Lok Sabha Candidate  Sarkarnama
विशेष

Lok Sabha Election News : राज्यातील 'या' चौदा मतदारसंघातून जाणार पहिल्यांदाच नवा चेहरा लोकसभेत!

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील 48मतदारसंघातील लढतीचे चित्र बुधवारी स्पष्ट झाले. महायुतीने उर्वरित सहा जागांवरील तर महाविकास आघाडीने एका जागेवरील उमेदवारीची घोषणा केल्यानंतर कोण आमने-सामने येणार हे पुढे आले आहे. पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवसाचा अवधी असताना सध्या प्रचार शिगेला पोचला होता. दिवसेदिवस राज्यातील तापमानासोबतच ऐन उन्हाळ्यात निवडणुकांमुळे राज्यातील वातावरणही चांगलेच तापले आहे.

राज्यातील लोकसभेच्या 48 जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होत आहे. या निवडणुकीत जवळपास 12 खासदारांची उमेदवारी कापण्यात आली आहे. त्यामध्ये भाजपने (Bjp) सात विद्यमान खासदार तर शिंदे यांच्या शिवसेनेने (Shivsena) चार जणांचा तर राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) शरदचंद्र पवार पक्षाकडून एक अशा दहा खासदारांना डच्चू देण्यात आला आहे. तर दोन खासदारांचे निधन झाल्यामुळे रिक्त असलेल्या अशा एकूण 14 जागांवरून नवीन चेहरे संसदेत जाणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहचली आहे. (Lok Sabha Election News)

त्यापैकी या नऊ मतदारसंघातून विजयी होणार उमेदवारी प्रथमच लोकसभेची पायरी चढणार आहे. त्यामध्ये मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर, पुणे, चंद्रपूर, सातारा, सोलापूर, रामटेक, हिंगोली, बीड, यवतमाळ-वाशीम, जळगाव, अकोला या बारा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

या मतदार संघातील उमेदवार नवखे असून येथील उमेदवाराने आतापर्यंत एकदाही लोकसभेची निवडणूक जिकंलेली नाही. त्याशिवाय काही ठिकाणी आमदारांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. तर काही ठिकाणी उमेदवारांमध्ये ज्येष्ठ आमदार व मंत्र्यांचा समावेश करण्यात आल्याने निवडणुकीत चुरस असणार आहे. विशेषता चंद्रपूरमधून राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार लोकसभेसाठी नशीब आजमावत असल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चंद्रपूरमध्ये भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर अशी लढत होत आहे. तर रामटेकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजू पारवे विरोधात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे अशी लढत होत आहे. यवतमाळ वाशीममधून राजश्री पाटील यांच्या विरोधात संजय देशमुख अशी लढत होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हिंगोलीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे बाबुराव कदम विरोधात ठाकरे गटाचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, बीडमधून माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे हे आमने-सामने उभे ठाकणार आहेत.

सोलापूरमध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे व भाजपचे राम सातपुते या विद्यमान आमदारांत तर जळगावमध्ये भाजपचे उमेदवार स्मिता वाघ यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांच्यात पहिल्यांदाच लढत होत आहे. अकोलामधून भाजपने अनुप धोत्रेंना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसने अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मुंबई उत्तर पूर्वमधून भाजपने मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात मुंबई उत्तर पूर्व शिवसेना उमेदवार संजय दिना पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर व शिवसेना शिंदे गटाकडून आमदार रवींद्र वायकर यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्याशिवाय मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात महायुतीकडून उज्ज्वल निकम यांना तर महाविकास आघाडीकडून आमदार वर्षा गायकवाड निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

पुणे लोकसभा मतदार संघातून गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजपकडून मुरलीधर मोहोळ तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर अशी लढत होत आहे. तर सातारामध्ये श्रीनिवास पाटील निवडणूक लढवत नसल्याने त्याठिकाणी भाजपचे उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे लढत आहे. तर मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात राज्यसभा सदस्य पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे या ठिकाणाहुन संसदेत पहिल्यांदा कोण पोहचणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

या डझनभर खासदारांची कापली उमेदवारी

या निवडणुकीत जवळपास 12 खासदारांची उमेदवारी कापण्यात आली आहे. त्यामध्ये भाजपने प्रीतम मुंडे, पूनम महाजन, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, संजय धोत्रे, उन्मेष पाटील, जयसिद्धेश्वर महाराज या सात विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला आहे तर शिंदे यांच्या शिवसेनेने कृपाल तुमाने, हेंमत पाटील, भावना गवळी, गजानन कीर्तिकर या चार जणांना घरी बसवले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी वयोमानानुसार उमेदवारी घेण्यास नकार दर्शविला आहे.

SCROLL FOR NEXT