Rajesh Kshirsagar-Uddhav Thackeray
Rajesh Kshirsagar-Uddhav Thackeray Sarkarnama
विशेष

आमचा देव मंदिरातच योग्य होता; पण... : राजेश क्षीरसागरांचे उद्धव ठाकरेंबाबत भाष्य

सुशांत सावंत

मुंबई : ‘मातोश्री (Matoshri) हे आमचे मंदिर आहे. आमचा देव (उद्धव ठाकरे Uddhav Thackeray) मंदिरात होता, तेच योग्य होतं, त्याला बाहेर काढलं गेलं,’ अशा शब्दांत शिवसेनेचे बंडखोर माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी उद्वव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. (Matoshri is our temple: Rajesh Kshirsagar)

विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर बंडखोर नेत्यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना क्षीरसागर यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे माझे जुने सहकारी आहेत. मधल्या २०१४ ते १९ दरम्यान काही मतभेद झाले होते, त्यामुळे आज मी मन मोकळे करायला त्यांना भेटलो. एकनाथ शिंदे गट आणि भाजप एकत्र आहेत. शिवसेना आणि भाजप वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू.

क्षीरसागर म्हणाले की, मातोश्री आमचे मंदिर आहे आणि एकनाथ शिंदे हे संकटमोचक आहेत. उद्धव ठाकरे यांना 20१६ ते १७ पासून युवा सेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री म्हणून दाखवलं गेले. पण, आमचा देव मंदिरात होता, तेच योग्य होतं. त्याला बाहेर काढलं गेलं. पण, दर १० ते १५ वर्षांनी शिवसेनेमध्ये अशी परिस्थिती येते, ती कशामुळे येते, याचा विचार व्हावा. शिवसेनेचे काही मंत्री काम करत नव्हते. जे घडले, ते घडायला नको होते. मला खात्री आहे की राज्यातील शिवसैनिक आम्हाला गद्दार म्हणणार नाहीत.

राज्याच्या मंत्रीमंडळात कोणाला घ्यायचे याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. उपयुक्त असलेल्या काही आमदारांना मंत्री केलं तर सर्व सुकर होतं. विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत जेव्हा शिवसेना-भाजप युती तुटली, तेव्हा सुभाष देसाई पराभूत झाले होते. त्यानंतरही त्यांना मंत्री करण्यात आले होते. मलादेखील कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे. मला जर काही जबाबदारी मिळाली तर नक्कीच चांगले काम करेन. माझ्यासारख्या अनुभवी नेत्याचा वापर केला, तर नक्की फायदा होईल. पण, तो निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा आहे, असेही त्यांनी आपल्या मंत्रीमंडळातील समावेशाबाबत सांगितले.

क्षीरसागर म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांची जी कामे व्हायला हवी होती, ती कामे होत नव्हती; म्हणून आम्ही गेलो. एकनाथ शिंदे यांनी आम्हा सर्वांना निधी दिला. त्यांनी मदत केली म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आताची अडीच वर्षे महत्वाची आहेत. त्यामुळे जी व्यक्ती उपयुक्त आहेत, त्यांचा ते नक्कीच विचार करतील. मी गेल्या ३६ वर्षांत कधीच इकडे तिकडे गेलो नाही. सन २०१४ पासून दरवेळी माझं नाव मंत्री मंडळात समावेश होईल, असे होते. मात्र, मला कधीच स्थान दिले नाही. या वेळी संधी दिली तर मला आनंद होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT