Jalgaon News : राज्यातील विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणदेखील तापण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 ऑगस्टला जम्मू-काश्मीर व हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या.
महाराष्ट्राची निवडणूक कधी जाहीर होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असला तरी जळगावमध्ये लखपती दीदी संमेलनाच्यानिमित्त आलेल्या पीएम मोदींनी (Narendra Modi) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासमोरच विविध घोषणा करीत विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
लोकसभा निवडणुकीत पिछाडीवर पडल्याने भाजपसह महायुतीतील सर्वच पक्ष आता दक्ष झाले आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी महायुतीने लाडक्या योजनांचा आधार घेतला आहे. तर विरोधकही सरकारला योजनांसह अनेक मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. याच वेळी जळगावमधून पीएम मोदी यांनी मोठ्या घोषणा करीत राज्य सरकार करीत असलेल्या कामांचे कौतुक केले. त्यासोबतच येत्या काळात राज्य सरकारच्या विविध योजनासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्याची घोषणा केली.
एका तराजूत अन्य सरकारचे सात दशक आणि दुसऱ्या बाजूला मोदी सरकारची दहा वर्षे ठेवली जावीत. मोदी सरकारने जेवढं काम माता भगिनींसाठी केले ते कोणत्याच सरकारने केले नाही. जी घरे सरकारकडून बनवली गेली. ती सर्व घरे माता भगिनींच्या नावावर आहेत. बचतगटांशी जोडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील लाखो माता भगिनींना कोट्यवधी रुपयांची मदत मिळाली. या पैशातून आम्हाला अनेक महिलांना लखपती दीदी बनवण्यासाठी फायदा होणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले आहे.
मी गेले दोन दिवस विदेश दौऱ्यावर होतो. पोलँडमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन झाले. तेथील महाराष्ट्राच्या लोकांचा सन्मान करतात. तेथील राजधानीत कोल्हापूर मेमोरियल आहे. त्यांनी कोल्हापूरच्या लोकांच्या सेवा आणि सत्काराच्या भावनेचा सन्मान करण्यासाठी बनवले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले.
गेल्या 10 वर्षांत 1 करोड लखपती दीदी बनल्या आहेत. तर गेल्या 2 महिन्यांत 11 लाख लखपती दीदी बनल्या आहेत आणि महाराष्ट्रातूनही 1 लाख लखपती दीदी झाल्या आहेत. राज्यातील महायुती सरकारने यासाठी प्रयत्न केले आहेत. राज्यातील महिला, युवा आणि शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या असल्याचे सांगत त्यांनी कामाचे कौतुक केले.
त्यासोबतच पीएम मोदी यांनी राज्यातील महायुती सरकार सर्वसामान्यसाठी चांगले काम करीत असल्याचे सांगत येत्या काळात या सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. त्यामुळे या निमित्ताने पीएम मोदी यांनी आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याची चर्चा जोरात कार्यक्रमस्थळी सुरु होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.