ब्रिजमोहन पाटील
Maharashtra BJP News: निवडणुकीसाठी भाजपने त्रिस्तरीय प्रचार यंत्रणा तयार केली आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह अन्य नेत्यांच्या सभा राज्यभर होत आहेत. संघटनात्मक पातळीवर भाजपने बूथ, शक्ती केंद्राची यंत्रणा कार्यक्षम करण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले आहे. प्रभारी, प्रवासी कार्यकर्त्यांसह प्रदेश व केंद्रीय स्तरावरील नेत्यांच्या बैठकांचा सपाटा सुरू आहे. तर तिसरी यंत्रणा ही हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोचविणे, मराठा आंदोलनामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी प्रत्येक समाजनिहाय छोट्या मेळाव्यांवर भर दिला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात जबरदस्त झटका बसला. केवळ पक्षफोड या पराभवाला जबाबदार नसून, त्याच सोबत मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेले मराठा आरक्षणाचे आंदोलन, राज्यघटना बदलाच्या चर्चेमुळे नाराज झालेली दलित मते आणि मुस्लीम समाजाने एकगठ्ठा मतदान महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकल्याने अनेक मतदारसंघात महायुतीच्या पराभवाला हातभार लागला.
आरक्षण, संविधान बदलाच्या चर्चेमुळे भाजपने त्यांच्या भूमिकेत सुधारणा करण्यासाठी गेल्या पाच सहा महिन्यांत बरेच प्रयत्न केले. त्यातून विधानसभा निवडणुकीत होणारे नुकसान कमी करण्यावर संघटनात्मक व सरकारच्या पातळीवर प्रयत्न केला गेला. पण मुस्लीम धर्मीय एकगठ्ठा मतदान करत असताना त्यावेळी हिंदुत्ववादी संघटना बेसावध राहिल्याने मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. पण त्यानंतर बरेच चिंतन करण्यात आले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुती सरकारच्या विरोधातील नाराजी दूर करण्यासाठी लाडकी बहीण योजना, मुलींचे उच्च शिक्षण मोफत अशा योजनांची अंमलबजावणी केली. महिलांच्या बँक खात्यात नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे थेट जमा झाले. त्यामुळे मतदानात 50 टक्के वाटा असलेल्या महिला मतदारांना महायुतीने स्वतःकडे वळविण्याचा प्रयत्न केला आहे.
मराठा समाज नाराज असला तरी भाजपने ओबीसी समाजाला जवळ केले आहे. गावोगावी मेळावे, छोट्या बैठका घेऊन ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर हिंदू मतदारांच्या एकत्रीकरणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रबोधन मंचाच्या माध्यमातून आक्रमक प्रचार सुरु केला आहे. हिंदुत्वाचा विचार करणाऱ्या पक्षाला मतदान करा, असे आवाहन शहर, गावांमध्ये सुरु आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात सभा झाल्या. त्यावेळी त्यांनी काँग्रेसने तयार केलेले खोटे नॅरेटीव्ह खोडून काढण्याचा प्रयत्न केला. आता विधानसभेच्या प्रचार सभांमध्ये मोदींनी अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसींना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. आपण एक आलो तर सुरक्षित आहोत, अशी साद घातली आहे.
मोदी यांनी त्यांच्या सभेतून काँग्रेसवर जातीवादाच्या दुकानदारीचा आरोप केला. पण त्याचवेळी हिंदूंच्या एकजुटीचे काम मोदी करत असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकारने केलेली कामे आणि काँग्रेसच्या काळातील कामांची तुलना करून विकासाचा चढता आलेख अमित शहा यांच्याकडूनही जनतेपुढे मांडला जात आहे. या दोन प्रमुख नेत्यांचे मुद्दे मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी भाजपची यंत्रणा काम करत आहे.
उमेदवार प्रचारात मग्न असताना भाजपकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. मतदारसंघाचे प्रभारी, अन्य राज्यातून आलेले प्रवासी कार्यकर्ते त्यांचा अहवाल पक्षाच्या नेत्यांना सादर करत आहेत. त्यानुसार निवडणुकीची व्यूहरचना प्रत्येक दिवसानुसार बदलली जात आहे. त्याच आधारावर नेत्यांच्या भाषणाचे मुद्देही ठरत आहेत. मुंबई कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील मतदारसंघाचा आढावा प्रदेश व केंद्रीय पातळीवरून घेतला जात आहे.
केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्याकडून विभागनिहाय बैठक घेऊन प्रत्येक मतदारसंघात काय स्थिती आहे, कोणते घटक अडचणीचे ठरत आहेत, त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत याचा विचार करून रणनीती आखली जात आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी अटीतटीच्या निवडणुका आहेत, तेथे विजय खेचून आणण्यासाठी संघटनात्मक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
भाजपने बूथ यंत्रणा सक्षम करण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. राज्य सरकारच्या योजना मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी बूथ स्तरावरचे कार्यकर्ते सक्रिय झालेले आहेत. मतदान केंद्र निहाय मतदारयादीवर काम करून, प्रत्येक घरापर्यंत पोचण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. यात 100 टक्के यश येत नसले तरी किमान 70 टक्के मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.
महायुती असली तरी निवडणुकीनंतर भाजपचाच मुख्यमंत्री असेल असे स्पष्टपणे सांगितले जात आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सकाळी 11 पर्यंत भाजपला होणारे मतदान बाहेर काढण्यावर भर देण्यात आला आहे. एकूण मतदानाचा टक्का वाढवण्यापेक्षा भाजप व महायुतीला मानणारा मतदार बाहेर काढण्यावर भर आहे. उमेदवाराकडून संपूर्ण मतदारसंघात एकच पत्रक वाटप न करता प्रत्येक भागानुसार पत्रके तयार करून गेल्या पाच वर्षांत त्यांच्या भागात काय कामे केली याची माहिती दिली जात आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात अनेक ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण आहे. तर दुसरीकडे मुस्लिम मतदारांचे एकगठ्ठा मतदान महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे. हे दोन्ही घटक भाजपसाठी मारक असल्याने भाजपने हिंदू म्हणून सर्व जातींना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
त्याच वेळी ते प्रत्येक समाजाचे, जातीचे स्वतंत्र मेळावे घेत आहेत. त्यांच्या योजना, आरक्षण यास कोणताही धक्का लागणार नाही याची शाश्वती देत आपण हिंदू म्हणून सर्वजण एकत्र आलो पाहिजेत, अशी भूमिका मांडली जात आहे. गेल्या काही महिन्यात केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांच्यासह अन्य दलित नेत्यांनी महाराष्ट्रभर अडीचशेपेक्षा जास्त बैठका घेतल्या. दलित समाजाचे मतपरिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.