Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. एकसंध शिवसेनेचा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच राज व उद्धव ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पाहवयास मिळाली. दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी मुंबईतील पंचताराकिंत हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे नेते राज ठाकरे यांनी भेट घेतली.
या भेटीमुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला काहीसा ब्रेक लागला असला तरी आता या दोघांच्या भेटीचा धुरळा काही केल्या खाली बसायला तयार नाही. फडणवीस व राज ठाकरे हे दोन नेते चोरी... चुपके...चुपके... एकमेकाला भेटले खरे पण आता या दोन दिगग्ज नेत्याच्या भेटीनंतर त्यांच्या कोण कोणाला भेटले! यावरून मंत्री आशिष शेलार व मनसेचे नेते संदीप देशपांडे दोन बड्या नेत्यामध्ये वाद पेटला आहे.
फडणवीस व राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोन नेते गपचूप एका हॉटेलमध्ये भेटले होते. त्या भेटीनंतर काही वेळातच या दोन नेत्यांची भेट झाल्याचे प्रसार माध्यमाने उघडकीस आणले होते. त्यानंतर आतापर्यंत या दोन नेत्यांनी या भेटीविषयी गुप्तता पाळत आतापर्यंत त्या विषयी ब्र शब्द देखील बाहेर काढलेला नाही. त्यामुळे ही भेट झाली का नाही? यावर सस्पेन्स कायम होता.
दुसरीकडे या दोन नेत्यांमधील या गोपनीय भेटीवर हल्लाबोल करताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. कामाबाबत भेट असली तरी या दोन नेत्यांनी वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अथवा सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेणे उचित ठरले असते असे म्हटले आहे. मात्र, या दोन नेत्यांनी एका पंचताराकिंत भेट का? घेतली या वरून टीका करताना या हॉटेलच्या लॉबीमध्ये काही बिल्डर उपस्थित असल्याचा आरोप केला आहे. राऊत यांच्या या टीकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
फडणवीस (Devendra Fadnavis)-राज ठाकरे यांच्या गुप्त भेटीची चर्चा काहीशी थंडावली असे वाटत असतानाच, आता या चर्चेला नव्याने उधाण आले आहे. या भेटीचं समर्थन करणारे भाजप व मनसेचे नेते आता थेट एकमेकांशी भिडताना दिसत आहेत. विशेषतः भाजप नेते आशिष शेलार आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यातील वाद हे याच पार्श्वभूमीवर चांगलाच उफाळून आला आहे.
आशिष शेलार यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना अप्रत्यक्षपणे मनसेच्या भूमिकेवर टीका केली आहे. सीएम नाही तर राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. प्रसार माध्यमानी मुख्यमंत्री राज ठाकरे यांना भेटले असे बोलून गैरसमज पसरवू नये, असे देखील शेलार म्हणाले.
दुसरीकडे संदीप देशपांडे यांनीही आशिष शेलार यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काही लोक चहापेक्षा किटली गरम अशा पद्धतीचे असतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही. राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे एकमेकाना भेटले. यावरून या दोघांना काही प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या नाहीत. मात्र, इतर मंडळीच त्यावर बोलत आहेत, असेही देशपांडे म्हणाले. भाजप व मनसे या दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या या वक्तव्यांमुळे आगामी काळात राजकीय समीकरणे कशी जुळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.