Rahul Gandhi  Sarkarnama
विशेष

Rahul Gandhi VS Narendra Modi : पोएटिक जस्टिस - पप्पू ते पनौती ! भाजपने जे पेरले तेच उगवले...

अय्यूब कादरी

Political Analytics : अंतिम सामन्यात प्रत्येक क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करत ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने वर्ल्ड कप आपल्या नावे केला. स्पर्धेत एकाही सामन्यात पराभूत न होता अंतिम फेरीत दाखल झालेल्या भारतीय संघाचा पराभव झाला. त्यावेळी स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. ही संधी साधून राहुल गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. 'पनौती'मुळे भारतीय संघ पराभूत झाला, असे ते मोदींना उद्देशून म्हणाले. राहुल गांधी यांना सतत पप्पू, मंदबुद्धी म्हणणाऱ्या भाजप नेत्यांचे पित्त यामुळे चांगलेच खवळले. आता त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.

इंग्रजी साहित्यात पोएटिक जस्टिस (काव्यगत न्याय) नावाची एक संज्ञा आहे. याचा अर्थ असा की तुम्ही एखादे वाईट काम केले की, त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावेच लागतात, एखाद्याच्या वाटेत काटे पेरले की ते काटे तुमच्या वाटेतही येतात. आता भाजपची अवस्था अशीच झाली आहे. एकेकाळी पप्पू म्हणून भाजपने हिणवलेल्या राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पनौती म्हणून हिणवले आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, काही वर्षांपूर्वीपर्यंत मोदींचा अपमान करणे म्हणजे स्वतःचे नुकसान करून घेणे, अशी स्थिती होती. म्हणजे नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली की, विरोधकांचे नुकसान व्हायचे आणि मोदींना त्याचा फायदा व्हायचा. अनेक निवडणुकांमध्ये त्याची प्रचिती आली आहे. मोदी यांच्याबाबत मणिशंकर यांच्या कथित वादग्रस्त विधानानंतर भाजपला झालेला फायदा हे त्याचे ठळक उदाहरण म्हणावे लागेल.

आता तशी परिस्थिती राहिली आहे का? याचे उत्तर नाही असे देता येईल. या उत्तराला पूरक म्हणून यंदा कर्नाटकात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीकडे पाहता येईल. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने जंगजंग पछाडले. धर्माचा मुद्दा आणला, भ्रष्टाचाराचा आणला, मात्र त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे पाहून मोदी यांनी हमखास यश मिळवून देणारे अस्त्र बाहेर काढले. ते म्हणजे, विरोधकांकडून माझा अपमान केला जात आहे, मला शिव्या दिल्या जात आहेत... आतापर्यंत मला ९१ शिव्या देण्यात आल्या आहेत. मोदी असे जाहीर प्रचार सभेत म्हणाले होते. तरीही भाजपचा दारुण पराभव झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हे हेरले आणि त्यांना पनौती म्हणण्याचे धाडस दाखवले. पूर्वी मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका केली की लोक चिडायचे. आता तसे होताना दिसत नाही, हे राहुल गांधी यांच्या लक्षात आले असावे, अन्यथा राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर त्यांनी असे धाडस केले नसते.

काही वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी मुंबईचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांच्याभोवती लोकांची झुंबड उडाली होती. गांधी कुटुंबीय हा काँग्रेस पक्षाचा सर्वात मोठा आधार. काँग्रेसला निष्प्रभ करायचे असेल तर गांधी कुटुंबीयांना लक्ष्य करणे आवश्यक आहे, हे भाजपच्या आयटी सेलने ओळखले होते. या दोन बाबी लक्षात घेऊन भाजपच्या आयटी सेलने आपले काम सुरू केले होते. राहुल गांधी यांची प्रतिमा पप्पू अशी करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. त्यात त्यांना मोठे यशही आले.

पंतप्रधानपदाच्या सुरुवातीच्या काळात तर मोदी यांनीही राहुल यांची जाहीर कार्यक्रमांत नक्कल केली होती. आलू-सोना मशीन हे वाक्य राहुल गांधी यांच्या तोंडी घालण्यात आले. त्याच्या मागचे पुढचे संदर्भ वगळण्यात आले. मागचे पुढचे संदर्भ घेतले असते तर आलू सोना मशीन हे वाक्य नरेंद्र मोदी यांचेच आहे हे लक्षात आले असते. काँग्रेस(Congress) चा आयटी सेल तुलनेने दुबळा होता. त्यांना अशा बाबींचा प्रभावी प्रतिवाद करता येत नव्हता. मात्र, कालांतराने काँग्रेसचा आयटी सेलही आता मजबूत झाला आहे. आरे ला कारे करायचे बळ त्यांच्यात आले आहे.

राहुल गांधी यांना सातत्याने पप्पू, मंदबुद्धी, काँग्रेस का राजकुमार असे म्हणणाऱ्या भाजपची आता कोंडी झाली आहे. नुकत्याच झालेल्या एका प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख 'मूर्खों का सरदार' असा केला होता. क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याच्या आदल्या दिवसापासूनच समाजमाध्यमांत पनौतीचा खेळ सुरू झाला होता. त्यावर विविध प्रकारचे मिम्सही यूजर्सनी तयार केले होते. भारतीय संघाचा पराभव झाला आणि राहुल गांधी यांनी संधी साधली.

सर्वकाही व्यवस्थित सुरू होते, मात्र पनौतीमुळे आपल्या संघाचा पराभव झाला, अशी टीका त्यांनी केली. ती भाजपला झोंबली नसती तरच नवल. भाजपने(BJP) आता राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक आयोगात धाव घेतली आहे. भाजपने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या वाटेत पेरलेले काटे आता मोदी आणि भाजपच्या वाटेत उगवत आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT