Salman Khan in Mahabaleshwar : बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी महाबळेश्वरमध्ये पोहाेचला आहे. त्याचा मुक्काम डीएचएफएल घोटाळ्यातील आरोपी आणि सध्या ईडीच्या कोठडीत असलेल्या वाधवानच्या बंगल्यात आहे, त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
सलमान खानने (Salman Khan) राहण्यासाठी वाधवान (Vadhwan) यांचा हाच बंगला का निवडला, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. घरावरील गोळीबार, धमकी या सगळ्या प्रकारामुळे अभिनेता सलमान खान मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यातच आता तो महाबळेश्वरला मुक्कामी पोहचला आहे.
गोळीबार आणि धमकीच्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सलमानची भेट झाली होती. त्यांच्या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. सलमान खान महाबळेश्वर येथे आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावी व घरी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दाट धुक्यामुळे तो मुख्यमंत्र्यांच्या गावी पोहोचू शकला नाही.
सलमान खान मुख्यमंत्र्यांच्या गावी कशासाठी जात होता, हेही समजले नाही. त्याच्यावरील गोळीबार प्रकरणानंतर त्याला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. पोलिस संरक्षणात व मोठ्या महागड्या दहा-बारा गाड्यांच्या ताफ्यासह सलमान खान महाबळेश्वर येथे आला आहे.
विशेष म्हणजे सलमान खान हा महाबळेश्वरातील वाधवानच्या बंगल्यात वास्तव्यास आहे. डीएचएफएलमधील घोटाळ्यानंतर वाधवान बंधू चर्चेत आले आहेत. त्यांच्या महागड्या गाड्या पाचगणी पोलिसांनी जप्त केल्या होत्या. त्या आजही पोलिस ठाण्याच्या आवारात उभ्या आहेत.
सलमान खान महाबळेश्वरमध्ये, मुख्यमंत्री शिंदे यांच्या गावी जाताना धुक्याने वाट अडवली. त्यामुळे त्याला वाधवान यांच्या बंगल्यात वास्तव्य करावे लागले. वाधवान बंधूंची महाबळेश्वर येथे मोठी जागा आणि दोन-तीन बंगले आहेत. त्यातील एक बंगला ईडीने जप्त केला आहे. इतर बंगल्यातील महागडी पेंटिंग व फर्निचर जप्त केले आहे.
सलमान खानच्या चित्रपटाचे कोणत्या हॉटेलमध्ये की बंगल्यामध्ये, रिसॉर्टमध्ये चित्रीकरण होणार, याबाबत कमालीची गुप्तता पळाली जात आहे. त्याचा मुक्काम असलेल्या बंगल्याचे गेट बंद असून तेथे पोलिस बंदोबस्त आहे आणि बंगल्याच्या आतमध्ये महागड्या गाड्यांचा ताफा उभा आहे. सध्या सलमान खानच्या या महाबळेश्वर मुक्कामाची जिल्ह्यात चर्चा आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.