Kolhapur News, 22 August : महायुतीच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (21 ऑगस्ट) रोजी महायुतीतील दोन बड्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिले. महायुतीला गळती लागली असतानाच आज गुरुवारी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि माजी जिल्हाध्यक्ष के.पी. पाटील यांनी महायुतीची साथ सोडली आहे.
उघड उघड भूमिका घेतली नसली तरी सलग दोन मेळाव्याकडे पाठ फिरवत बंडाचे संकेत त्यांनी दिले आहेत. महायुतीच्या (Mahayuti) मेळाव्याला हजर न राहण्यास त्यांनी पसंती दिली आहे. के.पी. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
मात्र, त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी कामानिमित्त ते जिल्ह्याबाहेर असल्याचे सांगितले आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीत ही जागा शिवसेना (Shivsena) शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. महायुतीमधून विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गळ्यात पुन्हा उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रवादी अजित पवार गटात गेलेले माजी आमदार के.पी. पाटील (K.P Patil) यांनी देखील आबिटकर यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.
मात्र, महायुतीतून उमेदवारी मिळत नसल्याने त्यांची पावले महाविकास आघाडीकडे वळत आहेत. आठवडाभरापूर्वी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मेळाव्याकडे त्यांनी पाठ फिरवून महाविकास आघाडीत जाण्याचे संकेत दिले होते. त्यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुरलेकर यांनी के.पी. पाटील यांना या मेळाव्यासाठी उपस्थित रहावे यासाठी निमंत्रण दिले होते. तरीदेखील त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.
अशातच आजच्या तपोवन मैदान येथे महायुतीच्या मेळाव्यात देखील ते आले आले नाहीत. एकंदरीतच आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उमेदवारी मिळवण्यासाठी के. पी पाटील यांनी महाविकास आघाडीकडे साकडे घातले असल्याचे सांगितले जात आहे. महायुतीचे तिन्ही नेते कोल्हापुरात असताना पाटील यांनी आजच्या मेळाव्याला दांडी मारल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, के. पी पाटील हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा काँग्रेसमध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.