Mumbai News : कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे विधान भवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसले आहेत. त्याबाबतचा मुद्दा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवारांना खडे बोल सुनावले. उद्योगमंत्र्यांनी बैठकीचे आश्वासन देत उपोषण करू नये, असे आवाहन केले. त्यानंतरही अशा प्रकारे उपोषणाला बसणे उचित नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी आमदार रोहित पवारांचे कान उपटले. (Rohit Pawar should not go on hunger strike like this: Ajit Pawar)
पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आजपासून सुरू झाला आहे. त्याच्या पहिल्याच दिवशी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे एमआयडीसीच्या मुद्यावरून आक्रमक झाले आहेत. त्यांनी विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे. त्याबाबतचा मुद्दा आमदार देशमुख (Anil Deshmukh) यांनी उपस्थित केला होता.
आमदार रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसीसाठी पावसात उपोषणाला बसले आहेत. त्यांनी मागील अधिवेशनात एमआयडीसीची मागणी केली होती, त्या मागणीला उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिवेशन संपण्याच्या आधी आदेश काढण्यात येईल, असे उत्तर दिले होते. मात्र, दुसरे अधिवेशन येऊनही अजून आदेश निघालेले नाहीत, त्याची सरकारने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली.
आमदार अनिल देशमुख यांनी उपस्थित केलेल्या रोहित पवार यांच्या उपोषणाच्या प्रश्नाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, आमदार रोहित पवार यांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या एमआयडीसीसंदर्भातील पत्राची एक प्रत माझ्याकडेही आहे. उद्योगमंत्री सामंत यांनी १ जुलै २०२३ रोजी पत्र दिलेले आहे. त्यात उद्योगमंत्र्यांनी रोहित पवार यांना उत्तर देत म्हटलेले आहे की, आपले २२ जूनचे पत्र मिळाले. कर्जतमध्ये एमआयडीसी स्थापन करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात सर्व संबंधितांच्या समवेत बैठकीचे आयोजन करून उचित निर्णय घेण्यात येईल. उपोषणाला बसण्यासाठीचा घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा, असे आवाहन मंत्री सामंत यांनी रोहित पवार यांना केलेले आहे.
उद्योगमंत्री पत्र देतात. अजून अधिवेशन संपलेलं नाही. अधिवेशन सुरू होऊन एकच आठवडा झालेला आहे. आजच दुसरा आठवडा सुरू झालेला आहे. लोकप्रतिनिधींनीही निवेदन दिल्यानंतर एमआयडीसीचे अध्यक्ष आणि उद्योगमंत्र्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीरतेने दखल घेतली पाहिजे. अशा प्रकारे उपोषणाला बसणे उचित नाही. त्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत, अशा शब्दांत अजित पवार यांनी रोहित पवार यांना खडे बोल सुनावले.
'सरकार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रोहित पवारांची समजूत घालावी'
विधीमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील पायऱ्यांवर उपोषण अथवा आंदोलन करणे अयोग्य आहे, असा निर्णय सभागृहातील आमदारांनी एकमताने यापूर्वी घेतला आहे. त्यामुळे पुतळ्याची पवित्रता राखण्यासाठी रोहित पवार यांची सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ आमदारांनी समजूत घालावी. त्यांनी सभागृहात येऊन आपले म्हणणे मांडावे, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.