MPSC student Protest. Sarkarnama
विशेष

MPSC News: दुर्दैव! कुटुंब मागे सोडलेल्या विद्यार्थ्यांनी स्वप्नांचा पाठलाग करावा की निगरगट्ट व्यवस्थेशी भिडावं?

MPSC Students Protest : पूर्व परीक्षा पुढे ढकलावी, या मागणीसाठी एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पु्ण्यात गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. एमपीएससीच्या भोंगळ कारभारामुळे पूर्व परीक्षा आयबीपीएसच्या परीक्षेदिवशीच ठेवण्यात आली. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या विद्यार्थ्यांना निगरगट्ट व्यवस्थेशी दोन हात करावे लागत आहे, हे दुर्दैवी आहे.

अय्यूब कादरी

MPSC News : आपल्याकडे उच्चशिक्षित, मोक्याच्या जागांवर बसलेले अधिकारीही कधी कधी आश्चर्य वाटावे, अशा पद्धतीने निर्णय घेत असतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) यंत्रणेतही असे लोक बसले आहेत, असे दिसत आहे.

राज्यातील अनेक विद्यार्थी एमपीएससी आणि अन्य स्पर्धा परीक्षांची जीव तोडून तयारी करत असतात, सर्वस्व पणाला लावत असतात. एमपीएससीच्या लहरी निर्णयांचा अशा विद्यार्थ्यांना फटका बसत असतो.

एमपीएससी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखी आणि तोंडी परीक्षेच्या अग्निदिव्यातून जावे लागते. शासकीय नोकऱ्या मिळणे दुरापास्त झाल्यामुळे केवळ हीच नव्हे, तर विद्यार्थी अन्य स्पर्धा परीक्षांचीही तयारी करत असतात. अशावेळी एकाच दिवशी दोन परीक्षा आल्या तर? विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अग्निपरीक्षा ठरते. यंदा असेच झाले.

एमपीएससीची पूर्व परीक्षा आणि बँकिग क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी होणारी आयबीपीएस परीक्षा एकाच दिवशी म्हणजे 25 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांसमोर पेच निर्माण झाला आणि त्यांना आंदोलन करावे लागले.

आयबीपीएसची परीक्षा 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. ही तारीख जानेवारी 2024 मध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. एमपीएससीची पूर्व परीक्षाही याच दिवशी म्हणजे 25 ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय झाला. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर नवीनच संकट निर्माण झाले.

बरे, आपली व्यवस्था एकदा सांगून, निवेदन देऊन एेकणारी थोडीच आहे! व्यवस्था बहिरी असते, तिला ऐकू येईल, यासाठी कानठळ्या बसवणारा आवाज करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागले. अभ्यास करावा की व्यवस्थेसोबत लढा द्यावा, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला. सर्वच विद्यार्थ्यांच्या घरी आर्थिक सुबत्ता नसते. अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती हलाखीची असते. अशा प्रसंगांत या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागतो.

एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलावी, यासाठी पुण्यात विद्यार्थ्यांचे गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. तीन दिवस? थोडे नसतात तीन दिवस. या तीन दिवसांत एमपीएससीला निर्णय घेता आला नाही. कारभार इतका भोंगळ कसा असू शकतो, याचे उत्तर एमपीएससीला द्यावे लागेल. एमपीएससीच्या अशा भोंगळ कारभारामुळे निर्माण होणाऱ्या नाराजीची झळ सरकाला सोसावी लागते.

आयबीपीएसची परीक्षा 25 ऑगस्ट रोजी आहे, हे एमपीएससीच्या अध्यक्षांना, अधिकाऱ्यांना माहित नसेल का? माहित नसेल तर मग ते करतात काय, असा प्रश्न निर्माण होतो. माहित असेल तर मग असा तुघलकी निर्णय घेतात कसा, असाही प्रश्न कायम राहतो. यापूर्वी एमपीएससीची पूर्व परीक्षा दोनवेळा पुढे ढकलण्यात आली होती. तिसऱ्यांदा तारीख ठरवताना घोळ घालण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या तीन दिवसांच्या आंदोलनानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला आहे. त्यापूर्वी राजकीय नेत्यांनाही यात हस्तक्षेप करावा लागला. काही राजकीय नेत्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच एमपीएससीच्या अध्यक्षांना विनंती केली होती.

त्यानंतर एमपीएससीने अखेर गुरुवारी बैठक घेऊन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आपणच केलेली चूक दुरुस्त करण्यासाठी एमपीएससीला तीन दिवस लागले. एमपीएससीच्या अध्यक्षांमध्ये निर्णयक्षमतेचा इतका टोकाचा अभाव कसा असू शकतो, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना एका संधीला मुकावे लागणार होते. सांगून व्यवस्थेला कळत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यावरूनही राजकीय पक्षांनी आता राजकारण सुरू केले आहे. परीक्षा पुढे ढकलली तरी विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलेले नाही. कृषी सेवेच्या 258 जागांबाबत सरकारने निर्णय घ्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजितदादा पवार गट) नेत्या रूपाली ठोंबरे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

मागणी मान्य होऊनही काँग्रेसने हे आंदोलन वेठीस धरले आहे, असा त्यांचा आरोप आहे. राजकीय लोकांना तेवढी अक्कल नसल्याने हे आंदोलन सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुसरी परीक्षा असताना एमपीएससीने पूर्व परीक्षा ठेवलीच कशी, असा प्रश्न खरेतर त्यांनी उपस्थित करायला हवा होता. स्वप्नांचा पाठलाग करत घर, कुटुंबीय, गाव मागे सोडून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना व्यवस्थेशी दोन हात करावे लागतात, हे दुर्दैवी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT