेत्यासाठी प्रतिस्पर्ध्याचे डोके फोडायला तयार असणारा त्याचा कार्यकर्ता, हा मात्र या नेत्यांच्या दिलजमाईत नाहक भरडला जातो. त्याची अवस्था ना घरका, ना घाटका अशी होते. यामुळे पूर्वीपेक्षा निष्ठावान कार्यकर्त्यांची संख्या आता कमी झाली आहे.

निवडणूक प्रचारात पूर्वी उमेदवार हे आपल्या कार्यकर्त्यांना फक्त भेळभत्ता देत होते. त्यावरही ते खूष होऊन जोमाने प्रचार करायचे. आता, मात्र दररोजचा रोजगार, दारू, बिर्याणीशिवाय प्रचाराला ते येत नाहीत. राजकीय सभांची सध्या हीच स्थिती आहे. भाडोत्री प्रेक्षक त्यासाठी आणावे लागत आहेत. ही परिस्थिती नेत्यांचा स्वार्थ, त्यांनी, त्यांच्या पार्टीने सत्तेसाठी तत्त्वांना दिलेली तिलांजली यामुळे ओढवली आहे. नेते स्वार्थी झाले,पलटूराम बनले, त्यांनी नितीमत्ता गुंडाळली, तेवढे नाही, पण काही प्रमाणात, मग त्यांचे कार्यकर्तेही प्रोफेशनल वागू लागले, तर त्यात नवल काय?

 (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपल्या स्वार्थासाठी (निवडणुकीतील विजय) गेली काही वर्षे नाही,तर एक व दोन दशकांचे वैरही काही नेत्यांनी मिटवून घेतल्याची ठळक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. गत लोकसभेला पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि भाजपचे लक्ष्मण जगताप यांच्यातील दहा वर्षापासूनचे हाडवैर अप्पांनी मिटवून घेतले. परिणामी पवार कुटुंबातील सदस्य प्रतिस्पर्धी असूनही ते २ लाख १४ हजाराच्या लीडने निवडून आले. या वेळी ते खासदारकीच्या हॅटट्रिकवर आहेत. म्हणून त्यांनी पुन्हा आपल्या राजकीय विरोधकांशी (अजित पवार राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके आणि माजी राज्य मंत्री भाजपचे बाळा भेगडे) जुळवून घेत नुकतीच हातमिळवणी केली. या दोघांनी ही जागा आपल्या पक्षानेच लढविण्याची मागणी लावून धरली होती.

शेजारच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातही तेथील महायुतीचे उमेदवार (शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले) शिवाजीराव आढळऱाव-पाटील यांनीही आपल्या विजयासाठी कट्टर राजकीय शत्रू आणि खेड-आळंदीचे आमदार राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते पाटील यांच्याशी असलेले आपले वीस वर्षांचे वैर मिटवले. मांडवली केली. आढळरावांना तिकीट दिले, तर घरी बसेन,पण त्यांचे काम करणार नाही, अशी भाषा करणाऱ्या मोहिते यांनीही तेच केले. तेच आता आढळऱावांच्या विजयासाठी फिरत आहेत, प्रचार करीत आहेत.

गत विधानसभेतील पराभवाचा बदला घेण्य़ासाठी माजी मंत्री तथा शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी अजित पवार यांचा या लोकसभेला बारामतीत सूड घेण्याची भाषा केली. तेथील महायुतीच्या उमेदवार आणि अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात अपक्ष म्हणून उभे राहण्याची तुतारी फुंकली. मात्र, त्यांचे हे बंड नंतर थंड झाले. ते का झाले ते पडद्यामागे गुपित राहिले. अशा एक ना अनेक राजकीय नेत्यांनी आपले वैर ही बहूतांश स्वताच्या, तर काहींनी पार्टीसाठी मिटवून घेतले. पण, त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गोची झाली. कारण त्यांनी आतापर्यंत एकमेकांविरोधात काम केलेले असते. आता त्यांना जूळवून घेणे भाग पडते. ते खूप कठीण असते. कारण त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांची डोकीही फोडलेली असतात.

राजकारणात कुणीही कुणाचा कायम शत्रू वा मित्र राहत नसल्याने बदलत्या राजकीय समीकरणात मित्र झालेले हे नेते पुन्हा शत्रू होतात, त्यावेळी या कार्यकर्त्यांना पुन्हा आपल्या मित्रांविरुद्धच तलवार उपसण्याची पाळी येते. तेव्हा या नेत्यांच्या कार्यकर्त्यांची अवस्था इकडे आड, तिकडे विहीर अशी अत्यंत बिकट होते. ती नुकतीच शिवतारेंनी अजित पवारांविरुद्ध आपली तलवार म्यान केल्यानंतर त्यांच्या एका कार्यकर्त्याने लिहिलेल्या निनावी पत्रातून नेमकी व्यक्त झाली आहे.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT