Sanjay Raut-Nawab Malik sarkarnama
विशेष

`वानखेडे` चित्रपटाची कथा लिहिणारे `सलीम-जावेद`

नवाब मलिक (Nawab Malik) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वानखेडे यांच्या विरोधात बाजू आक्रमकपणे मांडली.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक विरुद्ध एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे या दोघांमधील वाद रोज वाढतच चालला आहे. वानखेडे यांच्याविरोधातील आरोपांची मालिका कायम ठेवत मलिक यांनी आजही खळबळ उडवून दिली. जी मंडळी आर्यनखानला अटक करण्यासाठी पुढे होते तेच आता कायद्याच्या कचाट्यात अडकल्याचे त्यांनी सांगितले.

पिक्चर अभी बाकी है, असे त्यांनी हे प्रकरण सुरू होण्यापूर्वी मलिक यांनी सांगितले होते. या प्रकरणात नंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही उडी घेतली. मलिक यांच्या आजच्या पत्रकार परिषदेत त्यांना पिक्चर संपला का, असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी तो मध्यंतरापर्यंत आल्याचे सांगितले. तसेच जोपर्यंत वानखेडे यांची नोकरी जाणार नाही आणि ते जेव्हा तुरुंगात पोहोचतील, तेव्हाच या चित्रपटाची समाप्ती होईल, असे सांगितले. इंटर्व्हलनंतर संजय राऊतदेखील या प्रकरणात उतरणार असल्याची आठवण त्यांनी करून दिली. त्यामुळे हे सारे स्क्रिप्ट `शोले` फेम सलीम-जावेद यांच्या जोडीप्रमाणे आम्ही पूर्ण करू, असेही त्यांनी हसतहसत सांगितले.

या वेळी बोलताना मलिक म्हणाले की मागील एक महिन्यापासून परिस्थिती बदलली आहे. समीर वानखेडे सांगतात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप केला गेला. या आरोपाचे नवाब मलिक यांनी खंडन केले. यामागची सर्व कारणे मलिक यांनी स्पष्ट केली. शिवाय वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचा फोटो मला रात्री दोन वाजता मिळाला. ज्यांनी फोटो दिला त्यांनी माझ्याकडून हा फोटो माध्यमांपुढे यावा, अशी इच्छा व्यक्त केली. ही लढाई कोणाच्या धर्माशी अथवा परिवाराशी नसून ही लढाई अन्यायाविरोधातील आहे, हे मलिक यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना ते म्हणाले की आजही मुंबई शहरात शंभरहून अधिक निरपराध लोक तुरुंगात आहेत. त्यांना खोट्या आरोपात अटक झाली आहे. यासंदर्भात २६ प्रकरणांचे पत्रक एनसीबीच्या डिजींना दिले असता याची चौकशी होईल असे सांगण्यात आले, मात्र कायद्यानुसार सादर केलेल्या माहितीमध्ये कोणाचे नाव नसल्याने या प्रकरणाची दखल घेण्यात आली नाही. तरीही या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. या २६ प्रकरणातील २२ क्रमांकाच्या प्रकरणात एका नायजेरीयन नागरिकाला खोट्या आरोपात अडकविण्यात आले. या कारवाईतील पंच कांबळे यांनी याची कबुली दिली आहे. त्यामुळे मी दिलेल्या पत्राच्या माध्यमातून या २६ प्रकरणांची चौकशी बंद न करण्याची मागणी एनसीबीच्या डिजींकडे करणार असल्याचे ते म्हणाले.

काशिफ खान आणि वानखेडे यांचे नाते काय?

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील दाढीवाल्या व्यक्तीवर मलिक यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्याची माहितीही त्यांनी दिली. त्या व्यक्तीचे नाव काशिफ खान असे असून हा मोठा ड्रग पेडलर असल्याचा दावा मलिक यांनी केला. शिवाय हा व्यक्ती अवैध सेक्स रॅकेट, पॉर्नोग्राफी चालवत असल्याचे ते म्हणाले. काशिफ खान हा समीर वानखेडेचा चांगला मित्र आहे. अनेक अधिकाऱ्यांनी काशिफ खानवर कारवाईचा प्रयत्न केला असता त्यांना रोखण्याचे काम वानखेडे यांनी केल्याचे समोर आले आहे.

माझ्या व्यक्त होण्यावर बंधने आणण्यासाठी वानखेडेंची हायकोर्टात धाव

नवाब मलिक यांनी माध्यमांपुढे आणि ट्विटरवर आपली भूमिका व्यक्त करु नये यासाठी वानखेडे यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. हा अधिकारी स्वत:ला कोण समजतो? अशा तीव्र शब्दात मलिक यांनी त्यांचा समाचार घेतला. देशातील नागरिकांचा बोलण्याचा मौलिक अधिकार वानखेडे हिरावून घेऊ शकत नाहीत. कोणाच्याही बोलण्याला आणि लिखाणाला रोखणे म्हणजे स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले.

तसेच काही दिवसांपूर्वी वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती. आज तोच अधिकारी मुंबई पोलिसांविरोधात हायकोर्टात अविश्वास दाखवत आहे. यातून त्यांची भीती स्पष्टपणे समोर येत आहे, असेही मलिक यांनी सांगितले.

महाराष्ट्रातून बॉलिवूड बाहेर नेण्यासाठीच बदनामीचे षडयंत्र

वानखेडे यांच्या परिवाराने मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे पत्र लिहिले. यावर भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते पुढे आले आहेत. मात्र राक्षसाचा जीव पोपटात आहे, या कथेचे उदाहरण देत मलिक यांनी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला. भाजपसारख्या राक्षसी विचारांच्या लोकांना आता चिंता वाटू लागली आहे की, जर पोपट तुरुंगात गेला तर इतर गोष्टी समोर येतील. महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी वानखेडे यांनी कारवाईची मालिका सुरु केली, ज्यामध्ये निशाणा साधून बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. योगी सरकार आपल्या राज्यात फिल्म सिटी घेऊन जाण्याचा विचार करत आहेत. मात्र हे बॉलिवूड उभारण्यासाठी अनेक मराठी दिग्गज कलाकारांनी योगदान दिले असल्याचे मलिक यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT