Anant Geete-Gajanan Kirtikar-Tanaji Sawant
Anant Geete-Gajanan Kirtikar-Tanaji Sawant Sarkarnama
विशेष

नाराज नेते शिवसेनेला कुठे घेऊन जाणार...? जाधव, गीते, किर्तीकर आणि आता सावंत!

विजय दुधाळे

मुंबई : भारतीय जनता पक्ष दररोज तुटून पडत असताना महाविकास आघाडीमध्येही (Mahavikas Aghadi) सर्वकाही आलबेल आहे, असे दिसून येत नाही. विशेषतः शिवसेना (shivsena) आणि काँग्रेसकडून (congress) राष्ट्रवादीच्या (ncp) वर्चस्ववादी धोरणाबाबत नाराजीचा सूर दिसून येत आहे. काँग्रेसचे नेते बैठकांच्या पातळीवर नाराजी व्यक्त करत असले तरी आक्रमक शिवसेना नेते मात्र थेट राष्ट्रवादीला अंगावर घेत आहेत. त्याची सुरुवात परभणीचे खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी केली. त्यानंतर माजी खासदार अनंत गीते (Anant Geete), खासदार गजानान किर्तीकर (Gajanan Kirtikar) आणि आज (ता. २८ मार्च) माजी मंत्री तानाजी सावंतांनीही (Tanaji Sawant) राष्ट्रवादीला खडे बोल सुनावले. शिवसेनेच्या तब्बल २५ आमदारांनी अधिवेशनावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता, त्यामुळे हे नाराज नेते शिवसेनेला कुठे घेऊन जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Shiv Sena leaders' displeasure over NCP's rule began to grow)

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन केली. एकमेकांविरोधात लढलेल्या या पक्षांमध्ये सत्तास्थापनेनंतर काही दिवसांतच खटके उडायला सुरुवात झाली. पारनेरचे शिवसेनेचे नगरसेवक फोडून त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याबद्दल खुद्द मुख्यमंत्र्यांनी नाराजी दर्शविली होती. त्या प्रकरणात मिलिंद नार्वेकर यांनी यशस्वी मध्यस्थी करत ते नगरसेवक पुन्हा शिवसेनेत आणले होते. पोलिसांच्या नियुक्त्यांवरून ही नाराजीची चर्चा रंगली होती.

‘राष्ट्रवादीवाल्यांना आम्ही कधीही पायाखाली घालू शकतो’ : संजय जाधव

परभणीच्या जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल यांच्या नियुक्तीवरून शिवसेनेचे संजय (बंडू) जाधव यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. आंचल गोयल जिल्हाधिकारी नको म्हणून मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. मात्र, राष्ट्रवादीवाल्यांनी त्याबाबत प्रचंड रान पेटवलं. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशी त्यांची पद्धत आहे. मात्र, राष्ट्रवादीवाल्यांना आम्ही कधीही पायाखाली घालू शकतो. आम्ही आता सहनशीलतेच्या पुढे गेलो आहोत, असंही खासदार जाधव यांनी सुनावले होते.

शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत : अनंत गीते

शिवसेनेचे उपनेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनीही रायगडमधील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीला लक्ष्य केले होते. त्यांनी तर थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे कर्तेधर्ते शरद पवार यांनाच शिंगावर घेतले होते. शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. पवार यांना कोणी जाणता राजा म्हणो किंवा आणखी काही म्हणो पण आमचे नेते ते होऊच शकत नाही. ही सत्तेची तडजोड आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे. ज्या दिवशी तुटेल त्यादिवशी तटकरेंच्या घरी जाणार आहात का. आपल्याच घरी, शिवसेनेच्या घरी येणार आहात ना, अशी टीका गीते यांनी केली होती. त्याबाबत गीते यांना शिवसेना नेतृत्वाकडून समज देण्यात आल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर झालेल्या दसऱ्या मेळाव्यालाही ते व्यासपीठावर उपस्थित नव्हते.

माजी मंत्री रामदास कदम यांनीही राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्यावर टीका केली होती. तसेच त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी उभा दावा मांडला आहे. त्या प्रकरणापासून कदम पिता-पुत्र हे शिवसेनेत काहीसे साईडला गेले आहेत.

हे तर नावालाच ठाकरे सरकार; हे तर पवार सरकार : किर्तीकर

गेल्याच आठवड्यात शिवनेनेतील बुजूर्ग नेते, खासदार गजानन किर्तीकर यांनीही राष्ट्रवादीवर टीका केली होती. ‘केवळ आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार मात्र, प्रत्यक्ष लाभ कोण घेते तर, पवार सरकार, अशा शब्दांत त्यांनी निधी वाटपाबाबत नाराजी व्यक्त केली होती. हे नावालाच ठाकरे सरकार आहे, हे तर पवार सरकार, अशी पुस्तीही त्यांनी जोडली होती.

निधीवाटपावरून सावंतांनी राष्ट्रवादीला केले लक्ष्य

आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर प्रचंड नाराज आहोत. ही सत्ता तुम्ही स्वप्नात तर पहिली होती का? ज्यांनी तुम्हाला सत्ता अनुभवायला दिली, तुम्ही त्यावरच अन्याय करता. एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये, असे ठरलेलं असताना का असं होतं? आमच्या नादाला लागू नका, तुम्ही शंभर मारले आणि आमचा एकच दणकट बसलं की आईचे दूध आठवेल, असा इशारा आमदार तानाजी सावंत यांनी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला. तसेच निधीवाटपावरूनही राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल त्यांनी केला.

फडणवीसांनीही उचकवले

याच मुद्यावरून शिवसेनेच्या नाराज २५ आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेनावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली हेाती. त्यानंतर महाआघाडीच्या नेत्यांनी धावपळ करत त्यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला हेाता. त्याउपरही अधिवेशन खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीही निधी वाटपावरूनच शिवसेनेला उचकवण्याचा प्रयत्न केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT