Ashok Chavan : अशोक चव्हाण यांची भाजपात एन्ट्री अन् चिखलीकरांची लोकसभेतून एक्झिट; काय हा योगायोग..!

Nanded Lok Sabha Result Explained : चाळीस वर्षे काँग्रेसमध्ये राहून सत्ता, पद, प्रतिष्ठा मिळवल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडून भाजपमध्ये जाणे जिल्ह्यातील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना रुचले नाही
Prataprao Chikhalikar
Prataprao ChikhalikarSarkarnama

Nanded Lok Sabha Election 2024 Result : राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले, मराठा समाजाचा आश्वसक चेहरा म्हणून ओळखले जाणारे अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीच्या काही महिनेआधी भाजपात प्रवेश केला. काँग्रेसचा बडा मासा गळाला लागल्याने आता महाराष्ट्रात शतप्रतिशत भाजपच अशा थाटात केंद्र आणि राज्यातील नेत्यांनी अशोक चव्हाण यांच्यासाठी पायघड्या घातल्या. दोन दिवसात राज्यसभेची उमेदवारी देत त्यांना खासदार केले.

आता याच अशोक चव्हाण यांची भाजपमधील एन्ट्री त्यांच्याच पक्षाचे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या लोकसभेची एक्झीट ठरेल, असे कोणाच्या ध्यानीमनी नव्हते. पण हे घडले आणि अब की बार चौरसौ पारमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांचा वरचा क्रमांक असेल, अशी गॅरंटी देणारे अशोक चव्हाण तोंडघशी पडले. लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे वंसत चव्हाण पन्नास हजाराहून अधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत.

चाळीस वर्षे काँग्रेसमध्ये राहून सत्ता, पद, प्रतिष्ठा मिळवल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडून भाजपमध्ये जाणे जिल्ह्यातील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना रुचले नाही. मी म्हणजेच नांदेड जिल्ह्याची काँग्रेस हा अशोक चव्हाण यांच्या भ्रमाचा भोपळा सामान्य कार्यकर्त्यांनी फोडला. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यात सुरु असलेले भव्य-दिव्य प्रवेश सोहळे, ऐकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असूनही गळ्यात गळे घालून फिरणारे चव्हाण-चिखलीकर, मोदी-शाह या केंद्रातील एक आणि दोन नंबरच्या नेत्यांनी नांदेडात येऊन घेतलेली सभा यापैकी काहीच चिखलीकरांना वाचवू शकले नाही.

या उलट काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांच्या पाठीशी जिल्ह्यातील सगळी काँग्रेस भक्कमपणे उभी राहिली. शिवसेना ठाकरे गट, शरद पवारांची राष्ट्रवादी यांचाही थोडाफार आधार वसंत चव्हाण यांना झाला. अशोक चव्हाण यांच्या पक्ष सोडून जाण्याने अशक्यप्राय वाटणारा विजय काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अक्षरशः खेचून आणला. मोदींच्या विकासाची गॅरंटी देणाऱ्या अशोक चव्हाण यांना नांदेडच्या मतदारांनी नाकारले.

चव्हाणांनी केलेल्या गद्दारीचा काँग्रेसच्या पांरपारिक मतदारांनी असा काही वचपा काढला, की भाजपच्या चिखलीकरांचे दुसऱ्यांदा दिल्लीत जाण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. अशोक चव्हाण यांचा पायगुण चिखलीकरांसाठी काही चांगला ठरला नाही. चव्हाण-चिखलीकर जोडी अन् महायुतीतील शिवसेना शिंदे, अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत असल्याने भाजपला नांदेडची जागा हमखास निवडून येईल, असा विश्वास होता. जोखीम नको म्हणून मोदी, शाह यांनी दोन सभा घेतल्या, पण त्याही चिखलीकरांना वाचवू शकल्या नाही.

Prataprao Chikhalikar
Uddhav Thackeray On BJP : 'भूल चुका हूँ उन लोगों को जिनको गलती से चुन लिया था !' ठाकरेंनी फटकारले..

मराठा फॅक्टरने वाट लावली..

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अशोक चव्हाण हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होते. तेव्हा मराठा आरक्षणा संदर्भात घेतलेली भूमिका त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच बदलली. मराठा समाजामध्ये याबद्दल तीव्र संताप होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान, स्वतःच्याच जिल्ह्यात, मतदारसंघात, गावात अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर यांना मराठा आंदोलकांनी रोखत जाब विचारला होता. काही गावातून त्यांना माघारी धाडण्यात आले होते.

दरम्यान, ही धोक्याची घंटा ओळखून अशोक चव्हाण यांनी थेट अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री भेट घेऊन चर्चा केली होती. या भेटीनंतर आपल्याला मराठा समाजाचा कुठलाही विरोध नाही, मी जरांगे यांना माझी वैयक्तिक आणि भाजपची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका पटवून दिल्याचा दावाही चव्हाण यांनी केला होता. मात्र त्यानंतर काही दिवसातच चव्हाण, चिखलीकर यांना भोकर मतदारसंघातील एका प्रचारसभेत मराठा आंदोलकांनी भाषण थांबवत जाब विचारला होता.

या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मु्द्यावरून समाजामध्ये असलेला रोष मतांच्या रुपात व्यक्त झाल्याचे दिसून आले आहे. अशोक चव्हाण यांनी ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला धोका दिल्याची भावना राज्यातील आणि केंद्रातील वरिष्ठ नेत्यांमध्ये होती. त्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना राज्यातील नेत्यांना देण्यात आल्या होत्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अमित देशमुख या नेत्यांनी नांदेडमध्ये जोर लावला होता.

अशोक चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थामधील नगरसेवक, पदाधिकारी, काही नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश करवून घेतला असला तरी काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता पक्षासोबत ठामपणे उभा होता. वसंत चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा झालेली प्रचंड गर्दी नादेडमध्ये काँग्रेसचा मोठा विजय होणार हे दर्शवणारी होती. मतदानानंतर झालेल्या विविध चॅनल आणि सर्वेमध्ये नांदेडात काँग्रेसचे वसंत चव्हाण विजयी होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. आजच्या निकालने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

विधानसभा निवडणुकीत फटका बसणार..

लोकसभेतील महाविकास आघाडीच्या विजयाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचे गणित बिघडणार आहे. अशोक चव्हाण यांना त्यांची मुलगी श्रीजया हिला भोकरमधून आमदार करायचे आहे, तर चिखलीकरांना आपल्या मुलाला लोहा-कंधार मधून विधानसभेत पाठवायचे आहे. परंतु लोकसभेतील पराभावाने या दोन्ही नेत्यांचे हे स्वप्नही धोक्यात येणार आहे. अशोक चव्हाण- प्रताप पाटील चिखलीकर या दोघांच्या एकत्रित ताकदीनंतरही काँग्रेसने नांदेडमध्ये भाजपला धूळ चारली, हा मोदी, शाह, फडणवीस, बावनकुळे यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Prataprao Chikhalikar
Lok sabha Nivadnuk nikal: रामभूमीने भाजपला नाकारलं, राजाभाऊ वाजे 1 लाख 61 हजार मतांनी विजयी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com