Mumabi News : एकीकडे भाजपच्या विरोधात एकजुटीने लढण्याच्या आणाभाका देशभरातील पक्ष घेत असताना राज्यातील महाविकास आघाडी मात्र दिवसेंदिवस कुमकवत होताना दिसत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीमुळे क्षीण झालेल्या महाविकास आघाडीला आणखी एका मित्र पक्षाने ‘गुडबाय’ केले आहे. समाजवादी पक्षाने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. (Samajwadi Party Out of the Mahavikas Aghadi)
भाजपला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अस्तित्वात आली. सत्तेत होती, तोपर्यंत महाविकास आघाडी जबरदस्त मजबूत होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत उभी फूट पाडली आणि महाविकास आघाडीचा डोलारा कोसळण्यास सुरुवात झाली.
शिंदेंच्या बंडानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. या सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने रणशिंग फुंकले. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील दोन्ही पोटनिवडणुका निखराने लढल्या गेल्या. पण, वर्षभरातच राष्ट्रवादीत फूट पडली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत ३५ ते ४० आमदारांचा एक गट युती सरकारसोबत गेला. त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीही क्षीण झाली. त्यामुळे राज्यात सर्वांत कमी जागा जिंकलेली काँग्रेस ही महाविकास आघाडीत सर्वांत मोठा पक्ष बनली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी छोट्या पक्षांना सोबत घेऊन महाविकास आघाडी आणि महायुतीच्या विरोधात लढण्यासाठी तिसरी आघाडी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडत या तिसऱ्या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेला आहे.
राज्यात आगामी निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये सामना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना राजू शेट्टी यांनी मात्र आपला सवता सुभा उभा करण्याचा प्रयत्न चालवला आहे. या तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून या दोन्ही आघाड्यांना सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न शेट्टी यांच्या नेतृत्वात सुरू आहे. प्रागतिक विचार मंचच्या माध्यमातून ही तिसरी आघाडी उदयास येत आहे.
दरम्यान, महायुती, महाविकास आघाडीशिवाय राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारत राष्ट्र समिती हे पक्षही स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार आहेत. त्यामुळे आघाडी आणि युतीला मतविभाजनाचा फटका बसतो का हे पाहावे लागणार आहे, त्यासाठी निवडणुकांपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.