Shivaji Raje Nimbalkar
Shivaji Raje Nimbalkar  Sarkarnama
विशेष

निवृत्त अधिकाऱ्यासही सहकारी साखर कारखानदारीची गोडी

संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : साखर कारखान्याचा संचालक होण्याचा मोह प्रत्येक राजकीय नेत्याला, कार्यकर्त्याला असतो. आमदार-खासदार यांनादेखील सहकाराचा गोडवा मोहीत करतो. आता तर राज्याचा कारभार सांभाळणाऱ्या माजी प्रशासकीय अधिकाऱ्यासही कारखान्याचे संचालकपद हवेसे वाटत आहे. राज्याचे निवृत्त महसूल उपायुक्त शिवाजीराजे निंबाळकर या सरकारी अधिकाऱ्याने सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोमेश्वर कारखाना परिसरातील सभासदांना आपल्या प्रशासकीय कौशल्याचा काही उपयोग व्हावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. (Retired Deputy Commissioner of Revenue Shivaji Raje Nimbalkar files nomination for Someshwar factory)

सोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत २१ जागांसाठी विविध गटांचे ४७६ अर्ज वैध ठरले आहेत. या यादीत आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पदे भूषविणारे व पक्षीय कामातील नेते अथवा कार्यकर्ते आहेत. एक नाव वेगळे आहे ते म्हणजे बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील शिवाजीराजे निंबाळकर यांचे. निंबाळकर यांनी तहसीलदारपदी नियुक्तीनंतर कोल्हापूर, इचलकरंजी येथे प्रांताधिकारी आणि त्यानंतर निवासी जिल्हाधिकारी म्हणून पुणे, सातारा येथे सेवा बजावली. याशिवाय समाजकल्याण विभागाचे राज्य सहसंचालक, रोजगार हमी व पुरवठा विभागाचे राज्य उपायुक्त आणि महसूल विभागाचे राज्य उपायुक्त अशा पदांवर सेवा बजावली आहे. म्हणूनच त्यांचा उमेदवारी अर्ज कारखान्याच्या संचालक पदाचा दर्जा सिध्द करण्यास पुरेसा आहे.

अर्थात निंबाळकर सरकारी अधिकारी असले तरीही सहकाराचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळालेले आहे. कारण त्यांचे वडील द्वारकोजीराजे निंबाळकर हे सोमेश्वर कारखान्याचे संस्थापक संचालक होते. २०११ च्या निवृत्तीनंतर त्यांनी विधानसभा, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत पवार कुटुंबीयांच्या प्रचारात साथ दिली. नुकतीच वडगाव निंबाळकर ग्रामापंचायतीची झालेली निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलची सत्ता प्रस्थापित झाली आहे. स्वतः शेती पदवीधर असल्याने ऊसशेतीची चांगली जाण आहे.

निंबाळकर म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर अत्यंत चांगला चालला आहे. पुरूषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान संचालक मंडळाने तर चांगले काम करत राज्यातील उत्कृष्ट भाव दिला आहे. वार्षिक सभा लोकशाहीपूर्ण चालतात आणि कारभारात पारदर्शकता असते. म्हणूनच आपल्या प्रशासकीय अनुभवाचा परिसरासाठी काही उपयोग करता यावा, या उद्देशाने अर्ज भरला आहे. परंतु पक्षश्रेष्ठींचा निर्णय नेहमीच मान्य असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT