Lok Sabha Result 2024 News : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली. त्यानंतर चांगलाच राजकीय धुरळा उडाला असून राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीसाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभा निकालामुळे महायुतीची धाकधूक वाढली असून राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी महाविकास आघाडीने 30 जागांवर बाजी मारली तर महायुतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत.
या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीचे बरेचसे नेते अडचणीत आले आहेत. या निकालाचा परिणाम येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीवर होत आहे. सध्या लीड मिळालेल्या 150 पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडी (MVA) विजयी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे लोकसभेचे निकाल महायुतीसाठी येत्या काळात धोक्याची घंटा ठरणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत जनतेने सत्ताधाऱ्या विरोधात कौल दिला आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप व महायुतीमधील नेत्यांना यातून शहाणे व्हावे लागणार आहे. महाविकास आघाडीने जे लोकसभा मतदारसंघ जिंकले आहेत. त्याठिकाणच्या विधानसभा मतदारसंघ त्यांच्यासाठी धोक्याची घंटा असणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा ट्रेंड पाहायला तर यामध्ये महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला आहे. त्यामध्ये लोकसभेच्या 30 जागा मिळाल्याने जवळपास राज्यातील विधानसभेच्या 150 जागावर आघाडी दिसत आहे. त्यामुळे आज विधानसभेची निवडणूक झाली तर राज्यात महाविकास आघाडी सहजपणे सत्तेत येऊ शकते, असे लोकसभेच्या आकडेवारीवरुन स्पष्टपणे दिसत आहे.
दुसरीकडे भाजप (BJp), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला लोकसभेच्या 17 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांना 125 जागावर लीड मिळत आहे. या महाविकास आघाडीच्या तुलनेत 25 जागा कमी आहेत. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडी विधानसभेतील बहुमताचा145 आकडा सहज पार करेल, असे सध्याच्या निकालावरून दिसत आहे.
येत्या काळात महायुतीला लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश दूर करून कामाला सुरुवात करावी लागणार आहे. अन्यथा लोकसभेतील अपयश येत्या काळात सहा महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आव्हानात्मक ठरू शकते.
लोकसभा निवडणुकीनंतर हीच परिस्थिती राहील तर महाविकास आघाडीत इनकमिंग वाढण्याची शक्यता आहे. अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Congress) उमेदवारांचा पराभव झाला आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघांमधील आमदार धास्तावले आहेत. येत्या काळात काय होणार याची चिंता त्यांना सतावत आहे.
मराठवाड्यातील 46 पैकी 22 आमदाराचा होणार करेक्ट कार्यक्रम
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठ पैकी सात जागांवर महायुतीला मोठा पराभव स्वीकारावा लागला. महाविकास आघाडीला या ठिकाणी मोठा फायदा झाला असून तब्बल सात जागा मिळाल्या आहेत. त्याचा परिणाम आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत होणार आहेत. मराठवाड्यातील 46 पैकी 22 आमदारांच्या विरोधात कौल दिसत आहे. तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, निलंगेकर यांच्यासह महायुतीचे 21 तर महाविकास आघाडीच्या एका आमदाराचा करेक्ट कार्यक्रम होणार.