Amit Shah-Narendra Modi sarkarnama
विशेष

मोदी-शहा 2024 ला घरी जाऊ शकतात... पण काॅंग्रेसने अशी तयारी दाखवली तर!

सध्याच्या रचनेतील काॅंग्रेस ही भाजपचा पाडावा करण्यासाठी सक्षम नसल्याचे प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचे मत

सरकारनामा ब्यूरो

राजकीय वर्तुळात प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे नाव अधुनमधून नेहमीच चर्चेत येत असते. त्यातही निवडणुकांचा हंगाम सुरू असतो तेव्हा त्यांच्या मताला महत्व प्राप्त होते. एक तर निवडणुकीचा निकाल काय लागणार, याचा अंदाज त्यांच्याकडून बरोबर मिळतो, असा माध्यमांना अनुभव आहे. दुसरे सध्या ते भाजपविरोधात इतर पक्षीयांचा आघाडी करण्याचा सल्ला देत असतात किंवा त्यासाठी ते तशी तयारीही करत आहेत. पण भाजपविरोधी पक्षांनी अद्याप त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेतले आहे. याला अपवाद फक्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. याचा उलट अर्थही असा आहे की ममता यांचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्य़तीत आणण्यासाठी प्रशांत किशोर यांचा खटाटोप सुरू असल्याचा इतर पक्षांचा संशय आहे. काॅंग्रेसला त्यांच्याबद्दल अतिसंशय आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रशांत किशोर यांना महत्व देत नाही. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांना त्यांची गरज वाटत नाही. `आप`ला ते नकोसे वाटतात, अशी सारी परिस्थिती आहे. असे असले तरी ते 2024 च्या निवडणुकीबाबत काय म्हणतात, याचे एक महत्व आहे. (Prashant Kishor Statement on 2024 Election)

प्रशांत किशोर यांनी गेल्या दोन दिवसांत माध्यमांना मुलाखती दिल्या. या मुलाखतीत त्यांना 2024 मध्ये भाजपला हरवणे शक्य आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर त्यांनी होय आणि नाही, असे दोन्ही बाजूंनी दिले. विरोधी पक्ष सक्षम असणे लोकशाहीत आवश्यक असते. त्यामुळे मी भाजपच्या विरोधात सध्या काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपला 2024 लोकसभा निवडणुकीत हरवायचे असेल तर काय करावे लागेल, या प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांनी भाजपची शक्तिस्थळे आणि कच्चे दुवे दोन्ही मांडले. त्या आधारे त्यांनी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या जोडीला हरविणे कठिण नसल्याचे स्पष्ट केले.

त्यांनी मुलाखतीत मांडलेले प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे

1)उग्र राष्ट्रवाद, हिंदुत्व आणि मोदी सरकारने आखलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजना (उज्वला, जनधन, शेतकरी सन्मान) या तीन कारणांमुळे भाजप सध्या अजिंक्य दिसत आहे. यापेक्षा वेगळे नॅरेटिव्ह विरोधी पक्षांना द्यावे लागेल. भाजपपेक्षा चांगल्या योजना जनतेला द्याव्या लागतील. उग्र राष्ट्रवादातील फोलपणा दाखवून द्यावा लागेल.

-बिहार, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळ या राज्यांत लोकसभेच्या सुमारे 200 जागा आहेत. भाजप लोकप्रियतेच्या शिखरावर असताना या दोनशे जागांपैकी केवळ 50 जागाच जिंकू शकला. या राज्यांतील उरलेले 150 खासदार हे पंतप्रधान निवडीमध्ये थेटपणे सहभागी नाहीत. आगामी निवडणुकांतही ही स्थिती फार बदलेल असे नाही.

-लोकसभेच्या उरलेल्या 350 जागांत (प्रामुख्याने उत्तरेतील हिंदी भाषक राज्ये आणि पश्चिमेकडील महाराष्ट्र व गुजरात) भाजप मात्र 300 हून अधिक जागा मिळवून सत्तास्थानी पोहोचतो. या जागांत भाजपचा स्टॅाईक रेट हा 80 ते 90 टक्के आहे. या 350 जागांत जर विरोधी पक्षांनी शंभरहून अधिक जागा मिळवल्या भाजपचे सत्तेचे गणित बिघडू शकते.

