Sharad Pawar News : शरद पवार म्हणाले 'कौन है मुन्ना' अन् 2004 च्या लोकसभेचं वारं फिरलं

Dhananjay Mahadik News : 2004 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून कै. सदाशिवराव मंडलिक आणि शिवसेनेचे धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांच्यात सामना झाला होता.
dhananjay mahadik sharad pawar
dhananjay mahadik sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्हा. राज्यात आणि देशात एक निकाल आणि कोल्हापुरात एक निकाल, अशी इथली परंपरा. लोकांना गृहीत धरून घेतलेला निर्णय लोकांच्याच पचनी पडत नाही, हा इथला इतिहास. या इतिहासाचा फटका अनेक दिग्गजांना बसला आहे. 2004 च्या लोकसभा निवडणुकीतही त्याची झलक पाहायला मिळाली. बिंदू चौकात झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी ‘कौन है यह मुन्ना, कहाँसे आया’ एवढं एकच वाक्य उच्चारले आणि या वाक्यावरच निवडणुकीचा निकाल फिरला.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून 1998 मध्ये कै. सदाशिवराव मंडलिक पहिल्यांदा खासदार झाले, त्यावेळी ते काँग्रेसच्या ‘हात’ चिन्हावर रिंगणात होते. या निवडणुकीत सलग पाच वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या कै. उदयसिंगराव गायकवाड यांना डावलून काँग्रेसने कै. मंडलिक यांना रिंगणात उतरवले होते. 1999 मध्ये मध्यावधी निवडणुका लागल्या आणि त्याच दरम्यान काँग्रेसमधून शरद पवार ( Sharad Pawar ) बाहेर पडले व त्यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. काँग्रेसच्या फुटीनंतरची 1999 ची लोकसभा ही पहिलीच निवडणूक. या दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात ती लढवली. राष्ट्रवादीने पुन्हा एकदा कै. मंडलिकांवर विश्‍वास दाखवला, तर काँग्रेसकडून कै. गायकवाड रिंगणात उतरले. यात कै. मंडलिक यांनी बाजी मारली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2004 च्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस राज्यात एकत्र लढले. त्यात ज्यांचा विद्यमान खासदार त्यांना उमेदवारी ठरली. त्यातून कै. मंडलिक पुन्हा रिंगणात उतरले. त्यांच्या विरोधात कोण? हा शिवसेनेसमोरचा मोठा प्रश्‍न होता. याच दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील ( Satej Patil ) यांनी विधानसभेची तयारी करवीरमधून सुरू केली होती. पाटील यांची व माजी आमदार महादेवराव महाडिक यांची त्यावेळी गट्टी होती. त्यातून पाटील यांनी महाडिक यांचे पुतणे खासदार धनंजय महाडिक ( Dhananjay Mahadik ) यांना लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची गळ घातली. निवडणूक जाहीर झाली, त्यावेळी धनंजय महाडिक हे सहकुटुंब तिरुपती दौऱ्यावर होते. 1998 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राहिलेल्या कै. विक्रमसिंह घाटगे यांनी धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीसाठी शिवसेनेच्या नेतृत्वाकडे शिफारस केली. त्यातून धनंजय महाडिक हे शिवसेनेचे उमेदवार ठरले.

अवघ्या पंधरा-वीस दिवसांत त्यांनी मतदारसंघात रान उठवले. करवीरच्या विधानसभा निवडणुकीत महाडिकांची ताकद मिळेल म्हणून सतेज पाटील यांनी उघडपणे नाही; पण छुप्या पद्धतीने आपली सर्व ताकद धनंजय महाडिक यांच्या मागे लावली. महाडिकांचा बळाचा पट आणि ‘जनसुराज्य’चे आमदार डॉ. विनय कोरे यांची साथ त्यांच्यासोबत होती. एका बाजूला अनुभवी कै. मंडलिक आणि दुसऱ्या बाजूला सर्व पातळीवर ताकदीनिशी उतरलेले धनंजय महाडिक असा सामना रंगला.

dhananjay mahadik sharad pawar
Vidarbha Politics : बच्चू कडूंना मोदी हवेत, पण नवनीत राणा नको...!

प्रचारादरम्यान नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू होता; पण त्यावेळी महाडिक यांचेच पारडे जड होते, असे चित्र होते. दोन्ही काँग्रेसचे दिग्गज नेते एकत्र असूनही कै. मंडलिक विजयी होतील का नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे राज्य पातळीवरील नेतेही हतबल होते.

अशातच शरद पवार यांची प्रचाराची शेवटची सभा कोल्हापुरातील बिंदू चौकात झाली. त्यावेळी बिंदू चौकात प्रचाराच्या सभेसाठी परवानगी होती. मतदारसंघात महाडिकांचा बोलबोला आणि या शेवटच्या सभेत सर्वच नेत्यांची मुळमुळीत भाषणे सुरू झाल्यानंतर बिंदू चौकातून लोकांनी काढता पाय घ्यायला सुरुवात केली होती. तोपर्यंत पवार भाषणाला उभारले. त्यांच्याकडूनही सरकारच्या कारभारावर टीका करण्यापलीकडे काही नव्हते.

भाषणाचा शेवट जवळ आला, तरी पवार यांचे आक्रमक भाषण काही होईना, तशी सभेत अस्वस्थता वाढली; पण शेवटच्या टप्प्यात पवार यांनी स्थानिक मुद्द्याला हात घातला आणि ‘कौन है यह मुन्ना, कहाँसे आया’ एवढाच प्रश्‍न विचारला आणि सभेचे वातावरणच पालटले आणि या एका वाक्यावर कै. मंडलिक यांचा विजय सुकर झाला. अवघ्या 14 हजार 753 मतांनी महाडिक या निवडणुकीत पराभूत झाले. पवार यांच्या या एका वाक्याने फिरलेल्या निवडणुकीची आजही चर्चा होते.

( Edited By : Akshay Sabale )

R

dhananjay mahadik sharad pawar
Dilip Mane News : काँग्रेसवासी मानेंना सुशीलकुमार शिंदेंकडून विधानसभेसाठी कोणत्या मतदारसंघाचा शब्द?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com