Maharashtra Loksabha  Sarkarnama
विशेष

Maharashtra Latest Politics : शहाजीबापूंचा कार्यक्रम होणार; पाचपुतेंना धक्का बसणार, 14 आमदारांना गाशा गुंडाळावा लागणार

Maharashtra Latest Politics Picture after Lok Sabha Elections : फक्त फोटो पुरते प्रचारात उतरलेले आमदार कोण यांचीही आता भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या वतीने चाचणी सुरू झाली आहे.

संभाजी पाटील

Maharashtra Lok Sabha : लोकसभा निवडणुकीच्या निकालाने विद्यमान आमदारांची चिंता आणि धाकधूक वाढली आहे. अहमदनगर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील तीस आमदारांपैकी 14 आमदारांना मतदारांनी धोक्याचा इशारा दिला आहे. यात सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांची संख्या जास्त आहे.

नगर, शिर्डी, माढा आणि सोलापूर या चार जागा विरोधकांनी खेचून भाजप महायुतीला जोर का झटका दिला. तर भाजपला साताऱ्याची एक जागा मोठ्या संघर्षानंतर स्वतःकडे आणता आली. या तीन जिल्ह्यांच्या पाचही लोकसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढती झाल्या. मात्र आमदारांच्या कामगिरीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तीस विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांच्या विरोधात मतदारांनी कौल दिला आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजप महायुती मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. फक्त फोटो पुरते प्रचारात उतरलेले आमदार कोण यांचीही आता भाजप, दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या वतीने चाचणी सुरू झाली आहे.

माढ्यात ताकद असतानाही पराभव

माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. या मतदारसंघातील सहाही आमदार कागदोपत्री भाजप महायुतीचे असले तरी धैर्यशील मोहिते पाटील यांनी एक लाख २० हजारांचे मताधिक्य घेऊन दणदणीत विजय मिळवला. या मतदारसंघातील संजयमामा शिंदे (करमाळा), बबनदादा शिंदे (माढा), राम सातपुते (माळशिरस) या आमदारांच्या मतदारसंघात मोहिते पाटील यांनी मोठे मताधिक्य मिळवले. फलटण मध्ये आमदार दीपक चव्हाण आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे विरोधात प्रचार केला. पण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी येथे १६ हजारांचे मताधिक्य घेतले. जयकुमार गोरे आणि शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात भाजपला मताधिक्य मिळाले.

भाजपवर चिंतनाची वेळ

सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहोळ आणि पंढरपूर या दोन मतदारसंघात प्रणिती शिंदे यांनी जे मताधिक्य मिळवले त्यामुळेच त्यांना विजय मिळवता आला. मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे यशवंत माने तर पंढरपूर मध्ये भाजपचे समाधान आवताडे हे आमदार आहेत. या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसला मिळालेले मताधिक्य हे या दोघांच्या अडचणी वाढवणारे आहे. सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातही शिंदे यांनी मताधिक्य मिळवले आहे. या तुलनेत सचिन कल्याणशेट्टी आणि विजय देशमुख यांच्या मतदारसंघाने राम सातपुते यांना चांगली साथ दिली. शिंदे यांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघात केवळ एक हजार मतांचेच लीड मिळवता आले, हेही चिंता वाढविणारे आहे.

पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातही अपयश

साताऱ्यातील निकाल राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही डोळ्यात अंजन घालणारा आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वाईतील आमदार मकरंद पाटील, कराड उत्तर मधील बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री शंभूराज देसाई यांना त्यांच्या मतदारसंघातून आपल्या उमेदवारांना मताधिक्य देता आले नाही. कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांच्या मतदारसंघात मिळालेल्या मताधिक्यावरच उदयनराजे यांचा विजय शक्य झाला.

बबनराव पाचपुते यांना धक्का

नगरमध्ये बबनराव पाचपुते यांच्या श्रीगोंदा मतदारसंघात लंके यांना मोठे मताधिक्य मिळाले. तर प्राजक्ता तनपुरे यांच्या राहुरी मतदार संघात सुजय विखे यांनी मताधिक्य मिळवले. या दोन्ही मतदारसंघात विरोधकांना मिळालेले मताधिक्य विधानसभा निवडणुकीत परिणाम करणारे आहे. रोहित पवार, संग्राम जगताप, निलेश लंके, मोनिका राजळे यांच्या मतदारसंघांमध्ये मात्र त्या त्या पक्षाच्या उमेदवारांना मताधिक्य मिळाले आहे.

शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात या दोन नेत्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली होती. थोरात यांनी संगमनेर आणि किरण लहामटे यांच्या अकोले मधून मिळालेल्या मोठ्या मताधिक्यामुळे भाऊसाहेब वाकचौरे यांचा विजय शक्य झाला. मात्र श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे आणि नेवासाचे आमदार शंकरराव गडाख यांना त्यांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला मताधिक्य देता आले नाही.

रेड अलर्ट असलेले विधानसभा मतदारसंघ

माढा : करमाळा, माढा, माळशिरस.

सोलापूर : मोहोळ, सोलापूर दक्षिण, पंढरपूर .

सातारा: वाई, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण.

शिर्डी: श्रीरामपूर, नेवासा

नगर : श्रीगोंदा, राहुरी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT