raju shetti prakash awade dhairyasheel mane sarkarnama
विशेष

Hatkanangale Loksabha Election 2024 : राजू शेट्टी की माने, प्रकाश आवाडेंची उमेदवारी कोणाच्या पथ्यावर?

Prakash Awade News : आवाडेंच्या उमेदवारीमुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून केला जाणार काय, याकडे आता लक्ष असणार आहे.

सरकारनामा ब्युरो

आमदार प्रकाश आवाडे ( Prakash Awade ) यांच्या संभाव्य उमेदवारीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ( Hatkanangale Loksabha Constituency ) लढतीचे चित्र बदलणार आहे. त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यास महायुतीचे उमदेवार धैर्यशील माने ( dhairyasheel mane ) यांची मोठी गोची होणार आहे, तर मत विभागणीचा फायदा महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील ( Satyajeet Patil ) यांना होणार आहे. त्यामुळे आवाडे यांच्या या धक्कातंत्रामुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे. त्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून केला जाणार काय, याकडे आता लक्ष असणार आहे. दुसरीकडे त्यांच्या उमेदवारीला साखर कारखानदारांचीही मदत मिळण्याची शक्यता आहे, तर भाजपसह विविध पक्षांतील अदृश्य शक्तीचे पाठबळ मिळाल्यास या मतदारसंघातील होणारी बहुरंगी लढत प्रचंड चुरशीची पाहावयास मिळणार आहे.

पंधरा वर्षांपूर्वी आमदार प्रकाश आवाडे ( Prakash Awade ) यांचे पुत्र राहुल यांनी लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Election 2024 ) लढविण्याची तयारी केली होती; मात्र त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. आता पुन्हा त्यांचे नाव चर्चेत आले होते. महाविकास आघाडी, महायुतीकडून त्यांनी उमेदवारीची चाचपणी केल्याची चर्चा होती; पण उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली होती. आता त्यांच्याऐवजी स्वतः आमदार आवाडे हे निवडणूक रिंगणात उत्तरत असल्यामुळे या मतदारसंघातील ही सर्वात धक्कादायक घडामोड आहे. मुळात ते भाजपचे सहयोगी आमदार असल्याने त्यांचा महायुतीचे उमेदवार माने यांना पाठिंबा राहील, असाच सर्वसाधारण अंदाज व्यक्त केला जात होता; मात्र पारंपरिक विरोधक असलेल्या माने यांच्याशी त्यांचे राजकीय सूर जुळल्याचे दिसले नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी थेट खासदार माने यांच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करीत लक्ष वेधले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीतील घडामोडींना वेग येत होता; मात्र गेल्या काही दिवसांपासून आमदार आवाडे यांच्या गोटात शांतता दिसत होती; मात्र राजकीय भूकंप करीत त्यांनी अनेकांना जबर हादरे दिले. त्यांनी आज आपली उमेदवारी जाहीर करीत या मतदारसंघातील अन्य उमेदवारांचे गणितच बिघडवून टाकले आहे. दुरंगी, तिरंगी, चौरंगी ते बहुरंगी असे लढतीचे चित्र होताना दिसत आहे. त्यांच्या उमेदवारीचा सर्वाधिक फटका महायुतीचे उमेदवार माने यांना बसण्याची शक्यता अधिक दिसत आहे. माने यांची प्रमुख मदार असलेल्या इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले मतदारसंघात आवाडे यांचे प्राबल्य आहे.

या मतदारसंघात मते घेताना माने यांची मोठी दमछाक होऊ शकते, तर त्याचा नकळत फायदा महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील-सरूडकर यांना होणार आहे. जातीय समीकरणाचा विचार केल्यास जैन समाजातील मतांच्या विभागणीची झळ माजी खासदार राजू शेट्टी यांनाही बसणार आहे; मात्र आमदार आवाडे यांची उमेदवारी कायम राहिल्यास असे चित्र पाहावयास मिळणार आहे

साखर कारखानदारांचे पाठबळ

दोन-तीन दिवसांत आमदार आवाडे यांनी शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर व पन्हाळा-शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांची भेट घेतली होती. या भेटीचे गुपीत या निमित्ताने आता उघड झाले आहे. आमदार आवाडे यांच्यासह आमदार यड्रावकर व कोरे हे दोघेही साखर कारखानदार आहेत. त्यांच्यासह अन्य काही कारखानदारांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठबळ आवाडे यांना मिळाल्यास या मतदारसंघात प्रचंड चुरशीचे चित्र पाहावयास मिळू शकते.

उमेदवारीला अनेक कंगोरे

आमदार आवाडे यांच्या संभाव्य उमेदवारीला अनेक कंगोरे आहेत. भाजपमध्ये रखडलेला प्रवेश, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीची साशंकता, शासन पातळीवर रखडलेले महत्त्वाचे प्रस्ताव, महापालिकेतील त्यांच्या विकासकामांसाठी होत असलेला अडथळा या सर्वांचा परिपाक म्हणूनही त्यांच्या उमेदवारीकडे पाहिले जात आहे.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT