माझे कार्यकर्ते जोपर्यंत कारागृहातून बाहेर येत नाहीत. तोपर्यंत मीसुद्धा घराचा उंबरठा शिवणार नाही, अशी प्रतिज्ञा केली आणि तिचे काटेकोर पालन करून तब्बल दीड वर्षे घरी न परतणारा संघटनेचा नेता म्हणजे मनोज जरांगे पाटील.
कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर नगर येथील न्यायालयात संतप्त कार्यकर्त्यांनी हल्ला केला आणि त्या कार्यकर्त्यांवर केसेस दाखल झाल्या. कार्यकर्त्यांना अटकही झाली. दीड वर्ष कार्यकर्ते कारागृहात होते. मात्र, माझे कार्यकर्ते जोपर्यंत कारागृहात आहेत तोपर्यंत मीसुद्धा घराचा उंबरठा शिवणार नाही, अशी प्रतिज्ञा केली व खरोखरच दीड वर्ष ते घरी आलेच नाहीत, अशी प्रतिज्ञा करून त्याचे पालन करणारे लढवय्ये नेतृत्व म्हणजे मनोज जरांगे पाटील. मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा बेमुदत उपोषण सुरू करणारे मनोज जरांगे पाटील यांचे आयुष्य म्हणजे एक प्रेरणादायी संघर्षकथाच आहे.
स्वामी विवेकानंद यांनी सांगितले होते की, जीवनात एखादे ध्येय निश्चित करा, ज्यात समाजाचे, व्यक्तीचे हित असेल आणि त्यासाठी पूर्ण समर्पित वृत्तीने कार्य केले तर संपूर्ण सृष्टीची शक्ती ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सहकार्य करते. मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष पाहिला की स्वामी विवेकानंद यांच्या वचनाची प्रचिती येते.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील मोतारी या गावातील हे कुटुंब 17 वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यातील समर्थ सहकारी साखर कारखाना परिसरात स्थायिक झाले. पत्नी सुमित्रा, मुलगा शिवराज व मुलगी पल्लवी असा मनोज जरांगे पाटील यांचा परिवार. उदरनिर्वाहासाठी दोन एकर शेती हाताशी होती. मात्र, जरांगे यांचा पिंडच वेगळा. सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या मनोज जरांगेंनी घरावर तुळशीपत्र ठेवले. शिवबा संघटनेच्या माध्यमातून परिसरातील युवकांना संघटित केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आतापर्यंत तब्बल सात वेळा आंदोलन पुकारले. जालना जिल्हधिकारी कार्यालय, साष्टी पिंपळगाव, शहागड येथील गोदावरी नदीवरील पूल या ठिकाणी आंदोलने झाली.
मनोज जरांगे याचे सहकारी दीपक गव्हाणे सांगत होते की, प्रारंभीच्या काळात प्रवास अतिशय खडतर होता. संघटनेच्या कामासाठी अनेकदा प्रवास करावा लागत असे. मात्र, साधनांची कमतरता व सर्वच कार्यकर्ते अतिशय सामान्य आर्थिक परिस्थितीतील असल्याने अनेक अडचणी यायच्या. मात्र, मनोज जरांगे यांची इच्छाशक्ती दुर्दम्य असल्याने व त्यांची सामाजिक कार्याप्रती असलेली तळमळ बघून मित्रमंडळीपैकी कोणाची तरी मदत व्हायची आणि पुढील प्रवास व्हायचा.
संघटनेच्या कामात प्रवास करताना, आंदोलन करताना मनोज जरांगे यांचे जेवणाकडे अजिबात लक्ष नसते. कुठेतरी चहा व्हायचा आणि लगेच पुढच्या प्रवासाला निघायचो. मनोज जरांगे यांनी नुकतेच राज्यातील विविध भागांत घेतलेल्या सभांची संख्या व वेळ पाहता त्यांच्यातील ध्येयाप्रती असलेली निष्ठा दिसून येते. समाजाच्या भल्यासाठी निश्चित केलेल्या ध्येयासाठी संपूर्ण निष्ठेने, समर्पित वृत्तीने मेहनत घेतली तर एक ना एक दिवस यशाला गवसणी घालता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटील. त्यांच्या नावाची इतिहासात निश्चितपणे नोंद होईल, याबाबत शंका नाही.