Ujani Dam Sarkarnama
विशेष

Water Crisis : चांद्यापासून बांद्यापर्यंत पाणीबाणी; मुख्यमंत्र्यांकडून नुसतीच बैठक!

Maharashtra News : वाढत्या पाणी टंचाईमुळे जनता हैराण झालेली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यावर फक्त फुंकर मारण्याचे काम संभाजीनगरच्या विभागीय बैठकीत झाले. मात्र, ठोस भूमिका जाहीर न केल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Vijaykumar Dudhale

Pune, 25 May : राज्यात चांद्यापासून बांदापर्यंत सर्वत्र पाणीटंचाई आहे. टंचाईची सर्वाधिक झळ मराठवाड्यासह पश्चिम विदर्भाला बसत आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल ६०० पेक्षा जास्त टॅंकर सुरू असून त्यांच्या तीन तीन फेऱ्या होत आहेत. वाढत्या पाणी टंचाईमुळे जनता हैराण झालेली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यावर फक्त फुंकर मारण्याचे काम संभाजीनगरच्या विभागीय बैठकीत झाले. मात्र, ठोस भूमिका जाहीर न केल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्याच्या विविध भागात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. नदी आणि धरणं (Dam) आटल्याने राज्यातील मच्छीमारांच्या उदर्निवाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. खडकवासला धरण प्रकल्पांतून पुणे शहराला (Pune City) पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, या प्रकल्पात केवळ २१ टक्केच पाणी शिल्लक आहे. या धरणातूनच हवेली, दौंड, इंदापूर तालुक्यातील शेतीसाठीही पाणी सोडले जाते. सध्या धरणातून दौंड शहरासाठी १ टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे, त्यामुळे पुण्यातही पाणीकपातीची शक्यता नाकारता येत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक धरणे आटली आहेत. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडीत धरणात (Jayakwadi Dam) केवळ ४ टक्के पाणी आहे. गोदावरी नदीचे धरणाखालील पात्र कोरडे पडू लागले आहे. जिल्ह्यातील ४३५ गावे आणि ६५ वाड्या वस्त्यांना सध्या ७०८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एकट्या संभाजीनगरमध्ये ७०८ टॅंकर असून ही संख्या उर्वरीत मराठवाड्यातील टॅंकरपेक्षा निम्मी आहे. संभाजीनगरमध्ये एका एका टॅंकरला तीन तीन फेऱ्या कराव्या लागत आहेत.

जायकवाडीतील पाणी पिण्यासाठी राखीव

जायकवाडी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शेतीतील उभी पिके वाळून गेली आहेत. त्यामुळे जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जायकवाडी धरणातील पाणी आटत आल्याने मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय जिल्ह्यातील सुखना धरणही आटले आहे.

परळीत आठ दिवसाआड पाणी

बीड जिल्ह्यातील १२२ प्रकल्पांपैकी फक्त २० प्रकल्पांमध्येच पाणीसाठा शिल्लक आहे. परळी तालुक्यातील नागापूर धरणात ५२ टक्के पाणी आहे. त्यानंतरही प्रशासनाच्या दिरंगाईच्या कामामुळे आणि अयोग्य नियोजनाअभावी आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. बिंदूसरा प्रकल्पात केवळ ५ टक्के शिल्लक असून प्रकल्पावर अवलंबून असणाऱ्या गावांच्या पाण्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे.

सोलापूर शहरात पाच दिवसाआड पाणी

पश्चिम महाराष्ट्रावरही दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातही जेमतेम पाणीसाठा आहे. जिल्ह्यात १९३ टॅंकर सुरू असून सोलापूर शहराला पाच दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील साडेतीन लाख पशुधनाला जगवायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिकमध्ये ३७० टँकर

नाशिक जिल्ह्यातही भीषण टंचाई जाणवू लागली आहे. सध्या नाशिकच्या ३४८ गावे ८७२ वाड्यावस्त्यांवर १४ सरकारी आणि ३५६ खासगी असे ३७० टँकरने पाणीपुरठा केला जात आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या गंगापूर धरणात केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पुढील दोन महिन्याचे पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

बुलडाणा, अमरावतीत गंभीर स्थिती

पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अमरावतीला सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. या जिल्ह्यातील ८६ गावांना ९१ टँकरने पाणी पुरवले जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील पैनगंगा, कयाधू आणि पूर्णा नदीही कोरडी पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातही भीषण टंचाई निर्माण झाली आहे.

धुळ्यात १६ टक्के साठा

धुळे जिल्ह्यातही स्थिती गंभीर आहे. या जिल्ह्यातील लघू आणि मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा केवळ १६ टक्के आहे. धुळ्यातही पाणी टंचाईचे सावट गडद होत आहे. येथील डेडरगाव तलावात फक्त २० दिवस पाणी पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT