Chhatrapati Sambhajiraje- K. Chandrashekhar Rao Sarkarnama
विशेष

Sambhaji Raje News : संभाजीराजेंनी घेतली कट्टर भाजपविरोधक मुख्यमंत्र्यांची भेट : महाराष्ट्रात रंगली ‘या’ गोष्टीची चर्चा!

काँग्रेस वगळून देशभरात आघाडी उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. देशभराप्रमाणे महाराष्ट्रातही तिसरी आघाडी आकाराला येऊ शकते, अशी चर्चा राज्यात रंगली आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : तेलंगणचे (Telangana) मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( K. Chandrashekhar Rao) आपल्या पक्षाचा विस्तार तेलंगणबाहेरही करू इच्छित आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाचे नावही तेलंगणा राष्ट्र समिती बदलून भारत राष्ट्र समिती असे ठेवले आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) यांनी चंद्रशेखर राव यांची हैदराबादमध्ये भेट घेतली आहे. संभाजीराजेही ‘स्वराज्य संघटने’च्या माध्यमातून महाराष्ट्रात राजकीय वाटा धुंडाळत आहेत. त्यामुळे या भेटीला महत्व आहे. (Sambhaji Raje Meet to Telangana Chief Minister K. Chandrashekhar Rao)

संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली आहे. के. चंद्रशेखर राव हे सध्या कट्टर भाजपविरोधक म्हणून ओळखले जात आहेत. त्यांनी भाजपच्या विरोधात मोहीम उघडली आहे. काँग्रेस वगळून देशभरात आघाडी उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे देशात तिसऱ्या आघाडीची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे, संभाजीराजेही राजकीय पर्याय उभारण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे देशभराप्रमाणे महाराष्ट्रातही तिसरी आघाडी आकाराला येऊ शकते, अशी चर्चा राज्यात रंगली आहे. मध्यंतरी प्रकाश आंबेडकर यांनीही संभाजीराजेंची भेट घेतली हेाती. तसेच, उदयनराजेंनी आपण संभाजीराजेंसोबत असल्याचे पुण्यात येऊन स्पष्ट केले होते.

संभाजीराजे छत्रपती आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, तेलंगण राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन व विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली आहे. राव यांनी केवळ निवडणुकीपुरती आश्वासने न देता अथवा केवळ राजकीय दृष्टिकोन ठेवून कार्य न करता जनहित व राष्ट्रहित नजरेसमोर ठेवून व्यापक कार्य आपल्या राज्यात केले आहे.

राव यांनी गेल्या १४ वर्षांत तेलंगण राज्यात विकासाची गंगा आणली आहे. त्यांचे कृषीधोरण, जनधोरण, सिंचन योजना, गरीब व वंचितांसाठी आखलेल्या विविध योजना व शिक्षण पद्धती या संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक व आदर्शवत आहेत. त्यांच्या या योजना व कार्यपद्धती याविषयी प्रदीर्घ चर्चा झाली. के. चंद्रशेखर राव हे केवळ आपल्या राज्यापुरते मर्यादित न राहता इतर राज्यांच्या विकासाचा व त्या माध्यमातून संपूर्ण राष्ट्राचा विकास साधण्याचा दूरगामी दृष्टिकोन ठेवणारे ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आहेत, अशा शब्दांत संभाजीराजेंनी राव यांचे कौतुक केले आहे.

के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या निवासस्थानी आमचे अगदी आपुलकीने आदरातिथ्य केले. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा त्यांना पूर्ण अभ्यास असून महाराजांविषयी त्यांच्या मनात अत्यंत आदरभाव जाणवला. या वेळी राव यांना राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचा चरित्रग्रंथ भेट दिला, असेही संभाजीराजे यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT