IAS Shrikant Khandekar Sarkarnama
विशेष

IAS Shrikant Khandekar : आप्पा म्हणत होता, मी आत्महत्या करतो मंत्रालयासमोर जाऊन..! शिंदेंच्या IAS जावयानं लिहिलेलं मन हेलावून टाकणारं ‘ते’ वास्तव...

Ram shinde son in law news : श्रीकांत खांडेकर यांनी कलेक्टर होण्यासाठीचा आणखी एक टप्पा गाठला. आता कलेक्टरच्या खुर्चीवर बसण्याचे त्यांचे आश्वासन लवकरच पूर्ण होणार आहे.

Rajanand More

IAS personal story : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे IAS जावई श्रीकांत खांडेकर सध्या चर्चेत आले आहेत. बिहारची राजधानी पटना येथे त्यांची उप विकास आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. हे पद उपजिल्हाधिकारी दर्जाचे आहे. त्यामुळे या नियुक्तीला महत्व प्राप्त झाले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मेहनतीच्या जोरावर त्यांनी IAS पर्यंतचा टप्पा गाठला अन् आज ते बिहारमध्ये आपला कामातून दबदबा निर्माण करत आहेत.

श्रीकांत खांडेकर यांच्या या वाटचालीत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अत्यंत कष्टातून आपले ध्येय गाठणाऱ्या उमद्या IAS अधिकाऱ्याला राम शिंदे यांनी पहिल्या भेटीतच जावई म्हणून पसंत केले होते. IAS होण्यासाठी त्यांना कुठून प्रेरणा मिळाली, याचे मन हेलावून टाकणारे उत्तर त्यांनीच १५ वर्षांपूर्वी लिहून ठेवले आहे.  

मुळचे मंगळवेढा तालुक्यातील IAS खांडेकर यांनी २३ सप्टेंबर २०१५ रोजी त्यांनी एका कागदावर आपल्या वेदना उतरविल्या होत्या. त्यात त्यांनी म्हटले होते की, आज खूप दिवसांनंतर लिहायला घेतलंय. त्याला कारणही तसंच आहे. कालच गणपतीच्या सुट्टीवरून परत आलोय. आता शेवटच्या वर्षात पोहचलो आहे. घरी गेल्यानंतर तिथली परिस्थिती पाहिली. मन सुन्न झालंय. आता तीच परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून कामाला लागलोय. सगळा गाव विचारतोय नोकरी कधी लागणार?

आमच्यावर ८ लाख रुपये कर्ज झालंय. ३ टक्के दराने व्याज महिन्याला २४ हजार रुपये फक्त व्याजच जातं. शेतातले तिन्ही बोअर आटले आहेत. कधी नव्हे ते यावर्षी पिण्याला देखील पाणी नाही. मोटर १५ दिवसांत जळते. आतातर अशी परिस्थिती झालीय, मोट दुरूस्त करायला देखील पैसे नाहीत. अशा परिस्थिती आप्पाला आता माझ्याकडूनच खूप अपेक्षा आहेत, असे खांडेकर यांनी लिहिले होते.

त्यादिवशी आप्पानं खूप टेन्शन घेतलं. बँकेतील अधिकारी कर्ज देत नव्हते. त्यामुळे आप्पा म्हणत होता मी आत्महत्या करतो मंत्रालयासमोर जाऊन. शेत विकूया बोलत होता. त्यादिवशी मी खूप रडलो. पण आप्पाला वाटायचं शेत विकल्यावर आजपर्यंत मी एवढं कमवलं ते कुठं गेलं सगळं. मी आणि आईला देखील, दाद्याला पण वाटायचं शेत नकोच विकायला, असं मन हेलावून टाकणाऱ्या भावना IAS खांडेकर यांनी कागदावर उतरविल्या होत्या.

श्रीकांत खांडेकर यांनी पुढे लिहिले होते की, त्यावेळी मी आप्पाला सांगितले. आप्पा, दोन वर्षात कितीपण १५ लाख रुपये कर्ज होऊ दे. मी दोन वर्षात फिटवतो. तू टेन्शन नको घेऊ. त्यामुळे आप्पाला बरं वाटलं. आप्पाचा माझ्यावर खूप विश्वास. मी आप्पाचं नाव मोठं करणार, असं सगळ्यांना वाटतं. गावातले सगळे विचारतात, तुला कुठली नोकरी लागणार? ते बोलतात तू आयएएस झाला पाहिजे, आपल्या गावातला पहिला अधिकारी झाला पाहिजे. मी देखील त्यांना आश्वासन दिलंय की, मी कलेक्टर होऊन दाखवणारच, असे म्हणत त्यांनी आपल्या लेखनाला पूर्णविराम दिला होता. या लेखनानंतर पाच वर्षांत ते IAS बनले. नुकताच त्यांनी कलेक्टर होण्यासाठीचा आणखी एक टप्पा गाठला. आता कलेक्टरच्या खुर्चीवर बसण्याचे त्यांचे आश्वासन लवकरच पूर्ण होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT