Pimpri Chinchwad News : ‘पिंपरी-चिंचवडचा विकास हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंचवीस वर्षांपूर्वी दाखवलेल्या दूरदृष्टीचा परिणाम आहे, ’ असे अनेक जण म्हणतात. त्यात तथ्यही आहे. कारण, त्यांच्याच नेतृत्वाखाली सलग पंधरा वर्षे महापालिकेत सत्ता होती. २०१७ मध्ये ती भारतीय जनता पक्षाने काबीज केली. हे शल्य बोचत असताना राज्यात राजकीय उलथापालथ झाली आणि भाजपच्याच ‘संगतीनं’ पवार गेले.
उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा पालकमंत्री म्हणून काम पाहू लागले. महापालिकेतही लक्ष घालू लागले. नुकतेच ‘जनंसवाद’ व ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ उपक्रमातून नागरिकांशी थेट संपर्क साधला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आखलेल्या या व्यूव्हरचनेतून ‘कार्यकर्त्यांसह मतांची मोट’ बांधण्याचा प्रयत्न करून विविध ‘लक्ष्य’ साधण्याचा प्रयत्न पवारांकडून केला जात असल्याचे चित्र आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका १९८२ मध्ये अस्तित्वात आली. तेव्हापासून आतापर्यंतच्या प्रवासात अनेक राजकीय स्थित्यंतरे शहराने पाहिली. १९८२ ते १९८६ आणि मार्च २०२२ पासून आतापर्यंत अशी सुमारे साडेआठ वर्षे प्रशासकीय कारभार नागरिकांनी राहिला. १९८६ ते १९९९ पर्यंत कॉंग्रेसची सत्ता होती. मात्र, पक्षात फूट पडून राष्ट्रवादी कॉंग्रेस अस्तित्वात आली. त्यानंतर २००२ च्या निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडीची तर, २००७ व २०१२ च्या निवडणुकीत अर्थात २०१७ पर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसची महापालिकेत सत्ता होती.
२००९ पर्यंत पिंपरी चिंचवडचा समावेश बारामती लोकसभा मतदारसंघात होता. त्याचे नेतृत्व राष्ट्रवादीचे तत्कालीन अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्याकडे होते. मात्र, शहराची सूत्रे त्यांचे पुतणे तथा तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच हाती होती. १९९१ मध्ये खासदार असतानाही त्यांचा पिंपरी चिंचवडशी संबंध आला. २००२ ते २०१७ या कालावधीत रस्त्यांचे रुंदीकरण असो वा नाशिक फाटा, भोसरीतील उड्डाणपूल; अनेक प्रकल्प त्यांच्या नेतृत्वाखाली झाले.
पण, २०१४ मध्ये काही जणांनी त्यांची साथ सोडून भाजपची वाट धरली आणि २०१७ ला महापालिकेतील खुर्ची सोडण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली. हे शल्य पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना बोचत होते. २०१७ ते २०२२ या काळात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष महापालिकेत बघायला मिळाला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून २०२४ च्या निवडणुकीपर्यंत राज्यात राजकीय उलथापालथ झाली. अनेक समीकरणे बदलली. शिवसेनेसह राष्ट्रवादीतही फूट पडली. भाजपने शिवसेनेसोबत सरकार स्थापन केले. त्यांच्या ‘संगतीनं’ अजित पवारही गेले. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री व पालकमंत्री म्हणून काम पाहू लागले. महापालिकेत प्रशासकीय कारभार असल्याने अधिकाऱ्यांवर राजकीय वर्चस्व कायम ठेवले. प्रत्येक कामाचा आढावा घेऊ लागले. त्यामुळे स्वयंघोषित नेत्यांसह अधिकाऱ्यांवरही वचक असल्याचे दिसू लागले आहे.
नुकताच पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार यांनी सलग २ दिवस तळ ठोकला. 'जनंसवाद'च्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्वच विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर 'राष्ट्रवादी परिवार मिलन' उपक्रमातून पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकत्यांचे कुटुंबीय व नागरिकांशी घरोघरी जाऊन थेट संपर्क साधला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आखलेल्या या व्यूहरचनेतून ' कार्यकर्त्यांसह मतांची मोट बांधण्याचा आणि विविध भागांवर 'लक्ष्य' साधण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू असल्याचे दिसते.
स्वबळाचे संकेत; तडजोडीचीही चर्चा :
अजित पवार यांच्या सध्याच्या हालचाली पाहता, महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे फुटीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद खऱ्या अर्थाने दिसणार असल्याची चर्चा आहे. शिवाय, नाराज कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे. मात्र, भाजपसोबत युती झाल्यास सर्व काही विसरून कार्यकर्त्यांनाही ‘तडजोड’ करावी लागणार आहे. कारण, राज्य व केंद्र सरकारमध्ये दोन्ही पक्ष एकत्र आहेत.
तळ्यात-मळ्यात करणाऱ्यांना ‘संदेश’ :
भाजपसोबत जाऊन अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी सर्वांच्या स्मरणात आहे. त्यावेळी त्यांना साथ देणारे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांना थेट विधानसभा उपाध्यक्षपदाचे ‘बक्षीस’ पवार यांनी दिले. यातून ‘आपल्याशी एकनिष्ठ, त्याच्याबाबत निर्णय स्पष्ट’ असा सूचक संदेश ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ म्हणत ‘तळ्यात-मळ्यात’ करणाऱ्या पक्षातील जुन्या-जाणत्या कारभाऱ्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही त्यांनी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.