-या राज्यांत भाजपची लढाई ही प्रामुख्याने काॅंग्रेसशी आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काॅंग्रेस यांनाही शून्य किंवा नगण्य जागा आहेत. या राज्यांत जर नव्या रणनीतीने विरोधी पक्ष उतरले तर त्यांना भाजपला घालविणे शक्य होईल. येथील लढाई कोणाच्या नेतृत्वाखाली लढायची आहे, हे विरोधी पक्षांना ठरवावे लागेल.

-या राज्यांत विरोधी पक्ष एकत्र आले तरी भाजपचे वारू 2014 किंवा 2019 (उत्तर प्रदेशात समाजवादी आणि बसप एकत्र आले होते.) मध्ये रोखू शकले नाहीत, याकडे लक्ष वेधल्यावर प्रशांत किशोर म्हणतात की दोन पक्ष किंवा दोन नेते एकत्र आले म्हणजे त्या पक्षांची मते एकत्र येतात, असे नाही. त्यासाठी वेगळे नॅरेटिव्ह बनवावे लागते. भाजपला आतापर्यंत एकच आघाडी निवडणुकीत हरवू शकली ती म्हणजे 2015 च्या बिहार विधानसभेत झालेली नितीशकुमार आणि लालूप्रसाद यांची महाविकास आघाडी. त्यामुळे अशा प्रकारे धोरणात्मक आघाड्या झाल्या तर भाजपला त्याचा फटका बसू शकेल. या व्यतिरिक्त एकही आघाडी भाजपच्या विरोधात यशस्वी झाली नसल्याचा त्यांनी दावा केला.

-भाजपच्या विरोधात लढण्यासाठी काॅंग्रेसची गरज आहे. पण सध्याच्या रचनेतील काॅंग्रेस (राहुल गांधी) ही भाजपचा पाडाव करू शकत नाही. काॅंग्रेसला मुळापासून बदलावं लागेल, यावर किशोर यांचा भर आहे. त्यातही पक्षाचा अध्यक्ष बदलण्याचे मत ते मांडतात. पंतप्रधान पदाचा उमेदवार वेगळा आणि पक्षाचा अध्यक्ष वेगळा, असे काॅंग्रेस करू शकतो. गांधी घराण्यातीलच व्यक्ती पक्षाचा अध्यक्ष बनू शकतो, हे गृहितक पक्षाने बदलायला हवे. जे. पी. नड्डा हे भाजपचे अध्यक्ष असले तरी पंतप्रधान मोदी हेच भाजप चालवतात, हे उघड सत्य आहे. हे काॅंग्रेस करू शकते. साधा कार्य़कर्ता हा पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनू शकतो, हे जनतेत पोहोचविण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. काॅंग्रेस असे का करू शकत नाही. पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्या काळातही अशी व्यवस्था होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

-मोदी यांची प्रचंड लोकप्रियता सध्या असताना भाजपला हरविणे शक्य होईल का, या प्रश्नावर ते म्हणतात 1987 मध्ये मला राजीव गांधी हे 1989 ची निवडणूक हरतील असे कोणी म्हणत होते का. पण परिस्थिती बदलवता येऊ शकते. तशी रणनीती आखावी लागेल. आज पेट्रोल महाग झाले तरी देशासाठी आपण महाग पेट्रोलही घेऊ, अशी भूमिका सामान्य माणूस मांडत आहे. त्याला वस्तुस्थितीची जाणीव करून द्यावी लागेल.

-मोदीविरोधात चेहरा कोण आहे, याकडे लक्ष वेधल्यावर हा चेहरा एका रात्रीत किंवा पुढील काही दिवसांत विरोधी पक्षाचा चेहरा ठरणार नाही. त्यासाठी आधी या पक्षांना व्यवस्थित आखणी करावी लागेल. त्यानंतरच निर्णय घेता येईल. राहुल गांधी, ममता किंवा अखिलेश कोणीही चेहरा ठरू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT