BJP leaders during strategic meetings as the party intensifies preparations to secure the Zilla Parishad president post following recent electoral successes. Sarkarnama
विशेष

ZP BJP Strategy : नगरपालिका, महापालिकेनंतर भाजपने झेडपीसाठी टाकला मोठा डाव...

BJP ZP President Target : नगरपालिका व महापालिका निवडणुकांतील यशानंतर भाजपने जिल्हा परिषद अध्यक्षपदावर लक्ष केंद्रीत करत स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी जोरदार राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

सरकारनामा ब्यूरो

विठ्ठल सुतार

Maharashtra ZP Elections : नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीतील घवघवीत यशानंतर, भाजपने आता जिल्हा परिषद निवडणुकीकडे मोर्चा वळविला आहे. गेल्या वेळी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपपुरस्कृत होता, मात्र आता भाजपच्या चिन्हावरच निवडून आलेला सदस्य अध्यक्ष करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी अनेक तालुक्यांतील तगड्या विरोधी नेत्यांना पक्षामध्ये प्रवेश दिला आहे.

चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद निवडणुका होत आहे. चार वर्षांच्या कालावधीत लोकसभा व विधानसभा निवडणूक निकालाने सर्वच राजकीय पक्षांच्या गणितांमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेवर काँग्रेस व राष्ट्रवादी यांची एकहाती सत्ता होती. मागील निवडणुकीत (2017) तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी माजी आमदार संजय शिंदे व प्रशांत परिचारक यांच्या मदतीने भाजपपुरस्कृत अध्यक्ष बसवला होता. पण आता जिल्ह्याचे राजकीय चित्र बदलले आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर जिल्ह्याची सूत्रे दोन्ही देशमुखांकडून पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे गेली आहेत. महापालिका निवडणुकीत त्यांनी जादू दाखवत सर्वाधिक 87 नगरसेवक निवडून आणले. आता जिल्हा परिषद निवडणुकीतही कमळ चिन्हावर निवडून आलेला उमेदवारच अध्यक्ष करण्यासाठी जिल्ह्यात प्रमुख नेत्यांची मोट बांधली आहे. यामध्ये आताच्या विरोधी पक्षातील विशेषत: काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अस्तित्व राखण्यासाठी झगडावे लागण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीची ताकद

जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 68 गट व पंचायत समितीच्या 136 गणांपैकी 27 गट व 50 गण सोलापूर लोकसभा मतदारसंघात आहेत. तर, 35 गट व 70 गण माढा लोकसभा मतदारसंघात आणि 6 गट व 12 गण धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या बार्शी तालुक्यात आहेत. यामुळे महाविकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघ व बार्शी तालुक्यात 41 गट व 82 गण आहेत. यामध्ये माढा, मोहोळ, माळशिरस व करमाळा या चार विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत; तर बार्शी तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप सोपल आमदार आहेत. यामुळे राजकीय ताकदीचा अंदाज घेता ग्रामीणमध्ये भाजपपेक्षा महाविकास आघाडीची ताकद अधिक दिसते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, दोन्ही शिवसेना यांचा एकही आमदार नसला, तरी त्यांची ताकद कायम आहे.

दोन्ही खासदार निर्णायक

माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे नेतृत्व करतात. महापालिका निवडणूक निकाल पाहता भाजपला टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी म्हणूनच सामोरे जावे लागणार आहे. खासदार शिंदे यांच्या मतदारसंघात मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ व अक्कलकोट या पाच तालुक्यांतील तर खासदार मोहिते-पाटील यांच्या मतदारसंघात माळशिरस, सांगोला, करमाळा, पंढरपूर मतदारसंघात गट येतात. अद्याप दोन्ही पक्षांकडून निवडणूक तयारी सुरू असली तरी जागावाटपावर कोणतीही चर्चा झाली नाही.

भाजपमध्ये जोरदार ‘इनकमिंग’

कमी ताकद असणाऱ्या तालुक्यांमध्ये भाजपने तेथील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेत्यांना प्रवेश दिला आहे. जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत माजी आमदारांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. मोहोळ तालुक्यात माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, दक्षिण सोलापूर तालुक्यात माजी आमदार दिलीप माने, माढा तालुक्यात माजी आमदार बबनराव शिंदे यांचा मुलगा रणजितसिंह शिंदे, तर माळशिरस तालुक्यात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, श्रीलेखा पाटील, माजी जि. प. सदस्य फत्तेसिंह माने-देशमुख, माजी जि. प. सदस्य बाबाराजे देशमुख यांना भाजपमध्ये घेत मोहिते-पाटील यांना शह दिला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीला उमेदवारांची शोधाशोध करावी लागणार आहे.

तीन आमदारांसह भाजप सज्ज

ग्रामीणमध्ये भाजपकडे अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर या तालुक्यांत भाजपचे विद्यमान आमदार आहेत; तर माढा, करमाळा, मोहोळ, माळशिरस या तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आणि बार्शी तालुक्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. याशिवाय दोन्ही खासदार महाविकास आघाडीचे आहेत. यामुळे भाजपने ताकद कमी असलेल्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांना गळाला लावले आहेत. अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. यामुळे शिंदे सेनेची ताकद वाढली आहे.

पूरस्थिती, अपुरा निधी

मागील चार वर्षांपासून निवडणुका नसल्याने जिल्हा परिषद गटातील गावांच्या विकासकामांना पुरेसा निधी मिळाला नाही. ऑगस्टमध्ये आलेला महापूर व अतिवृष्टीने नदीकाठासह व इतर गावांतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक रस्ते वाहून गेले आहेत, अनेक इमारती बाधित झाल्या आहेत. यासाठी सरकारकडून अद्याप निधी मिळाला नाही. याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमालास हमीभाव, ऊसदर यासह शेतकऱ्यांची कर्जमाफी, शिक्षण, रोजगार, आरोग्य या प्रश्नांवर विरोधकांकडून मांडले जाऊ शकतात. सत्ताधारी पक्षाकडून लाडकी बहीण, शेतकऱ्यांना सन्मान निधी, महापूर व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा हात यासह शेतीला दिवसा वीज, शेतमालास हमीभाव, कृषिपूरक योजना समोर ठेवत मतदारांसमोर जातील.

इच्छुकांचा ओढा भाजपकडे

महापालिका निवडणूक निकालाने महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्याची अनेकांची स्वप्ने भंगली आहेत. महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवायची की नाही, अशा द्विधा मनःस्थितीत इच्छुक उमेदवार आहेत. तर दुसरीकडे भाजपकडील इच्छुकांचा ओढा वाढला आहे. सर्वच गट व गणांत तुल्यबळ उमेदवारांची चर्चा असल्याने संधी कोणाला द्यायची, असा प्रश्न आता पक्षाच्या निवड समितीस पडला आहे. काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात असल्या, तरी इच्छुकांची संख्या खूपच कमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांकडून निवडून येणाऱ्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.

जिल्ह्यात नवी समीकरणे

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाने धडा घेत भाजप विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली. यानंतर नगरपालिका निवडणुकीत भाजपने चांगले यश मिळवले. आता महापालिका निवडणुकीत विक्रमी ८७ नगरसेवक निवडून आणत एकहाती सत्ता मिळवली आहे. यामुळे जिल्ह्यात आता भाजपकेंद्री राजकारणी समीकरण तयार झाले आहे. ग्रामीणमध्ये मोहिते-पाटील वगळता तगडा विरोधक दिसत नाही. काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची म्हणावी इतकी ताकद राहिली नाही. बेरजेचे राजकारण करत भाजप जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावरच निवडणूक लढविण्याची दाट शक्यता आहे.

आयात नेते ठरवणार दिशा

ग्रामीणमध्ये अक्कलकोट, मंगळवेढा व दक्षिण सोलापूर या तालुक्यात भाजपचे विद्यमान, तर बार्शी व पंढरपूर तालुक्यात माजी आमदार आहेत. जिल्हा परिषदेवर सत्ता येण्यासाठी आयात माजी आमदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. यामध्ये मोहोळ तालुक्यातील राजन पाटील, यशवंत माने; तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील दिलीप माने यांची मदत मिळाल्यास सत्तेची चावी भाजपकडे येण्यास हातभार लागणार आहे. शिवाय पंढरपूर तालुक्यातील माजी आमदार प्रशांत परिचारक, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी असणार आहे.

अजित पवार स्वबळावर की...

मोहोळ, माढा व करमाळा या तालुक्यांत अजित पवार गटाची ताकद आहे. अजित पवार गट स्वतंत्र लढणार की कोणाची मदत घेणार, यावर अद्याप निर्णय झाली नाही. करमाळा व माढा तालुक्यांत माजी आमदार संजय शिंदे, मोहोळ तालुक्यात माजी जि. प. सदस्य व जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची ताकद आहे. याचा लाभ जिल्हा निवडणुकीत उठवणार का हे पहावे लागणार आहे. माढा, करमाळा व मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांची लढत होणार आहे. भाजपने राष्ट्रवादी अजित पवार गटास सोबत घेतल्यास आणखी ताकद वाढण्यास मदत होणार आहे. याबाबत भाजपने अद्याप पत्ते खुले केले नाहीत.

स्थानिक आघाड्यांची शक्यता

नगरपालिका निवडणुकीत पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात स्थानिक आघाडीने बाजी मारली. यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीतही हाच प्रयोग होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारीची वाट न पाहता स्थानिक आघाडी करून निवडणूक होण्याची चर्चा आहे. पंढरपूर व मंगळवेढा या दोन्ही तालुक्यांत भाजप, राष्ट्रवादी शरद पवार गटाची ताकद आहे. कारखानदारी पट्टा असलेल्या भागात एका पक्षासोबत जाण्यापेक्षा थेट स्थानिक आघाडी करून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. भाजप व महाविकास आघाडीतील घटक पक्ष अद्याप याबाबत कोणतेही पत्ते खुले केले नसले तरी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.

तालुकानिहाय जिल्हा परिषद गट व गणांची संख्या

तालुका जि. प., पंचायत समिती

जि. प. गट, समिती गण

उत्तर सोलापूर 3, 6

दक्षिण सोलापूर 6, 12

अक्कलकोट 6, 12

मंगळवेढा 4, 8

माढा 7, 14

मोहोळ 6, 12

पंढरपूर 8, 16

करमाळा 6, 12

माळशिरस 9, 18

सांगोला 7, 14

बार्शी 6, 12

2017 चे पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी काँग्रेस 25

भाजप व आघाडी 19

शिवसेना 10

काँग्रेस 07

शेकाप 03

भीमा परिवार 03

अपक्ष 01

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT