Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील निवडणुकीचे रण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने राज्यभरात प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. राज्यातील सत्ता काबीज करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने मोठा जोर लावला आहे. त्यातच काही राजकीय विश्लेषक आणि नेतेमंडळीनी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचा अंदाज वर्तवला आहे.
त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळणार ? याची उत्सुकता लागली आहे. त्यात आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी महायुतीमधील कोणत्या घटक पक्षाला किती जागा मिळणार याचा थेट आकडाच सांगितला आहे. त्यासोबतच या निवडणुकीत कोणत्या पक्षाला वातावरण पोषक आहे, हे स्पष्ट केले आहे.
राज्यातील जनमत महायुतीच्या बाजूने असल्याचा दावा भाजप (Bjp) नेते विनोद तावडे यांनी केला आहे. लोकसभेला आघाडी आणि युतीच्या मतांमध्ये तेवढा फरक नव्हता. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला मतांचे विभाजन जास्त होणार आहे. त्याचा फरक निकालावर होणार असल्याचे तावडे म्हणाले.
या निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसने 150 जागा लढणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही. भाजपला ही जास्त जागा लढता आल्या असत्या. पण तसे झाले नाही. बंडखोरांना थंड करण्यात भाजपला यश आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीला यश मिळणार आहे.
सुरुवातीच्या काळात त्रिशंकु विधानसभा येईल, असे वाटत होते. पण तसे होताना दिसत नाही. महायुतीला जवळपास 155 ते 160 जागा मिळतील असा अंदाज तावडे यांनी व्यक्त केला आहे. शिवाय त्यातील भाजपला जवळपास 90 ते 100 जागा मिळतील. शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला 40 जागा मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 20 ते 25 जागा मिळतील, अशी सध्याची स्थिती असल्याचे त्यांनी सांगितले. अद्याप प्रचाराला काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखी बदलू शकते, असे तावडे यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे महाविकास आघाडीला125 च्या जवळपास जागा मिळतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस असेल. काँग्रेसनंतर सर्वात जास्त जागा या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून येतील, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर राहील, असेही ते म्हणाले. विधानसभेच्या प्रचारासाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. त्यात काय घडामोडी घडतात, वारे कोणत्या दिशेनं फिरतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.