Sugar Factory Laon  Sarkarnama
विशेष

Maharashtra Sugar Factories Finance : कल्याणराव काळे, भरणे, पंडित, साठेंना ‘बूस्टर डोस’; कारखान्यांच्या मदतीत अजितदादांचा वरचष्मा

State Governemnt Decision : राज्य सरकारने मदत जाहीर केलेल्या कारखान्यांमध्ये बहुतांश कारखाने हे अजित पवार गटाचे समजले जातात. यात अशोक चव्हाण यांचा कारखाना असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur Latest News : आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या राज्यातील पाच सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या (NCDC) धर्तीवर महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या माध्यमातून ६३१ कोटी ९० लाख रुपयांचा वित्तपुरवठा करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घेतला आहे. पंढरपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याणराव काळे, माढ्यातील माजी आमदार धनाजीराव साठे, इंदापुरातील आमदार दत्तात्रेय भरणेंच्या नेतृत्वाखालील, गेवराईतील अमरसिंह पंडित, तर नांदेडमधील माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कारखान्यांचा समावेश आहे. (631 crore assistance to five sugar factory in the state)

राज्य सरकारने मदत जाहीर केलेल्या कारखान्यांमध्ये बहुतांश कारखाने हे अजित पवार गटाचे समजले जातात. यामध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा कारखाना असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून जीएसटीच्या जप्तीच्या कारवाईपासून चर्चेत आलेल्या पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला मात्र मदत मिळालेली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्य सहकारी बॅंकेच्या माध्यमातून राज्यातील पाच सहकारी साखर कारखान्यांना ६३१ कोटी ९० लाख रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. या कर्जाची थकहमी राज्य सरकारने घेतली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पंढरपूरचे नेते कल्याणराव काळे यांच्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याला १४६ कोटी ६२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्या अटीवरच त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची चर्चा होती.

माजी मुख्यमंत्री (स्व.) विलासराव देशमुख यांचे मित्र माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या माढा तालुक्यातील कूर्मदास सहकारी साखर कारखान्यालाही मदत करण्यात आली आहे. साठे यांच्या कारखान्याला ५९ कोटी ४९ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. खरं तर साठे यांचे नावही या यादीत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, माढा लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणितातून ही मदत झाली असावी.

१२८ कोटी रुपयांचे कर्ज

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या नेतृत्वाखालील इंदापूर तालुक्यातील भवानी नगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याला १२८ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. हा कारखाना काही वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. तसेच साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सत्ताधारी राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे केले आहे. शिवाय, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यांना मागील खेपेतच मदत करण्यात आली आहे, त्यामुळे आता भरणेंनी ताकद दिल्याचे मानले जात आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई येथील अमरसिंह पंडित यांच्या जयभवानी सहकारी साखर कारखान्याला १५० कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अमरसिंह यांनी अजित पवार गटात जाणे पसंत केले होते. त्यावरून शरद पवार यांनी पंडित यांच्यावर बीडमध्ये जाऊन सडकून टीका केली होती. त्यामुळे चर्चेतील पंडित यांच्या कारखान्याला झालेली मदत हेही चर्चेचा विषय झाली आहे.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या कारखान्याला जाहीर झालेली मदत अनेकांना कोड्यात टाकणारी आहे. कारण मागील वेळी एकाही काँग्रेस नेत्याच्या कारखान्याला मदत देण्यात आली नव्हती. या वेळी मात्र चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहाकरी साखर कारखान्याला १४७ कोटी ७९ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT