Devendra Fadnavis-Sharad pawar Sarkarnama
विशेष

Jalna Lathicharge: फडणवीसांची माफी म्हणजे ‘कोणी केलं, काय केलं, हे आता....’ ; लाठीहल्लाप्रकरणी पवारांचे गृहमंत्र्यांकडे बोट

Vijaykumar Dudhale

Jalgaon News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जालन्यातील लाठीहल्ला प्रकरणी माफी मागितली ना. म्हणजे कोणी केलं, काय केलं. यामधील काही तरी भाग स्पष्ट व्हायला लागला, असे सांगून लाठीहल्ल्याचा आदेश कोणी दिला हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे फडवीसांकडे बोट दाखविल्याचे मानले जात आहे. (Sharad Pawar points finger at Home Minister Devendra Fadnavis in Jalana stick attack case)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज (ता. ५ सप्टेंबर) जळगावमध्ये सभा होत आहे. तत्पूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना जालन्यातील मराठा बांधवांवरील हल्ल्याप्रकरणी त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, जालन्यातील लाठीहल्ला प्रकरणातील काही तरी भाग आता स्पष्ट व्हायला लागला. मराठा आंदोलक फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करत असतील तर त्याचं उत्तर सरकारनं दिलं पाहिजे.

जालन्यात मराठी बांधवांवर लाठीहल्ला झाला, हे आम्हाला माहिती आहे. कोणी केला, तर पोलिस दलाचे लोक लाठीहल्ला करत आहेत, हे दिसते. त्याच्या खोलात जाणं, हे सरकारचं काम आहे. कोणी सूचना दिल्या, का दिल्या, त्या देण्याची गरज होती का, या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण सरकारने दिलं पाहिजे. अधिकार त्यांच्या हातात आहेत, आमच्या कोणाच्याही हातात नाही, असे शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आव्हानाला उत्तर देताना सांगितले.

शरद पवार म्हणाले की, गोवारीची घटना ही २८ ते ३० वर्षांपूर्वी झाली. गोवारींवर लाठीहल्ला झालेला नव्हता, तर चेंगराचेंगरी झालेली होती. त्यावेळचे आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आम्ही सत्तेत असताना अशा घटना दोनवेळा घडलेल्या होत्या. त्यात गोवरीच्या वेळी मधुकर पिचड यांनी, तर दुसरी घटना आर. आर. पाटील गृहमंत्री असताना घडलेली होती. त्यावेळी त्यांनीही राजीनामा दिला होता.

आज जो लोकांचा आग्रह आहे, विशेषतः उपोषणाला जे लोक बसले आहेत, त्यांचा आग्रह मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असा आहे. पूर्वीची दोन उदाहरणे बघितली तर त्यातून कोणी प्रेरणा घेतली तर त्याचा विचार करावा, असे आवाहन पवारांनी फडणवीसांना दिले आहे.

ओबीसी-मराठा समाजात कोणी वाद लावू नये : शरद पवार

ओबीसीला जो आता आरक्षणाचा कोटा आहे. त्या कोट्यात आणखी कोणी वाटेकरी करणं, हे ओबीसींमधील गरीब लोकांवर अन्याय करणारं होईल, असं काही लोकांचं म्हणणं आहे. ते दुर्लक्ष करण्यासारखं नाही. त्याला हा पर्याय आहे की, आज आरक्षणाच्या संदर्भात पन्नास टक्क्यांची अट आहे, ती शिथिल करण्यासाठी सरकारने संसदेत दुरुस्ती करून घेतली तर हे प्रश्न सुटू शकतात. यामध्ये ओबीसी आणि इतर लोकांमध्ये मतभेद नकोत. त्यांच्यात वाद लावण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर आमचा त्याला पाठिंबा नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT