संदीप चव्हाण-
Loksabha Election 2024 : शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेली शिरूरची जागा महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाली. काहीही झालं तरी 'यंदाच्या निवडणुकीत विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पाडणारच,' असा चंग बांधलेल्या अजितदादांनी शिरूरची जागा आपल्या पदरात टाकून घेतली. त्यामुळं सलग तीनवेळा (2004, 2009, 2014) खासदार होऊन हॅट्रिक साधलेल्या शिवाजीराव आढळरावांची मात्र अडचण झाली.
लढायचं तर आहे पण शिवसेनेच्या वाट्याला जागा तर सुटलेली नाही पण 2019 च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याविरोधात उभं राहावंच लागेल, अशी खूणगाठ मनाशी बांधून आढळरावांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळं या मतदारसंघात शिवसेना (Shivsena) शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट (बाण Vs तुतारी) अशी होणारी लढत होता होता टळली.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला एकूण 10 जागा आल्या आहेत. त्यात बारामती, शिरूर, सातारा, माढा, वर्धा, रावेर, दिंडोरी, बीड, भिवंडी आणि नगर या जागांचा समावेश आहे. माढा वगळता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 09 उमेदवारांच्या नावांची घोषणा देखील करण्यात आली आहे.
बारामती - सुप्रिया सुळे, शिरूर - अमोल कोल्हे, सातारा - शशिकांत शिंदे,वर्धा - अमर काळे, रावेर - श्रीराम पाटील, दिंडोरी - भास्करराव भगरे, बीड - बजरंग सोनवणे, भिवंडी - सुरेश म्हात्रे, नगर - नीलेश लंके. माढयातून अजून कुणाच्याही नावाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अर्थात, माढ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार घोषित होणं बाकी आहे तर साताऱ्यात अजून भाजप उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा व्हायची आहे. म्हणजे या दोन्हीही जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत होणार हे नक्की
म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाला मिळालेल्या 10 जागांपैकी 08 जागांवर भाजपचे तर उर्वरित 02 जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत. एकूणच काय तर या 10 जागांवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत होणारच नाही. थोडक्यात, बाण Vs तुतारी आमनेसामने नाहीच !
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.