Ashok Chavan Sarkarnama
विशेष

Modi Sworn in Ceremony : नांदेडचा पराभव भाजपच्या जिव्हारी; अशोक चव्हाणांच्या पदरी निराशाच

Sachin Waghmare

Modi Cabinet 2024 : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देत तडकाफडकी भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा प्रवेश झाल्याने त्यांना लगेचच राज्यसभेवर घेण्यात आले होते.

त्यामुळे निवडणुकीनंतर त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भाजपकडून त्यांना मंत्रिपद देण्यात न आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यात नाराजी पसरली आहे.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे माजी मुख्यमंत्री आहेत. दोन टर्ममध्ये ते काही काळ मुख्यमंत्री होते. त्याशिवाय ते राज्य मंत्रिमंडळात अनेक वर्ष मंत्री होते. त्यासोबतच ते लोकसभेचे खासदारही होते.

लोकसभा, राज्यसभा, विधानसभा व विधानपरिषद अशा चारही सभागृहाचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे होता. त्याचा फायदा भाजपच्या प्रवेशानंतर भाजपला होईल, असे वाटत होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना केंद्रात स्थान दिले जाईल, अशी अपेक्षा होती.

रविवारी सायंकाळी नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून त्यांच्यासोबत अनेक नेते मंत्रिपदाचीही शपथ घेणार आहेत. मात्र, यावेळेस पहिल्यांदाच मोदींच्या मंत्रिमंडळात मराठवाडा, कोकणाला स्थान देण्यात आलेले नाही.

राज्यात सुरुवातीला शिवसेनेत व त्यानंतर राष्ट्रवादीत बंड घडले. लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्येही फूट पडली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

त्यावेळी आपल्या जवळचे अनेक आमदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, माजी आमदारांना भाजपमध्ये घेऊन येतील, असा अंदाज होता. एक मोठा मराठा चेहरा भाजपमध्ये आल्याने मराठवाड्यात भाजपला (BJP) बळ मिळेल, असा अंदाज होता.

नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Chikhlikar) यांना चव्हाण यांच्या प्रवेशाचा फायदा होईल, असा अंदाज होता. त्याशिवाय शेजारील हिंगोली मतदारसंघात त्यांचा प्रभाव जाणवेल, असा भाजपच्या पक्षश्रेष्ठींचा होरा होता.

अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपकडून प्रतापराव चिखलीकर यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवण्यात आले होते.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि मुख्यमंत्रिपद देऊनही अशोक चव्हाणांनी ऐन निवडणुकीत बदलेला पक्ष या सर्व बाबींमुळे नांदेड मतदारसंघात नाराजी पसरली गेली. त्यामुळेच नांदेड लोकसभा मतदारसंघात चिखलीकर पराभूत झाले तर मराठवाड्यातील सात जागांवर महायुतीला पराभव स्वीकारावा लागला, अशी भाजप नेत्यांची धारणा झाली आहे. त्यामुळेच भाजपने त्यांचे मंत्रिपद नाकारले असावे, अशी चर्चा ऐकवयास मिळत आहे.

दुसरीकडे अशोक चव्हाण यांचे मात्र भाजपात येऊन खूप मोठे नुकसान झाले आहे, अशी चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यातूनच ऐकवयास मिळत आहे. माजी मुख्यमंत्री असलेल्या अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये केंद्रात काम करण्याची संधी मिळेल, असे वाटत होते. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. केंद्रीय मंत्रिपदाने हुलकावणी दिल्याने त्यांच्या कार्यकर्त्याच्या पदरी निराशा पसरली आहे.

SCROLL FOR NEXT