Uddhav Thackeray, Nana Patole, Sharad Pawar, Ajit Pawar, Eknath Shinde and Devendra Fadanvis Sarkarnama
विशेष

Loksabha Election 2024 : उदंड जाहले पक्षांतर... राजकीय उड्यांनी आसमंत गजबजला !

Sky was buzzing with political flights : पक्ष सोडून ऐनवेळी दुसऱ्या पक्षाची पताका हाती घेऊन लोकसभेसाठी रणशिंग फुंकले आहे.अशा काही मतदार संघ व उमेदवारांचा आढावा....

सरकारनामा ब्युरो

दयानंद माने

Maharashtra political news : लोकसभा निवडणुकीची रंगधुमाळी रंगात आली आहे. त्याबरोबर पक्षांतराचे पीकही जोमात आले आहे.राज्यात जवळपास २५ उमेदवारांनी आपापले आधीचे पक्ष सोडून ऐनवेळी दुसऱ्या पक्षाची पताका हाती घेऊन लोकसभेसाठी रणशिंग फुंकले आहे.अशा काही मतदार संघ व उमेदवारांचा आढावा..

पुणे लोकसभा मतदारसंघात मनसेचे वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीकडून लढणार आहेत.मनसे आणि वंचितची विचारधारा वेगवेगळी असल्याने त्यांचा स्वीकार वंचितचे मतदार कसा करतील हे बघणे मनोरंजक ठरणार आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर (Shirur) लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी मार्च २०२४ पर्यंत शिवसेनेच्या दोन्ही गटात काम केले.‌ आता लोकसभेच्या रिंगणात ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून विद्यमान खासदार अमोल कोल्हेशी लढतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार निलेश लंके यांनी ऐनवेळी पक्षबदलून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला.विदर्भातील अमरावती लोकसभा मतदारसंघातून गेली संपूर्ण टर्म भाजपच्या बाजूने खिंड लढविणाऱ्या अपक्ष खा. नवनीत राणा यांना निवडणुकीच्या तोंडावर अपेक्षितरित्या भाजपने उमेदवारी दिली आहे.महाविकास आघाडीवर तुटून पडणाऱ्या फायर ब्रॅण्ड नेत्या अशी इमेज त्यांनी गेल्या पाच वर्षांत उभी केली आहे.वर्धा मतदारसंघ महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला सुटल्याने काँग्रेसने अमर काळे यांनी ऐनवेळी पक्षबदल करुन राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला आहे. विदर्भात राष्ट्रवादीला मिळालेला हा एकमेव मतदार संघ आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस (Congress) सोडून शिवसेनेचा (शिंदे गट) हात हातात धरला आहे.औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अफसरखान यांनी पक्षाला रामराम करत वंचितचा हात धरला आहे. इथे एमआयएमचे इम्तियाज जलिल विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे मुस्लिम वोट बँक डोळ्यासमोर ठेवून हा उमेदवार वंचितने दिला आहे. तो कुणाचा फायदा व कुणाचे नुकसान करतो, हे पाहणे महत्त्वाचे असेल.

पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी गेली निवडणूक शिवसेनेकडून लढवली होती.आता यंदा ते भाजपकडून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.त्यांची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना (ठाकरे ) गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर या आधी मनसेत होत्या. मुंबई (Mumbai) ईशान्य मतदार संघातील शिवसेनेचे (ठाकरे गट) उमेदवार संजय दीना पाटील आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.

रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी २०१९ ला राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती.त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वाची आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून आता शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणारे संजोग वाघेरे २०१९ ला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे हे उमेदवार आहेत. २०१९ ला ते भाजपमध्ये होते. त्याआधी ते काँग्रेस मध्येही होते.

बीडमधून (Beed) बजरंग सोनवणे यांचे पक्षांतरही उल्लेखनीय आहे. २०१९ ला त्यांनी राष्ट्रवादीकडून प्रितम मुंडेना लढत दिली होती.नंतर राष्ट्रवादी फुटल्यावर ते अजित पवार यांच्यासोबत गेले.आता निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात आले आहेत. तसेच निवडणुकही लढवत आहेत.उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून दीर भावजय यांच्यातील लढत गाजणार आहे. तिथे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत आहे.अर्चना पाटील या भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) प्रवेश करुन उमेदवारीही मिळवली.

माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश बारस्कर यांना वंचितने उमेदवारी दिली आहे.त्यांना राष्ट्रवादीने (Ncp) पक्षातून काढून टाकले आहे. ज्या जागेवरुन काँग्रेस व ठाकरे गटात घमासान झाले त्या सांगलीतून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार आहेत.ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. निवडणुकीच्या मैदानात ते भाजपचे संजयकाका पाटील यांना आस्मान दाखवणार का हे पाहणे आता रंजक ठरेल.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आधी कोणत्याही राजकीय पक्षात नव्हते.

जळगावमधून शिवसेना ठाकरे गटाकडून करण पवार निवडणूक रिंगणात आहेत.ते आधी भाजपमध्ये होते.रावेरमध्ये कालच राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) उमेदवारी मिळालेले श्रीराम पाटील हे आधी भाजपत होते. भिवंडीतून राष्ट्रवादीची (शरद पवार) उमेदवारी मिळालेले सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे.आधी शिवसेना मग राष्ट्रवादी, पुन्हा शिवसेना शिंदे गट व शेवटी पुन्हा राष्ट्रवादी (शरद पवार) अशी त्यांची वाटचाल आहे.

माढा मतदारसंघातून भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते तुतारी हाती घेणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या उमेदवारीविरोधात हे बंड आहे.सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले यांची उमेदवारी अद्याप भाजपने (Bjp) जाहीर केली नसली तरी त्यांनी प्रचार मात्र सुरु केला आहे. ते २०१९ ला राष्ट्रवादीकडून निवडणूक आले होते. मात्र भाजपचे सरकार केंद्रात येताच त्यांनी राजीनामा दिला व पुन्हा पोटनिवडणूक लढवली मात्र तीत ते पराभूत झाले. पुढे भाजपने त्यांना राज्यसभेवर घेतले आहे.सांगलीतील डी.सी.पाटील मार्च २०२४ पर्यंत भाजपमध्ये होते ते आता लोकसभेसाठी वंचितकडून रिंगणात आहेत.

(Edited by - Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT