Mumbai Cricket Association Election Sarkarnama
विशेष

MCAच्या निवडणुकीत ट्विस्ट : फडणवीसांच्या निकटवर्तीयास पवारांचे पाठबळ; शेलारांची शिष्टाई यशस्वी!

एमसीएच्या अध्यक्षपदासाठी भरलेला उमेदवारी अर्ज आशिष शेलार यांना माघारी घ्यावा लागला आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए MCA) निवडणुकीत आज (ता. १४ ऑक्टोबर) पुन्हा ट्विट आला आहे. एमसीएच्या अध्यक्षपदासाठी भरलेला उमेदवारी अर्ज आशिष शेलार (Ashish Shelar) यांना माघारी घ्यावा लागला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे अमोल काळे (Amol Kale) यांना पवार-शेलार गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. फडणवीसांच्या निकटवर्तीयासाठी शेलार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे मन वळविण्यात यश मिळविल्याने त्यांची शिष्टाई यशस्वी झाली आहे. (Mumbai Cricket Association Election: Amol Kale Pawar-Shelar group's presidential candidate)

एमसीएच्या निवडणुकीत पवार-शेलार गटाकडून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, त्यांना भारतीय क्रिकेट संघटनेच्या खजिनदारपदाचा अर्ज भरण्याची सूचना आली. त्यामुळे शेलार यांना एमसीएच्या निवडणुकीतील अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला. शेलार यांच्या विरोधात भारताचे माजी कसोटीपटू संदीप पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

शेलार यांनी माघार घेतल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी अमोल काळे यांचे नाव पुढे आले. पण, त्यासाठी शरद पवार तयार होतील की नाही, याची चर्चा होती. फडणवीस यांच्या निकटवर्तीयासाठी अखेर आशिष शेलार यांनी पवारांकडे यशस्वी शिष्टाई केली. पवारांच्या संमतीने शेलार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी अमोल काळे यांच्या नावाची घोषणा केली.

दरम्यान, बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट संघटनेत नियमाप्रमाणे एकाच वेळी दोन पदांवर राहता येत नाही. त्यामुळे मी एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून आपला अर्ज मागे घेतला आहे. पवार-शेलार पॅनेलकडून अमोल काळे हे अध्यक्षपदाची निवडणूक लढवतील. दीपक पाटील हे आमच्या पॅनलचे उमेदवार जॉईंट सेक्रेटरी पदावर बिनविरोध निवडून आले आहेत. पवार-शेलार पॅनलसाठी ही सुवार्ता आहे. तसेच, विहंग सरनाईक हेदेखील बिनविरोध निवडून येतील, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे आमदार आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT