Pune News : पुण्यातले नेते वसंत मोरे, प्रचंड धडाडी ठेवून राजकारण करणारे वसंततात्या ! पुढ्यात 'कुणीबी' असू देत आमचे तात्या तसे कुणालाच सुटी देत नाहीत. कोणाचे कुठे काही अडले की तात्या हातात बॅट, स्टीकच नव्हे; तर हातोडाही घेऊन आलेच म्हणा... तात्या नुसता घामच फोडतात असे नाही; सटकली तर 'डायरेक्ट' तोडफोड करून मोकळे होतात. काय व्हायचे ते होऊ दे मग... ही वसंततात्यांची भारी 'स्टाइल' आहे. तात्या म्हणजे, मनसे अध्यक्षांचे लाडकेच. (आजघडीला X लाडके म्हणायचे.)
पुण्यातील दिवंगत माजी आमदार रमेश वांजळेनंतर तात्या हेच राजसाहेबांच्या जवळचे. कारण रमेशभाऊंसारखा 'डॅशिंग' स्टाइल वसंततात्यांकडे आहे. म्हणजे, गेली 12-15 वर्षे राजसाहेब आणि वसंततात्या एक निराळे नाते राहीले. अलीकडच्या काळात दिल्लीच्या राजकारणाचे म्हणजे, लोकसभा निवडणुकीचा नगारा वाजू लागला आणि वसंततात्यांना 'दिल्ली' खुणावू लागली. थोडक्यात वसंततात्यांच्या डोक्यात खासदारकीची हवा शिरली. या हवेचा नुसता जोर नव्हता, तर तो वादळी तडाखाच होता. या तडाख्याने वसंततात्यांना दिल्लीच्या दिशेने झेपावल्यासारखेच झाले.
(दिल्लीकडे कूच) या जबरदस्त वादाळात वसंततात्यांनी राजसाहेबांचा हात सोडला. पण, तो थेट मीडियाच्या कॅमेऱ्यापुढे उभे राहून. वसंततात्यांनी राजसाहेबांना धोका दिला असे नाही. (तसे तात्या धोका देणाऱ्यातील व्यक्ती नाहीत.) उलटपक्षी दिल्लीकडून वसंततात्यांकडे घोंगावलेल्या वादळाच्या तडाख्यात 'आपले काय व्हायचे ते होऊ दे; पण राजसाहेबना धक्का' नको म्हणून वसंततात्यांनी हिमतीने तेही एकटे वादळाला दोन हात करीत राहिले. हे तात्यांचे मोठे धाडसच असू शकते. या तडाख्याकडे तात्या एकटेच जात असल्याचे पाहून त्यांच्या जवळच्या काहींनी हिमंत दाखवली.
या वादळाच्या तडाख्यात तात्यांच्या नाकातोंडात पाणी गेले. (म्हणजे, पराभव झाला.) राजसाहेबांच्या नेतृत्वात वाढून भल्याभल्या वादाळांना कवेत घेण्याइतपत 'मसल पॉवर' राखून असलेले वसंततात्या दिल्लीच्या वादळापुढे, म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत हरले. एकूणच, राजसाहेबांचा X 'हिरो' वसंततात्या मोरे हे पुण्याच्या राजकीय पटलावर 'झिरो' ठरले. वसंततात्या खासदार झाले नाहीत. मात्र, आता पुन्हा नव्या दमाने संकटांना तोंड देतील आणि महापालिकेच्या (PMC) राजकारणात का होईना पण ते नक्कीच 'हिरो' ठरतील.
पुण्याच्या राजकारणात वसंततात्यांचा मोठा दबदबा, राजसाहेबांच्या नेतृत्वातच त्यांनी महापालिकेच्या राजकारणात लांब उडली. म्हणजे, महापालिकेच्या 2007, 2012 आणि 2017 च्या निवडणुकीत नगरसेवक झाले. हे पद मिरवण्यापुरते न ठेवता वसंतात्यांनी पुण्यात 'राज' धाक आणला; तो सांभाळला आणि वाढवलाही. याच काळात वसंततात्या राज्यभरात 'फेमस' झाले. ते राजसाहेबांचे ताकदीवान 'लीडर' म्हणून. तेव्हाच त्यांच्या राजकीय महत्त्वांकाक्षांनाही धुमारे फुटले आणि त्यांना आमदारकीचे वेध लागले.
विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत वसंततात्यांनी मनसेकडून हडपसर मतदारसंघात उडी घेतली. या निवडणुकीत 34 हजारापेक्षा अधिक मते घेतली, ते हरले पण भाजपचे विद्यमान आमदार योगेश टिळेकरांना जोरदार धक्का दिला. या निवडणुकीत वसंततात्यांमुळेच टिळेकर हरले, राष्ट्रवादीचे चेतन तुपे (Chetan Tupe) जिंकले. टिळेकरांना हरविण्याची वसंततात्यांची खेळी 'सक्सेस' झाली. त्यानंतर 2017 च्या निवडणुकीत वसंततात्या पुन्हा महापालिकेत नगरसेवक झाले. त्यानंतर 'मला खासदार व्हायचे आहे', असे उघडपणे सांगून वसंततात्या पुणे लोकसभेसाठी सज्ज झाले. परंतु, या निवडणुकीत मनसेचे उमेदवार नसल्याचे खात्री पटल्यावर ते लढण्यावर ठाम राहिले. प्रसंगी मनसे पर्यायाने राजसाहेबांना लांब करून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीने ते खासदारीकडे लढले.
या निवडणुकीत सुरवातीला काही दिवस वसंततात्यांचा सोशल मीडियावर बोलबोला होता. पुढे निकालात हरवला आणि वसंततात्यांची अनामत जप्त झाली. वसंततात्या हरले! ही तात्यांची नामुष्की आहे. राजसाहेबांची साथ सोडून वसंततात्या राजकारण करून शकत नाहीत, हे राजकीय शहाणपण त्यांना आता येईल का, हे पुढच्या काळात कळू शकेल. परंतु, निवडणुकीसाठी, खासदार-आमदार होण्यासाठी मूळ पक्षाशी फारकत घेऊन बंड पुकारल्याने काय होते, हे वसंततात्यांना या दारुण पराभवाने कळले असावे. तरीही कळूनही वळत नसेन; तर वसंततात्यांनी खरोखरीच भाजपच्या नेतृत्वाकडे तेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे काही दिवस 'ट्युशन' लावावी. त्यासाठी वसंततात्यांना फडणवीसांची वेळ घ्यावी लागणार आहे. तसे फडणवीस हेही आता उपमुख्यमंत्रीपदावरून मोकळे होण्याच्या विचारात आहेत. या मोकळेपणात वसंततात्यांना 'ट्युशन'लावून फायदा घेता येऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.